क्रीडा

IND-W vs NZ-W : विश्वविजेत्या न्यूझीलंडविरुद्ध भारतीय महिलांची चाचपणी! उभय संघांतील एकदिवसीय मालिकेला आजपासून प्रारंभ

टी-२० विश्वचषकातील अपयश बाजूला सारून हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय महिला संघ नव्या आव्हानासाठी सज्ज होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुरुवारपासून भारत-न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला प्रारंभ होणार आहे.

Swapnil S

अहमदाबाद : टी-२० विश्वचषकातील अपयश बाजूला सारून हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय महिला संघ नव्या आव्हानासाठी सज्ज होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुरुवारपासून भारत-न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेत टी-२० विश्वचषक विजेत्या न्यूझीलंडविरुद्ध भारतीय महिलांचा कस लागणार आहे.

नुकताच यूएई येथे झालेल्या टी-२० विश्वचषकात भारताला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. न्यूझीलंडनेही भारताला गटात नमवले होते. सोफी डिवाइनच्या नेतृत्वाखाली मग न्यूझीलंडने प्रथमच टी-२० विश्वचषक उंचावण्याची किमया साधली. मात्र आता पुढील वर्षी भारतातच होणाऱ्या महिलांच्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने संघबांधणी करण्याचे भारतापुढे आव्हान असेल.

हरमनप्रीतच्या नेतृत्वशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने ती या मालिकेत कशी कामगिरी करते, हे पाहणे रंजक ठरेल. हरमनप्रीतने टी-२० विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक १५० धावा केल्या, मात्र नेतृत्वात ती काहीशी कमी पडली. भारताच्या काही माजी क्रिकेटपटूंनी हरमनप्रीतकडून कर्णधारपद काढून घेण्यात यावे, असेही सुचवले. मात्र तूर्तास निवड समितीने हरमनप्रीतवरच भरवसा दर्शवला आहे. तसेच ती या मालिकेत कोणत्या स्थानी फलंदाजी करणार, हे पाहणे निर्णायक ठरेल. टी-२० विश्वचषकात भारताच्या तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाजीचा पेच कायम राहिला व परिणामी भारताला त्याचा फटका बसला.

स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा असे अनुभवी फलंदाज भारताच्या ताफ्यात आहेत. रिचा घोषला १२व्या परिक्षेसाठी या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तसेच पूजा वस्त्रकारही विश्रांतीवर असल्याने रेणुका सिंगच्या साथीने अरुंधती रेड्डी वेगवान गोलंदाजीची धुरा वाहील. श्रेयांका पाटील, राधा यादव यांच्यावर फिरकीची भिस्त असेल. सायली सतघरे, सैमा ठाकोर, प्रिया मिश्रा, तेजल हसबनीस यांचा प्रथमच भारताच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघ टी-२० विश्वविजयामुळे फॉर्मात असून या स्पर्धेतील बहुतांश खेळाडू भारताविरुद्ध खेळतील. अमेलिया कर, डिवाईन, सुझी बेट्स, ली ताहुहू यांच्यावर किवी संघाची भिस्त असेल. पॉली इंग्लिसला प्रथमच संधी लाभली आहे. न्यूझीलंडचा महिला संघ अद्याप सप्टेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र न ठरल्याने त्यांच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची असेल. भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिन्ही सामने अहमदाबाद येथेच होणार असून दुसरी व तिसरी लढत अनुक्रमे २७ व २९ ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे.

- उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ५४ एकदिवसीय सामन्यांपैकी न्यूझीलंडने ३३, तर भारताने फक्त २० लढती जिंकल्या आहेत. एक सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे भारतावर ही आकडेवारी सुधारण्याचेही दडपण असेल.

प्रतिस्पर्धी संघ

-भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दयालन हेमलता, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टिरक्षक), उमा छेत्री (यष्टिरक्षक), सायली सतगरे, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, तेजल हसबनीस, सैमा ठाकोर, प्रिया मिश्रा, राधा यादव, श्रेयांका पाटील.

-न्यूझीलंड : सोफी डिवाइन (कर्णधार), सुझी बेट्स, ईडन कार्सन, लॉरेन डाऊन, इजाबेला गेझ, मॅडी ग्रीन, ब्रूक हालिडे, पॉली इंग्लिस, फ्रान जोनास, जेस कर, अमेलिया कर, मोली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर, हॅना रोव, ली ताहुहू.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या