राजगिर (बिहार) : गतविजेत्या भारतीय महिला हॉकी संघाने विजयी घोडदौड कायम राखत उपांत्य फेरीत जपानचा २-० असा पराभव करून महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. आता बुधवारी रंगणाऱ्या अंतिम फेरीत भारताला चीनशी दोन हात करावे लागणार आहेत.
उपकर्णधार नवनीत कौर हिने पेनल्टी स्ट्रोकवर ४८व्या मिनिटाला भारतासाठी पहिला गोल केला. त्यानंतर लालरेमसियामी हिने ५६व्या मिनिटाला मैदानी गोल करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने या सामन्यात १३ पेनल्टी कॉर्नरसहित गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालवल्या.
चीनने पहिल्या उपांत्य फेरीत मलेशियाला ३-१ असे पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने साखळी सामन्यात चीनला पराभूत केल्यामुळे अंतिम फेरीत भारताचेच पारडे जड मानले जात आहे. दरम्यान, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी मलेशिया आणि जपान यांच्यात लढत होणार आहे. कोरियाने थायलंडला ३-० असे हरवल्यामुळे पाचवे स्थान प्राप्त केले आहे.
भारतीय महिला हॉकी संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाला सुरुवात केली, त्यामुळे जपानच्या बचावपटूंवर प्रचंड दबाव होता. भारताच्या आघाडीवीरांनी जोरदार हल्ले केल्यामुळे बहुतांशी खेळाडू हे जपानच्या गोलक्षेत्रातच होते. पाचव्या मिनिटाला भारताची कर्णधार सलिमा टेटे हिने केलेला गोलचा पहिला प्रयत्न जपानची गोलरक्षक यू कुडो हिने हाणून पाडला. त्यानंतर दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण त्यावर गोल करण्यात यजमानांना अपयश आले. नवनीत कौर आणि दीपिकाचे अनेक गोल यशस्वी होऊ शकले नाहीत.
४१व्या मिनिटाला दीपिकाने जपानच्या गोलक्षेत्रात चेंडू प्रतिस्पर्ध्यांकडून खेचून घेतला, पण कुडोने तिचा हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. चौथ्या सत्राच्या सुरुवातीलाच भारताला १२वा पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण त्यावरही भारताला गोल करता आला नाही. अखेर ४७व्या मिनिटाला दीपिकाच्या प्रयत्नांमुळे भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला, त्यावर नवनीतने कोणतीही चूक न करता भारताचे खाते खोलले. ५६व्या मिनिटाला लालरेमसियाने हिने शानदार मैदानी गोल करत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी विजयासाठी पुरेशी ठरली.