पॅरिस : भारतीय तिरंदाजांनी पॅरिस आलिम्पिकचा दणक्यात प्रारंभ करताना पात्रता फेरीत चमकदार कामगिरी केली. भारताच्या दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. यामध्ये धीरज बोमदेवरा आणि अंकित भाकत यांनी विशेष छाप पाडली.
पुरुषांच्या विभागात भारतीय संघाला तिसरे मानांकन लाभले असून पदक निश्चित करण्यसाठी त्यांना आणखी दोन विजयांची आवश्यकता आहे. पदार्पणातच धीरजने वैयक्तिक प्रकारात टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या मॉरो नेस्पोलीला नमवले. मिश्र दुहेरीत मग अंकिताच्या साथीने नीरजने १,३४७ गुण कमावले.
महिलांच्या विभागात दीपिका कुमारी व्यतिरिक्त भारताकडून अंकिता भगत आणि भजन कौर सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत एकूण ६४ तिरंदाजांचा सहभाग होता. अव्वल चार संघांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळणार होता आणि भारताने चौथ्या स्थानी येत उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
पात्रता फेरीत दीपिका, भजन आणि अंकिता या भारतीय त्रिकुटाने चमकदार कामगिरी करत एकूण १९८३ गुण मिळवले. भारताशिवाय दक्षिण कोरिया, चीन आणि मेक्सिकोचे संघही पहिल्या चारमध्ये आहेत. कोरियाच्या महिला संघाने २०४६ गुण, चीनने १९९६ गुण आणि मेक्सिकोच्या संघाने १९८६ गुण मिळवले. हे तिन्ही संघ भारतापेक्षा पुढे होते. भारताच्या दोन्ही संघांना उपांत्य फेरीत दक्षिण कोरिया, चीन या देशांकडून कडवे आव्हान मिळू शकते. मात्र उपांत्यपूर्व फेरीत पुरुषांमध्ये भारतासमोर तुर्की किंवा कोलंबियाचे आव्हान असेल, तर महिलांची फ्रान्स किंवा नेदरलँड्सशी गाठ पडेल.
ऑलिम्पिक ऑर्डरचा बहुमान मिळालेला सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राने गुरुवारी टॉर्च रिलेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. ऑलिम्पिक चळवळीतील अमूल्य योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतर्फे बिंद्राला हा बहुमान देण्यात आला.
भारताची आजवरची ऑलिम्पिक पदके
सुवर्ण - १०
रौप्य - ९
कांस्य - १६
एकूण - ३५