क्रीडा

ऐतिहासिक कामगिरीचे भारतीय महिलांना वेध! ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात प्रथमच टी-२० मालिका जिंकण्याची संधी

यंदाचे वर्ष टी-२० विश्वचषकाचे असल्याने भारतीय संघाला संघबांधणी करण्यावर भर द्यावा लागणार आहे.

Swapnil S

नवी मुंबई : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात पहिलीवहिली टी-२० मालिका जिंकण्याची ऐतिहासिक संधी आहे. मात्र यासाठी त्यांना मंगळवारी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात वर्चस्वपूर्ण कामगिरी करावी लागेल. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर ही लढत रंगेल.

यंदाचे वर्ष टी-२० विश्वचषकाचे असल्याने भारतीय संघाला संघबांधणी करण्यावर भर द्यावा लागणार आहे. घरगुती हंगामाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध झालेल्यी टी-२० मालिकेत भारताने पराभव पत्करला. मात्र त्यानंतर इंग्लंड, ऑस्ट्रेलियाला कसोटी सामन्यात भारताने धूळ चारली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ०-३ असा सपाटून मार खाल्ल्यानंतर आता टी-२० मालिका १-१ अशा बरोबरीवर आहे. भारताने पहिल्या सामन्यात ९ गडी राखून विजय मिळवल्यानंतर कांगारूंनी दुसऱ्या लढतीत ६ गडी राखून

सरशी साधली. त्यामुळे भारताच्या रणरागिणी एलिसा हिलीच्या ऑस्ट्रेलियन संघाला रोखणार का, हे पाहणे रंजक ठरेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३३ टी-२० सामन्यांपैकी भारताने फक्त ८ लढती जिंकल्या असून २४ सामन्यांत कांगारूंनी बाजी मारली आहे. एलिस पेरी, बेथ मूनी, फोबे लिचफील्ड यांसारख्या प्रतिभावान फलंदाजांचा त्यांच्या संघात भरणा असून गेल्या लढतीतील सामनावीर वेगवान गोलंदाज किम गार्थ, ॲनाबेल सदरलँड भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवण्याची भूमिका चोख बजावत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांचा कस लागेल.

हरमनप्रीतच्या कामगिरीची चिंता

कर्णधार हरमनप्रीत एकदिवसीय मालिकेपासून धावांसाठी झगडत आहे. टी-२० मालिकेतही तिचा संघर्ष कायम असून तिसऱ्या लढतीत अनुभवी हरमनप्रीत खेळ उंचावेल, अशी आशा आहे. फलंदाजीत स्मृती मानधना, शफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्यावर प्रामुख्याने भारताची भिस्त आहे. तितास साधू व रेणुका सिंग वेगवान माऱ्याची बाजू वाहत आहेत. मात्र श्रेयांका पाटील, साइका इशाक या फिरकीपटूंना कामगिरीत सुधारणा करावी लागेल. दीप्ती शर्माकडून अष्टपैलू योगदान अपेक्षित आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ टी-२० मालिकांपैकी भारताने फक्त १ मालिका जिंकलेली आहे. २०१५-१६मध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत नमवण्याचा पराक्रम मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने केला होता.

गेल्या १० आंतरराष्ट्रीय सामन्यांत हरमनप्रीतने एकही अर्धशतक झळकावलेले नाही. दुसऱ्या सामन्यात ती १२ चेंडूंत फक्त ६ धावा करून बाद झाली.

वेळ : सायं. ७ वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८ वाहिनी आणि जिओ सिनेमा ॲप

मुख्यमंत्रीपदाचा फैसला आज; महायुतीचे नेते व केंद्रीय संसदीय मंडळ घेणार निर्णय

महायुतीत मंत्रिपदासाठी २१-१२-१० चा फॉर्म्युला

आजपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; अदानी, मणिपूरवर चर्चा करा! सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांची मागणी

यशस्वी, विराटचा शतकी तडाखा; भारताचा दुसरा डाव ४८७ धावांवर घोषित; ऑस्ट्रेलियाची ३ बाद १२ अशी अवस्था

यूपीतील हिंसाचारात तिघांचा मृत्यू; २० पोलिसांसह अनेक जण जखमी