क्रीडा

एकदिवसीय सामन्यात भारताने केले वेस्ट इंडिजविरोधात निर्भेळ यश संपादन

या लढतीत भारताने दिलेल्या २५७ धावांचा पाठलाग करताना विंडीजचा डाव २६ षट्कांत अवघ्या १३७ धावांत आटोपला.

वृत्तसंस्था

शुभमन गिलने (९८ चेंडूंत नाबाद ९८ धावा) साकारलेली दमदार खेळी आणि लेगस्पिनर युजवेंद्र चहलने (४/१७) केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा ११९ धावांनी फडशा पाडला. या विजयासह भारताने मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले.

पावसाच्या व्यत्ययामुळे लांबलेल्या या लढतीत भारताने दिलेल्या २५७ धावांचा पाठलाग करताना विंडीजचा डाव २६ षट्कांत अवघ्या १३७ धावांत आटोपला. निकोलस पूरन (४२) आणि बँडन किंग (४२) वगळता कोणीही त्यांच्याकडून प्रतिकार करू शकले नाहीत. मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवून चहलला उत्तम साथ दिली. गिलने मालिकेत सर्वाधिक २०५ धावा केल्यामुळे त्याला सामनावीरासह मालिकावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

तत्पूर्वी, गिलने सात चौकार आणि दोन षट्कार लगावताना कर्णधार शिखर धवनसह ११३ धावांची सलामी दिली. धवन मालिकेतील दुसरे अर्धशतक झळकावून ५८ धावांवर बाद झाल्यावर श्रेयस अय्यरसह गिलने दुसऱ्या गड्यासाठी ८६ धावांची भर घातली. श्रेयसला (४४) सलग तिसऱ्या अर्धशतकाने हुलकावणी दिली. तर सूर्यकुमार यादव (८) स्वस्तात माघारी परतला. गिल पहिल्या शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचल्यानंतर पावसाचे पुन्हा आगमन झाल्याने भारताचा डाव ३६ षट्कांनंतरच थांबवण्यात आला. दरम्यान, विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ३-० असे यश संपादन करून भारताने जागतिक क्रमवारीत ११० गुणांसह तिसरे स्थान कायम राखले.

निबंधकांच्या मंजुरीनंतरच जन्म, मृत्यू नोंदणी रद्द; दुरुस्तीसाठी नवे कडक नियम

महसूल वाढीसाठी वित्त समितीची स्थापना; समितीच्या अध्यक्षपदी डॉ. विजय केळकर यांची नियुक्ती

Mumbai : दुसऱ्या टप्प्यात २९४ आस्थापनांना नोटीस; मराठी पाट्या प्रकरणी ९,७९८ आस्थापनांची झाडाझडती

UPI वरील शुल्काचा भार व्यापाऱ्यांवर नको; दिल्लीतील व्यापाऱ्यांना धास्ती, पुन्हा रोखीकडे वळण्याचा निर्णय

१५ वर्षे पूर्ण झालेली मुस्लिम मुलगा-मुलगी लग्नासाठी सक्षम; पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचा वादग्रस्त निर्णय