आयपीएलच्या गत पर्वाचे संग्रहित छायाचित्र एक्स (@IFootcric68275)
क्रीडा

IPL 2025 : यंदा सलामीचा सामना कोलकात्यात पण कर्णधारांचे फोटोशूट मुंबईत; २० मार्चला BCCI ची सर्व कर्णधारांसह वानखेडेवर बैठक

यंदा इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पहिल्या सामन्यापूर्वी होणारे सर्व कर्णधारांचे छायाचित्रीकरण (फोटोशूट) कोलकाताऐवजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

Krantee V. Kale

मुंबई : यंदा इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पहिल्या सामन्यापूर्वी होणारे सर्व कर्णधारांचे छायाचित्रीकरण (फोटोशूट) कोलकाताऐवजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. गुरुवार, २० मार्च रोजी सर्व कर्णधारांची बैठक मुंबईत होईल. कर्णधारांचे फोटोशूट सहसा हंगामाचा पहिला सामना आयोजित करणाऱ्या शहरात होते. यंदाच्या हंगामातील सलामीचा सामना कोलकात्याच्या ईडन-गार्डन्सवर रंगणार आहे. गेल्या वर्षी चेन्नईमध्ये पहिला सामना झाला होता, त्यामुळे फोटोशूटचा कार्यक्रम देखील तेथेच झाला होता. तथापि, यावेळी मुंबईची निवड करण्यात आली आहे. त्यामागचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

२२ मार्चपासून कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथे आयपीएलचे १८वे पर्व सुरू होईल. कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामीची लढत रंगणार आहे. त्यामुळे ईडन गार्डन्सवर सर्व कर्णधारांचे फोटोशूट होईल, असे अपेक्षित होते. मात्र वानखेडे स्टेडियममध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) मुख्य कार्यालय आहे. तसेच मुंबईतून सर्व शहरांना जाणारी विमान प्रवासासाठी फ्लाइट पकडणे सोयीचे ठरते. या कारणास्तव गुरुवारी बैठक झाल्यावर सायंकाळपर्यंत प्रत्येक संघाचे कर्णधार व व्यवस्थापक आपापल्या सामन्यासाठी रवाना होतील. बीसीसीआयच्या सूत्रांनीच याविषयी माहिती दिली.

यंदा आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या १० संघांपैकी ९ संघांचे कर्णधार हे भारतीय आहेत. त्यापैकी अक्षर पटेल (दिल्ली), रजत पाटिदार (बंगळुरू) प्रथमच आयपीएलमध्ये कर्णधारपदाची भूमिका बजावणार आहेत. २० तारखेला फोटोशूट झाल्यानंतर २१ तारखेपर्यंत सर्व खेळाडू आपापल्या संघात दाखल होतील. मग २२ मार्चपासून आयपीएलच्या पर्वाला थाटात प्रारंभ होईल. २५ मेपर्यंत आयपीएलची रणधुमाळी सुरू असणार आहे.

ग्रँड मुफ्तींच्या प्रयत्नांना यश; निमिषा प्रियाला मोठा दिलासा, येमेन सरकारकडून फाशी तुर्तास स्थगित

पती-पत्नीचा 'सिक्रेट' कॉल पुरावा म्हणून ग्राह्य: घटस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

वडापाव, समोसा, कचोरी म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण; आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी