भारताचे विजयी आघाडीचे लक्ष्य; भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिका; दुसरा एकदिवसीय सामना आज; फलंदाजांच्या कामगिरीवर नजरा संग्रहित छायाचित्र
क्रीडा

भारताचे विजयी आघाडीचे लक्ष्य; भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिका; दुसरा एकदिवसीय सामना आज; फलंदाजांच्या कामगिरीवर नजरा

कटक : कर्णधार रोहित शर्माचा खराब फॉर्म, विराट कोहली तंदुरुस्त झाल्यामुळे संघ निवडीचा पेच या पार्श्वभूमीवर भारतीय संघ रविवारी इंग्लंडविरुद्ध मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. कटक येथे होणारा हा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा आहे.

Swapnil S

कटक : कर्णधार रोहित शर्माचा खराब फॉर्म, विराट कोहली तंदुरुस्त झाल्यामुळे संघ निवडीचा पेच या पार्श्वभूमीवर भारतीय संघ रविवारी इंग्लंडविरुद्ध मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. कटक येथे होणारा हा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा आहे.

तीन सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत भारताने नागपूरमधील एकदिवसीय सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्टार फलंदाज विराट कोहलीला या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जवळ आली असताना विराटची दुखापत ही भारतासाठी चिंताजनक बाब होती. मात्र तो तंदुरुस्त असल्याचे शनिवारी रात्री उशीरा सांगण्यात आले.

संघाचा उपकर्णधार शुभमन गिलने विराट कोहलीच्या पुनरागमनाचे संकेत दिले होते. कोहली दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळू शकतो, असे गिल म्हणाला. कटकच्या या खेळपट्टीवर २०१९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात कोहलीने ८५ धावांची सामना जिंकून देणारी खेळी खेळली होती.

संघातील सहकाऱ्यांसोबत कोहली हा कटक येथे पोहचला आहे. त्यावेळी तो निर्धास्त दिसत होता. भारतीय संघासाठी ही सकारात्मक बाब आहे. मात्र त्याच्या पुनरागमनाने संघ निवडीबाबतचे आव्हान वाढले आहे. विराटच्या पुनरागमनानंतर कोणत्या खेळाडूला संघाबाहेर जावे लागणार याकडे लक्ष लागले आहे.

मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल यांनी निराश केल्यानंतर शुभमन गिल, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल या फलंदाजांनी अर्धशतके झळकावली.

कोहली कोणाची जागा घेणार?

कोहलीच्या अनुपस्थितीत पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरला संघात संधी मिळाली. त्याने त्या संधीचे सोने केले. अय्यरने ३६ चेंडूंत ५९ धावांची मौल्यवान खेळी खेळली. त्यामुळे त्याला दुसऱ्या सामन्यातून वगळणे थोडे कठीण वाटत आहे. युवा फलंदाज यशस्वी जयस्वालला संघाबाहेर बसवले जाण्याचीही शक्यता आहे. तसे झाल्यास शुभमन गिल रोहितसोबत सलामीवीर म्हणून फलंदाजीला येऊ शकतो. यशस्वी जयस्वालला नागपूरच्या सामन्यात विशेष कामगिरी करता आलेली नाही. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे कसा विचार करतात यावरही निवड अवलंबून आहे. डावखुरा आणि उजव्या हाताचा फलंदाज असे कॉम्बिनेशन, खेळपट्टी यावरही संघातील निवड अवलंबून असेल. गेल्या महिन्यात विराटही धावांसाठी झुंजत आहे. खासकरून ऑस्ट्रेलियातील मालिकेनंतर तो धावांसाठी झगडत आहे. यष्टीरक्षक किंवा स्लीपमध्ये तो वारंवार बाद होत आहे. शेवटचा सामना त्याने दिल्लीसाठी रणजी ट्रॉफीसाठी खेळला होता. रेल्वेचा खेळाडू हिमांशू सांगवानच्या गोलंदाजीवर तो बाद झाला होता. या सामन्यात त्याला के‌वळ ६ धावा जमवता आल्या होत्या. मात्र एकदिवसीय क्रिकेट हा कोहलीचा आवडता फॉरमॅट आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १४,००० धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी त्याला केवळ ९४ धावांची आवश्यकता आहे.

रोहितचा खराब फॉर्म

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा फॉर्मच्या शोधात आहे. मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याला केवळ २ धावांवर समाधान मानावे लागले. फटका मारताना त्याचा टायमिंग चुकला आणि मिडविकेटला लिअम लिव्हिंगस्टोनकडे झेल देऊन तो माघारी परतला. ऑगस्टपासून मुंबईच्या या फलंदाजाने कोणत्याही फॉरमॅटमध्ये अर्धशतक झळकावलेले नाही. कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या सामन्यात त्याने ६४ धावा जमवल्या होत्या. त्यानंतर रोहितला फलंदाजीत प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील उर्वरित दोन्ही सामन्यांत रोहितला मोठी खेळी खेळता आली नाही, तर त्याच्या फॉर्मबद्दल शंका उपस्थित होऊ शकते.

शमीला लय सापडली

भारताच्या गोलंदाजी विभागात फारसे बदल होण्याची अपेक्षा नाही. दुखापतीतून परतलेला मोहम्मद शमी चांगली गोलंदाजी करत आहे. मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने ८ षटकांत केवळ ३८ धावा देत एक बळी मिळवला. हर्षित राणाला फिल सॉल्टने फटकावले असले तरी तो विकेट घेण्यात यशस्वी ठरला आहे. त्याने इंग्लंडच्या ३ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती.

इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, बेन डकेट, जो रूट, फिलिप सॉल्ट, जेमी स्मिथ, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हर्टन, जोफ्रा आर्चर, गस ॲटकिन्सन, साकिब महमूद, आदिल रशीद आणि मार्क वूड.

इंग्लंडसाठी ‘करो या मरो’

इंग्लंडसाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे. मालिकेत टिकून राहायचे असल्यास पाहुण्यांना विजय अनिवार्य आहे. कटकची खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करते. त्यामुळे भारतीय फिरकीसमोर धावा जमवण्याचे आव्हान इंग्लंडच्या फलंदाजांपुढे आहे. भारतीय फिरकीपटूंविरुद्ध इंग्लंडचे फलंदाज कशी फलंदाजी करतात? यावर त्यांचे यशापयश अवलंबून असेल.

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती

आंदोलनामुळे हॉटेल, दुकाने बंद; आंदोलकांची झाली गैरसोय, सोबत १५ दिवसांची शिदोरी...

CSMT टाळण्याचे प्रवाशांना रेल्वेचे आवाहन; मराठा आरक्षण आंदोलनामुळे दक्षिण मुंबई ठप्प