(Photo-X/@BCCI)
क्रीडा

यान्सेनपुढे भारताचे फलंदाज बेचैन, पहिला डाव अवघ्या २०१ धावांत संपुष्टात; दक्षिण आफ्रिका तब्बल ३१४ धावांनी आघाडीवर

गुवाहाटीच्या बारस्परा स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटीत यान्सेनने रविवारी फलंदाजीद्वारे भारताला हैराण करताना आफ्रिकेला पहिल्या डावात ४८९ धावांची मजल मारून दिली होती. मात्र त्या प्रत्युत्तरात यशस्वी जैस्वालचे अर्धशतक आणि वॉशिंग्टन सुंदरने केलेल्या प्रतिकारानंतरही भारताचा डाव २०१ धावांतच आटोपला.

Swapnil S

गुवाहाटी : डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को यान्सेनच्या (४८ धावांत ६ बळी) भेदक माऱ्यापुढे सोमवारी भारताचे फलंदाज बेचैन झाले. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघ ८३.५ षटकांत अवघ्या २०१ धावांत गारद झाला. मग तिसऱ्या दिवसअखेर आफ्रिकेने एकूण आघाडी ३१४ धावांपर्यंत वाढवून मालिका विजयाच्या दिशेने कूच केली आहे.

गुवाहाटीच्या बारस्परा स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटीत यान्सेनने रविवारी फलंदाजीद्वारे भारताला हैराण करताना आफ्रिकेला पहिल्या डावात ४८९ धावांची मजल मारून दिली होती. मात्र त्या प्रत्युत्तरात यशस्वी जैस्वालचे अर्धशतक (९७ चेंडूंत ५८ धावा) आणि वॉशिंग्टन सुंदरने (९२ चेंडूंत ४८ धावा) केलेल्या प्रतिकारानंतरही भारताचा डाव २०१ धावांतच आटोपला. कर्णधार ऋषभ पंतसह मुख्य फलंदाज व अष्टपैलू सपशेल अपयशी ठरले. आता तिसऱ्या दिवसअखेर आफ्रिकेने दुसऱ्या डावात ८ षटकांत बिनबाद २६ धावा केल्या आहेत. रायन रिकल्टन १३, तर एडीन मार्करम १२ धावांवर नाबाद आहे. त्यामुळे मंगळवारी चौथ्या दिवशी आफ्रिका भारताला किती धावांचे लक्ष्य देणार, हे पाहणे रंजक ठरेल.

तत्पूर्वी, कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या पहिल्या कसोटीत टेम्बा बव्हुमाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या आफ्रिकेने शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतावर ३० धावांनी सरशी साधली. याबरोबरच आफ्रिकेने दोन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटीत फलंदाजी करताना मान लचकल्याने २६ वर्षीय गिलला दुखापत झाली. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटीला मुकला असून २८ वर्षीय पंत भारताचा ३८वा कसोटी कर्णधार म्हणून या सामन्यात नेतृत्व करत आहे.

गतवर्षी न्यूझीलंडविरुद्ध मायदेशातच पत्कराव्या लागलेल्या कसोटी मालिका पराभवातून भारताने अद्याप बोध घेतला नसल्याचे पहिल्या कसोटीत स्पष्ट झाले. फिरकीला पूर्णपणे पोषक खेळपट्टी बनवण्याचा डाव भारताच्या अंगलट आला. कारण आफ्रिकेने १२४ धावांचा यशस्वी बचाव करताना भारतावर ३० धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. २०१० म्हणजे १५ वर्षांनी प्रथमच आफ्रिकेने भारताविरुद्ध भारतात एखादी कसोटी जिंकली, हे विशेष. आफ्रिकेचा संघ हा जागतिक अजिंक्यपद विजेता असल्याने त्यांच्याविरुद्ध भारताचा कस लागेल, याचा अंदाज होता.

या कसोटी मालिकेनंतर भारत-आफ्रिका यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय व ५ लढतींची टी-२० मालिकासुद्धा रंगणार आहे. तूर्तास जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) दृष्टीने आफ्रिकेविरुद्धची मालिका महत्त्वाची आहे. यानंतर भारताची पुढील कसोटी मालिका थेट जून २०२६ मध्ये असेल. मात्र सध्या भारताची डब्ल्यूटीसी गुणतालिकेत चौथ्या स्थानी घसरण झाली असून त्यांच्यापुढे दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचे आव्हान आहे.

आफ्रिकेचा संघ २०१९नंतर प्रथमच भारत दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी आला आहे. त्यावेळी भारताने त्यांना ३-० अशी धूळ चारली होती. गतवर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचे फलंदाज फिरकीविरुद्ध सपशेल अपयशी ठरले होते. त्यामुळे भारताला ०-३ असा व्हाइटवॉश पत्करावा लागला होता. आफ्रिकेच्या संघातही उत्तम असे फिरकीपटू आहेत. मात्र सोमवारी फलंदाजांना पोषक खेळपट्टी असूनही यान्सेनने बाऊन्सरचा अप्रतिम मारा करून आपल्या वेगवान गोलंदाजीने भारताची अवस्था बिकट केली.

