क्रीडा

विराटच्या नेतृत्वाची भारतीय संघाला उणीव; कसोटीत रोहित कर्णधार म्हणून कमकुवत; इंग्लंडच्या मायकल वॉनचे परखड मत

रोहित शर्माचे कसोटीतील नेतृत्व फारच कमकुवत वाटते, अशी स्पष्ट प्रतिक्रिया इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉर्नने व्यक्त केली आहे.

Swapnil S

लंडन : हैदराबाद कसोटीत विराट कोहलीची अनुपस्थिती भारताला प्रकर्षाने जाणवली. तो भारतीय संघाचा कर्णधार असता, तर १९० धावांची आघाडी घेऊन भारताने कसोटी गमवणे अशक्य होते. रोहित शर्माचे कसोटीतील नेतृत्व फारच कमकुवत वाटते, अशी स्पष्ट प्रतिक्रिया इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉर्नने व्यक्त केली आहे.

रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी गमावली. उभय संघांतील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरी लढत २ फेब्रुवारीपासून सुरू होईल. दरम्यान, पहिल्या कसोटीत भारतीय संघ पहिल्या डावानंतर १९० धावांनी आघाडीवर होता. त्यानंतर मात्र ओली पोपने जिगरबाज दीडशतकी खेळी साकारली. त्यामुळे इंग्लंडने आघाडी फिटवून भारताला २३१ धावांचे लक्ष्य दिले. हे लक्ष्य गाठताना भारताचा डाव २०२ धावांत आटोपला. भारताला गेल्या १२ वर्षांत मायदेशात फक्त चौथा कसोटी सामना गमवावा लागला. तसेच हैदराबादमध्ये प्रथमच भारताने लढत गमावली. विराट वैयक्तिक कारणास्तव पहिल्या व दुसऱ्या कसोटीसाठी अनुपलब्ध आहे.

“विराटच्या नेतृत्वाची भारताचा प्रकर्षाने उणीव भासत आहे. तो हैदराबाद येथील कसोटीत कर्णधार असता, तर भारताने ही लढत नक्कीच जिंकली असती. विशेषत: रोहित हा मर्यादित षटकांच्या प्रकारात कर्णधार म्हणून उत्तम असला, तरी कसोटीत मात्र त्याचे नेतृत्व कमकुवत वाटत आहे,” असे ४९ वर्षीय वॉन म्हणाला.

“रोहितच्या क्षमतेविषयी शंका नाही. तो एक महान खेळाडू व फलंदाज आहे. मात्र इंग्लंडच्या दुसऱ्या डावात तो पूर्णपणे निष्प्रभ वाटला. तसेच पोपच्या रिव्हर्स स्वीप व स्वीपच्या फटक्यांना कसे रोखावे, याचे त्याच्याकडे उत्तर नसल्याचे दिसले. त्यामुळे रोहितला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल,” असेही वॉनने नमूद केले. विराटने २०२२च्या सुरुवातीला आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. तेव्हापासून रोहित भारताचा कर्णधार आहे.

गिल, अय्यरला आणखी संधी मिळणे गरजेची -पठाण

शुभमन गिल व श्रेयस अय्यर सध्या सुमार कामगिरी करत आहेत. मात्र त्यांना दुसऱ्या कसोटीत संधी मिळणे गरजेचे आहे, असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने व्यक्त केले. तसेच जसप्रीत बुमरावर अतिरिक्त दबाव येऊ नये, यासाठी भारताने मोहम्मद सिराजला नक्कीच खेळवावे. फक्त एका वेगवान गोलंदाजासह खेळण्याचा विचार भारताने करू नये, असेही पठाणने सुचवले. रजत पाटिदार किंवा सफराझ खान यांच्यापैकी कुणाला पदार्पणाची संधी देण्यात यावी, याविषयी मात्र पठाणने मत व्यक्त करणे टाळले.

अंतिम संघनिवडीची भारतापुढे डोकेदुखी

इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ नियोजनासमोर गडबडून गेलेल्या भारतीय संघ व्यवस्थापनासमोर रवींद्र जडेजा व के. एल. राहुल या दोघांच्या अनुपलब्धतेमुळे चिंतेची भर पडली आहे. या सगळया रिकाम्या जागा भरण्यासाठी निवड समितीने रोहित आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या समोर सर्फराज खान, सौरभ कुमार, वॉशिंग्टन सुंदर असे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. सर्फराजचा भारतीय संघात शिरकाव झाला असला, तरी सध्याच्या स्थितीत राहुलची जागा घेण्यासाठी रजत पाटीदारचे पारडे जड आहे. पाटीदारला विराटच्या माघारीनंतर पहिल्या कसोटी सामन्यादरम्यानच संघात स्थान देण्यात आले होते. त्याचवेळी फिरकीसाठी जडेजाची जागा कुलदीप घेऊ शकतो. त्यामुळे अश्विन, अक्षर पटेलबरोबर तिसऱ्या फिरकी गोलंदाजीचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. एकूणच नव्या खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला असला, तरी अंतिम अकरामध्ये यापूर्वी संघात स्थान मिळालेल्या खेळाडूंना प्राधान्य मिळू शकते.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या