एक्स @warangalwasi
क्रीडा

IPL 2025 - KKR vs LSG : पूरनपुढे कोलकाता शरण! धावांच्या वर्षावामुळे रंगलेल्या लढतीत लखनऊची ४ धावांनी सरशी

धडाकेबाज डावखुरा फलंदाज निकोलस पूरनने मंगळवारी ३६ चेंडूंत नाबाद ८७ धावांची घणाघाती खेळी साकारली. त्याला मिचेल मार्श (४८ चेंडूंत ८१) आणि मुंबईकर शार्दूल ठाकूर (५२ धावांत २ बळी) यांच्या कामगिरीची उत्तम साथ लाभली.

Swapnil S

कोलकाता : धडाकेबाज डावखुरा फलंदाज निकोलस पूरनने मंगळवारी ३६ चेंडूंत नाबाद ८७ धावांची घणाघाती खेळी साकारली. त्याला मिचेल मार्श (४८ चेंडूंत ८१) आणि मुंबईकर शार्दूल ठाकूर (५२ धावांत २ बळी) यांच्या कामगिरीची उत्तम साथ लाभली. त्यामुळे इंडियन प्रीमियर लीगमध्ये लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाइट रायडर्सवर ४ धावांनी सरशी साधली.

कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर झालेल्या या साखळी सामन्यात लखनऊने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ बाद २३८ धावांचा डोंगर उभारला. त्या प्रत्युत्तरात कोलकातानेही अखेरच्या षटकापर्यंत जोरदार झुंज दिली. मात्र धावांच्या वर्षावात रंगलेल्या या लढतीत कोलकाताला फक्त ४ धावा कमी पडल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे (३५ चेंडूंत ६१) व अन्य फलंदाजांच्या आतषबाजीनंतरही कोलकाताला २० षटकांत ७ बाद २३४ धावांपर्यंतच मजल मारता आली. परिणामी लखनऊने महत्त्वाचे दोन गुण मिळवतानाच स्पर्धेतील तिसरा विजय नोंदवला, तर कोलकाताला तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

कोलकाताचा कर्णधार रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मात्र एडीन मार्करम व मार्श या लखनऊच्या सलामी जोडीने शानदार आक्रमण करताना रहाणेचा निर्णय चुकीचा ठरवला. या दोघांनी ६२ चेंडूंतच ९९ धावांची सलामी नोंदवली. हर्षित राणाने मार्करमचा ४७ धावांवर त्रिफळा उडवला. त्यानंतर आलेल्या पूरनने मात्र आक्रमण सुरूच ठेवले. त्याने व मार्शने दुसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी रचली.

मार्शने स्पर्धेतील चौथे, तर पूरनने तिसरे अर्धशतक साकारले. मुख्य म्हणजे स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत हे दोघेच पहिल्या दोन स्थानी आहेत. पूरनच्या ५ सामन्यांमध्ये २८८, तर मार्शच्या २६५ धावा आहेत. आंद्रे रसेलने मार्शला बाद केल्यावरही पूरनने धडाका कायम राखला. त्याने ७ चौकार व ८ षटकारांची आतषबाजी केली. अब्दुल समद (६) व डेव्हिड मिलर (नाबाद ४) यांनीही अखेरीस योगदान दिले. त्यामुळे लखनऊने सव्वादोनशेच्या पुढे धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताने क्विंटन डीकॉकला (१५) स्वस्तात गमावले. मात्र सुनील नरिन (३०) व रहाणे यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी रचली. पॉवरप्लेनंतर कोलकाताने ९० धावा केल्या होत्या. त्यामुळे सामन्यात चुरस निर्माण झाली. लेगस्पिनर दिग्वेश राठीने नरिनचा अडसर दूर केला. त्यानंतर आलेल्या वेंकटेश अय्यरनेही २९ चेंडूंत ४५ धावा केल्या. रहाणे व वेंकटेशने तिसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भर घातली. ही जोडी धोकादायक ठरत असतानाच शार्दूल लखनऊसाठी धावून आला.

त्याने प्रथम १३व्या षटकात रहाणेला जाळ्यात अडकवले. मग रसेलला (७) बाद करून त्याने कोलकाताला आणखी संकटात टाकले. आकाश दीपने दुसऱ्या बाजूने वेंकटेशलाही माघारी पाठवले. त्यामुळे कोलकाताची धावगती मंदावली. तसेच रसेलच्या पुढे फलंदाजीस आलेल्या रमणदीप सिंग (१), अंक्रिश रघुवंशी (५) यांना छाप पाडता आली नाही. अखेरच्या षटकात २४ धावांची गरज असताना रिंकूने २ चौकार व १ षटकार नक्की लगावला. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता.

पूरन ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर

मूळचा वेस्ट इंडिजचा असलेल्या निकोलस पूरन यंदा आयपीएलमध्ये दमदार लयीत आहे. पाच सामन्यांत पूरनने ३ अर्धशतकांसह २८८ धावा फटकावल्या आहेत. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या म्हणजेच ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पूरन अग्रस्थानी आहे. दुसऱ्या क्रमांकावर लखनऊचाच मिचेल मार्श आहे. त्याच्या २६५ धावा आहेत. गोलंदाजांमध्ये चेन्नईचा नूर अहमद ११ बळींसह पर्पल कॅपच्या शर्यतीत अग्रस्थानी आहे.

संक्षिप्त धावफलक

लखनऊ सुपर जायंट्स : २० षटकांत ३ बाद २३८ (निकोलस पूरन नाबाद ८७, मिचेल मार्श ८१; हर्षित राणा २/५१) विजयी वि.

कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ७ बाद २३४ (अजिंक्य रहाणे ६१, वेंकटेश अय्यर ४५; शार्दूल ठाकूर २/५२)

सामनावीर : निकोलस पूरन

शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा? सर्वोच्च न्यायालयात उद्या अंतिम सुनावणी; राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'घड्याळ'बाबतही फैसला

मुंबई एअरपोर्टवर सोनं तस्करीच्या नव्या 'जुगाड'चा पर्दाफाश! ₹२.१५ कोटींचे सोने जप्त, बांगलादेशी प्रवाशासह एक कर्मचारी अटकेत

ट्रेनमधून उतरवले, ५ तास ताटकळले! देशातल्या आघाडीच्या ॲथलिट्ससोबत पनवेल स्टेशनवर गैरवर्तनाचा Video व्हायरल

'राईचा पर्वत करू नका…'; घटस्फोटाच्या चर्चांवर नेहा कक्करचं स्पष्टीकरण; म्हणाली, माझ्या नवऱ्याला...

उल्हासनगरमध्ये शिवसेनेचाच महापौर; वंचितचा निर्णायक पाठिंबा, भाजप विरोधी बाकांवर बसणार