रविवारच्या बिनबाद ९ धावांवरून पुढे खेळताना यशस्वी व के. एल. राहुल यांनी ६५ धावांची सलामी नोंदवली. केशव महाराजने राहुलला (२२) बाद करून ही जोडी फोडली. यशस्वीने ७ चौकार व १ षटकारासह कसोटीतील १३वे अर्धशतक साकारले. मात्र सायमन हार्मरने त्याचा अडसर दूर केला आणि तेथून भारताचा डाव घसरला. तिसऱ्या क्रमांकावरील साई सुदर्शन (१५) हार्मरचाच शिकार ठरला.

मग यान्सेनने ध्रुव जुरेल (०), पंत (७), रवींद्र जडेजा (६), नितीश रेड्डी (१०) यांना एकामागोमाग एक बाद करून मधली फळी गुंडाळली. विशेषत: पंत सोडून सर्वांना त्याने आखूड टप्प्याच्या चेंडूवर फसवले. १ बाद ९५ वरून भारताची ७ बाद १२२ अशी स्थिती झाल्याने भारतावर फॉलोऑनचे सावट निर्माण झाले. मात्र वॉशिंग्टन सुंदर व कुलदीप यादव या फिरकीपटूंच्या जोडीने प्रतिकार केला. यावेळी आठव्या स्थानी फलंदाजीस आलेल्या सुंदरने ९२ चेंडूंत ४८ धावा करतानाच कुलदीपसह (१३४ चेंडूंत १९ धावा) आठव्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी रचली. कुलदीपने भारताकडून या डावात सर्वाधिक १३४ चेंडू खेळले, हे विशेष.

अखेरीस हार्मरने सुंदरला, तर यान्सेनने कुलदीप व जसप्रीत बुमराला माघारी पाठवून भारताचा डाव संपुष्टात आणला. यान्सेनने कसोटीत चौथ्यांदा डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी मिळवले. हार्मरने ३, तर महाराजने १ बळी घेत त्याला उत्तम साथ दिली. आफ्रिकेला पहिल्या डावात २८८ धावांची आघाडी मिळाली. मात्र त्यांनी फॉलोऑन न लादता पुन्हा फलंदाजी करणे पसंत केले. त्यामुळे ते भारतासमोर आता मोठे लक्ष्य ठेवून मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादन करण्याचा प्रयत्न करतील, असेच सध्या स्पष्ट होते.

संक्षिप्त धावफलक

  • दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : सर्व बाद ४८९

  • भारत (पहिला डाव) : ८३.५ षटकांत सर्व बाद २०१ (यशस्वी जैस्वाल ५८, वॉशिंग्टन सुंदर ४८; मार्को यान्सेन ६/४८)

  • दक्षिण आफ्रिका (दुसरा डाव) : ८ षटकांत बिनबाद २६ (रायन रिकल्टन नाबाद १३, एडीन मार्करम नाबाद १२)

खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक : कुलदीप

भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने गुवाहाटीची खेळपट्टी फलंदाजीसाठी अद्यापही पोषक असल्याचे सांगितले. कुलदीपनेच पहिल्या डावात भारताकडून सर्वाधिक १३४ चेंडू खेळले. त्याउलट मुख्य फलंदाज नांगी टाकताना दिसले. त्यामुळे कुलदीपने एकप्रकारे फलंदाजांवरच निशाणा साधला का, असा प्रश्नही चाहते विचारत आहेत. “आफ्रिकेने पहिल्या डावात उत्तम फलंदाजी केली. खेळपट्टीकडून अद्यापही फलंदाजांना मदत मिळू शकते. गोलंदाजांना येथे संघर्ष करावा लागेल,” असे कुलदीप म्हणाला. मात्र आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना चुका करण्यास भाग पाडले, हेदेखील कुलदीपने मान्य केले. जुरेल, पंत, सुदर्शन यांनी चुकीचा फटका खेळला. जडेजा, रेड्डी यांनाही छाप पाडता आली नाही. त्यामुळे समाज माध्यमांवर या सर्वांवर टीका करण्यात येत आहे.

प्रशिक्षक गंभीरवर चाहत्यांचा निशाणा

भारतीय संघ मालिका पराभवाच्या उंबरठ्यावर असल्याने प्रशिक्षक गौतम गंभीरवर चाहते निशाणा साधत आहेत. २०२४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताने ०-३ असा पराभव पत्करला. त्यानंतर आता आफ्रिकेविरुद्धही भारतीय संघ उर्वरित दोन दिवसांत काही कमाल करण्याची शक्यता कमीच आहे. गंभीरने केलेली संघनिवड व फलंदाजीच्या क्रमाचा अदलाबदल संघासाठी घातक ठरत आहे, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे भारताने दुसरी कसोटी गमावली, तर गंभीर काय उत्तर देणार, हे पाहणे रंजक ठरेल.

"रवींद्र चव्हाण आल्यानंतर काय होतं?" मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरावर निलेश राणेंची धाड; Live व्हिडिओतून पोलखोल

'बॉम्बे'वरून मुख्यमंत्री फडणवीसांची राज ठाकरेंवर टीका; "काहीजण आपल्या मुलांना..."

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा ऐतिहासिक विजय; भारताचा कसोटी क्रिकेट इतिहासातला मोठा पराभव

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या? तुरुंगात विष दिल्याचा आरोप; कुटुंबियांवर लाठीचार्ज

Mumbai : 'बॉम्बे'ची 'मुंबई' कधी झाली? काय आहे या नावामागची गोष्ट? जाणून घ्या