व्हिडिओवरून घेतलेला स्क्रीनशॉट एक्स (@BCCIWomen)
क्रीडा

भारतीय महिला संघाची ऐतिहासिक कामगिरी! इंग्लंडमध्ये प्रथमच जिंकली टी-२० मालिका; मुंबईकर राधा सामनावीर

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय महिला संघातील रणरागिणींनी बुधवारी ऐतिहासिक पराक्रम केला.

Swapnil S

मँचेस्टर : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय महिला संघातील रणरागिणींनी बुधवारी ऐतिहासिक पराक्रम केला. मँचेस्टर येथे झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने इंग्लंडला ६ गडी आणि १८ चेंडू राखून धूळ चारली. याबरोबरच भारताने पाच लढतींच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. भारताने इंग्लंडमध्ये प्रथमच टी-२० मालिका जिंकण्याची किमया साधली.

ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर झालेल्या या लढतीत इंग्लंडला २० षटकांत ७ बाद १२६ धावांत रोखल्यावर भारताने १७ षटकांत ४ फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. डावखुरी फिरकीपटू राधा यादव भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली. तिने फक्त १५ धावा देत २ बळी टिपले. त्याशिवाय फिरकीपटू श्री चरिणी, स्मृती मानधना (३१ चेंडूंत ३२ धावा), शफाली वर्मा (१९ चेंडूंत ३१) यांनीही विजयात मोलाचे योगदान दिले. आता शनिवारी उभय संघांतील पाचवी लढत खेळवण्यात येईल. मात्र चौथ्या सामन्यातील विजयामुळे भारताने मालिका आधीच खिशात घातली.

हरमनप्रीत नेतृत्वात भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात उभय संघांत ५ टी-२० सामन्यांनंतर १६ जुलैपासून ३ एकदिवसीय लढतीही होणार आहेत. भारताने मे महिन्यात तिरंगी मालिकेत दक्षिण आफ्रिका व श्रीलंका यांना नमवले. त्या मालिकेतील बहुतांश खेळाडूंना इंग्लंडविरुद्धही संघात कायम राखले आहे. यंदा भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात महिलांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्यानिमित्ताने आता इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिकाही निर्णायक ठरणार आहे.

दरम्यान, भारतीय महिलांनी पहिल्या दोन लढती जिंकल्यावर तिसऱ्या सामन्यात त्यांना पाच धावांनी पराभव पत्करावा लागला. यापूर्वी २००६मध्ये भारत-इंग्लंड यांच्यात एकमेव टी-२० सामना इंग्लंडमध्ये झाला होता. मात्र तो वगळता भारताने एखाद्या टी-२० मालिकेत इंग्लंडला कधीच नमवले नव्हते. आता मात्र भारताने टी-२० मालिकेतही हा पराक्रम करून दाखवला. यापूर्वी २०२२मध्ये भारतीय महिलांनी इंग्लंडला त्यांच्याच घरात एकदिवसीय मालिकेत प्रथमच ३-० असे नमवण्याची कामगिरी केली होती.

चौथ्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला ७ बाद १२६ धावाच करता आल्या. राधाने कर्णधार टॅमी ब्युमाँट (२०) व स्कोलफिल्ड (१६) यांचे बळी मिळवले. तर श्री चरिणीने एलिस कॅप्सी (१८) व डॅनिएल व्हॅट (५) यांना माघारी पाठवले. सोफिया डंकलीने त्यांच्यासाठी सर्वाधिक २२ धावा केल्या. नॅट शीव्हर-ब्रंटची अनुपस्थिती इंग्लंडला महागात पडली.

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना शफाली व स्मृती यांनी ४२ चेंडूंत ५६ धावांची सलामी नोंदवली. या दोघी बाद झाल्यावर जेमिमा रॉड्रिग्ज (नाबाद २४) व हरमनप्रीत (२६) यांनी संघाला विजयासमीप नेले. अखेरीस रिचा घोष (नाबाद ७) हिच्या साथीने जेमिमाने १७व्या षटकात भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

‘डब्ल्यूपीएल’चे मोलाचे योगदान : हरमनप्रीत

भारतीय टी-२० संघाची कामगिरी केल्या काही काळात सुधारली आहे. यामध्ये डब्ल्यूपीएलचे म्हणजेच महिलांच्या आयपीएलचे मोलाचे योगदान आहे, असे मत कर्णधार हरमनप्रीतने व्यक्त केले. “डब्ल्यूपीएलमध्ये आपल्या खेळाडूंना विदेशातील खेळाडूंसह वावरण्याची, खेळण्याची संधी मिळते. यामुळे ते त्यांच्या कमकुवत व मजबूत बाजू ओळखू शकतात. तसेच देशाला असंख्य प्रतिभावान खेळाडू डब्ल्यूपीएलद्वारे गवसत आहेत,” असे हरमनप्रीत म्हणाली.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड : २० षटकांत ७ बाद १२६ (सोफिया डंकली २२; राधा यादव २/१५, श्री चरिणी २/३०) पराभूत वि. g भारत : १७ षटकांत ४ बाद १२७ (स्मृती मानधना ३२, शफाली वर्मा ३१, हरमनप्रीत कौर २६)

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत