अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १७व्या हंगामातील अखेरच्या आठवड्याला आता प्रारंभ होणार आहे. बाद फेरीच्या टप्प्यावर हा थरार पोहोचला असून मंगळवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात ‘क्वालिफायर-१’ लढत रंगणार आहे. त्यामुळे उभय संघांतील या जुगलबंदीत कोणता संघ बाजी मारून सर्वप्रथम अंतिम फेरी गाठण्याचा मान मिळवणार, हे पाहणे रंजक ठरेल.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाताने यंदा अफलातून कामगिरी करताना २०२१नंतर प्रथमच बाद फेरी गाठण्याचा पराक्रम केला. चंद्रकांत पडिंत व गौतम गंभीर या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या या संघाने साखळी फेरीत १४ पैकी सर्वाधिक ९ लढती जिंकून २० गुणांसह अग्रस्थान काबिज केले. त्यामुळे यंदा त्यांना जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र कोलकाताचे गेले २ सामने पावसामुळे रद्द झालेले आहेत. त्यामुळे जवळपास १० दिवस त्यांचा सराव झालेला नाही. तसेच संघातील प्रमुख खेळाडू परतल्यामुळे त्यांना पर्यायाची चाचपणी करता आलेली नाही. अशा स्थितीत ते थेट मैदानात उतरून पुन्हा लौकिकाला साजेशी कामगिरी करणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.
दुसरीकडे पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हैदराबादने संपूर्ण स्पर्धेत तुफानी फलंदाजीच्या बळावर विविध संघांना हादरे दिले. साखळी फेरीत १४ पैकी ८ लढती जिंकून १७ गुणांसह त्यांनी दुसरे स्थान पटकावले. २०२०नंतर प्रथमच हैदराबादने बाद फेरीत प्रवेश केला आहे. विदेशी खेळाडूंभोवती भारतीय खेळाडूंची योग्य बांधणी करून या संघाने आतापर्यंत वाटचाल केली आहे. मात्र कोलकाताविरुद्ध हंगामातील सलामीच्या सामन्यात हैदराबादला पराभव पत्करावा लागला होता. आता ते त्या पराभवाची परतफेड करून २०१८नंतर प्रथमच अंतिम फेरी गाठण्यासाठी आतुर असतील.
अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर यंदाच्या हंगामातील ६ सामन्यांपैकी ४ वेळा धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. तसेच येथे दवाचा घटक निर्णायक भूमिका बजावत असून अहमदाबादमधील गेल्या १२ सामन्यांत फक्त २ वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २००हून अधिक धावा केल्या आहेत. अशा स्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करू शकतो. दोन्ही संघांत तारांकित खेळाडू असल्याने या लढतीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
सॉल्टच्या अनुपस्थितीत नरिन, रसेलवर मदार
कोलकातासाठी यंदा ४३५ धावा करणारा फिल सॉल्ट विश्वचषकाच्या तयारीसाठी मायदेशी परतला आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत सुनील नरिन व आंद्रे रसेल या विंडीजच्या खेळाडूंवर कोलकाताची अधिक भिस्त असेल. नरिनसह रहमनुल्ला गुरबाझ सलामीला येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय वेंकटेश अय्यर, श्रेयस व रिंकू सिंग लयीत आहेत. गोलंदाजीचा विचार करता मिचेल स्टार्कवर सर्वांचे लक्ष असेल. मात्र वरुण चक्रवर्ती व नरिन ही फिरकी जोडी कोलकाताची खरी ताकद आहे. त्याशिवाय हर्षित राणा व वैभव अरोरा या भारतीय वेगवान जोडीनेही आतापर्यंत प्रभावित केले आहे.
सलामीवीर आणि वेगवान त्रिकुट हैदराबादची ताकद
ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या डावखुऱ्या सलामीवीरांची जोडी हैदराबादसाठी या हंगामात सातत्याने तुफानी फटकेबाजी करत आहे. दोघांनी मिळून आतापर्यंत तब्बल ७२ षटकार लगावले आहेत. त्यानंतर हेनरिच क्लासेन, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी असे प्रतिभावान खेळाडू हैदराबादच्या ताफ्यात आहेत. अब्दुल समद व शाहबाज अहमदही अखेरच्या षटकांत हाणामारी करण्यात पटाईत आहेत. गोलंदाजीत कमिन्स, भुवनेश्वर कुमार व टी. नटराजन यांचे वेगवान त्रिकुट हैदराबादची ताकद आहे. विजयकांत वियासकांत व शाहबाज यांच्यावर फिरकीची भिस्त असेल. हैदराबादच्या गोलंदाजांवर कोलकाताच्या नरिन, रसेलला रोखण्याचे दडपण असेल.
पाऊस पडला तर काय?
-अहमदाबादमध्ये यंदा गुजरात वि. कोलकाता यांच्यातील लढत गेल्याच आठवड्यात पावसामुळे रद्द करण्यात आली होती.
-मात्र मंगळवारी होणाऱ्या लढतीत पावसाची शक्यता मुळीच नाही. तसेच दिवसभर तापमानाचा पारा वाढलेला पाहायला मिळू शकतो.
- तरीही पावसाने खोळंबा केल्यास किमान ५ षटकांचा सामना खेळवण्याचा प्रयत्न असेल. तेसुद्धा शक्य झाले नाही तर किमान सुपर-ओव्हरचा प्रयत्न असेल.
-अखेरीस पावसामुळे एकही चेंडू टाकण्यात अपयश आले, तर गुणतालिकेत अग्रस्थान मिळवल्यामुळे कोलकाता अंतिम फेरीत जाईल. हैदराबादला ‘क्वालिफायर-२’मध्ये खेळावे लागेल.
हैदराबाद
-सर्वाधिक धावा -ट्रेव्हिस हेड (५३३, १ शतक, ४ अर्धशतके)
-सर्वाधिक बळी - टी. नटराजन (११ सामन्यांत १७ बळी)
कोलकाता
- सर्वाधिक धावा - सुनील नरिन (४६१, १ शतक, ३ अर्धशतके)
- सर्वाधिक बळी - वरुण चक्रवर्ती (१२ सामन्यांत १८ बळी)
आकडेवारीवर एक नजर
कोलकाताला चौथ्यांदा अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. यापूर्वी त्यांनी २०१२, २०१४, २०२१मध्ये अंतिम फेरी गाठली होती. त्यापैकी २०१२ व २०१४मध्ये जेतेपद मिळवले.
हैदराबादचा संघ चौथ्यांदा अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकतो. त्यांनी २००९, २०१६, २०१८मध्ये अशी कामगिरी केली होती. यांपैकी २००९ व २०१६मध्ये त्यांनी जेतेपद मिळवले.
उभय संघांत आयपीएलमध्ये झालेल्या २६ सामन्यांपैकी कोलकाताने १७, तर हैदराबादने ९ लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे आकडेवारी पाहता कोलकाताचे पारडे जड असले तरी, हैदराबाद त्यांना नक्कीच कडवी झुंज देऊ शकते.
प्रतिस्पर्धी संघ
-कोलकाता नाइट रायडर्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव अरोरा, मिचेल स्टार्क, श्रीकर भरत, दुश्मंता चमीरा, हर्षित राणा, वेंकटेश अय्यर, मुजीब उर रहमान, सुनील नरिन, मनीष पांडे, अंक्रिश रघुवंशी, रहमनुल्ला गुरबाझ, रमणदीप सिंग, नितीश राणा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, शर्फेन रुदरफोर्ड, चेतन साकरिया, सकिब हुसैन, रिंकू सिंग, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती.
-सनरायजर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), अब्दुल समद, अभिषेक शर्मा, मयांक अगरवाल, आकाश सिंग, अनमोलप्रीत सिंग, फझलहक फारुकी, ट्रेव्हिस हेड, मार्को यान्सेन, हेनरिच क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयांक मार्कंडे, एडिन मार्करम, टी. नटराजन, नितीश रेड्डी, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, शाहबाज अहमद, जठवेध सुब्रमण्यम, राहुल त्रिपाठी, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, उपेंद्र यादव, विजयकांत वियासकांत.