क्रीडा

SRH vs MI : हैदराबादमध्ये आज हंगामा की हाराकिरी? राजीव गांधी स्टेडियमवर हैदराबादचे फलंदाज आणि मुंबईच्या गोलंदाजांमध्ये जुगलबंदी

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) बुधवारी होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत.

Swapnil S

हैदराबाद : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) बुधवारी होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. हैदराबादच्या उप्पल येथील राजीव गांधी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात फलंदाज हंगामा करणार की पुन्हा हाराकिरी पत्करणार, याकडेच चाहत्यांचे लक्ष असेल. हैदराबादचे फलंदाज विरुद्ध मुंबईचे गोलंदाज यांच्यातील जुगलबंदी या लढतीचे मुख्य आकर्षण आहे.

पॅट कमिन्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हैदराबादने यंदा हंगामाची सुरुवात राजस्थानविरुद्ध २८६ धावांच्या धडाक्यासह केली होती. मात्र त्यानंतर हैदराबादची गाडी रुळावरून घसरली. त्यांना सलग चार पराभवांना सामोरे जावे लागले. मग पंजाबविरुद्ध घरच्या प्रेक्षकांसमोर २४५ धावांचा यशस्वी पाठलाग करून हैदराबादने लय मिळवण्याचे संकेत दिले. मात्र मुंबईविरुद्ध वानखेडेवर त्यांची फलंदाजी ढेपाळली. त्यामुळे ७ सामन्यांतील अवघ्या २ विजयांसह हा संघ तूर्तास गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. आता स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू झाला असून बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी हैदराबादला उर्वरित ७ साखळी सामन्यांपैकी किमान ६ लढती जिंकणे गरजेचे आहे.

दुसरीकडे हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईने नेहमीप्रमाणे हंगामाची सुरुवात काहीशी संथ केली. पहिल्या पाचपैकी मुंबईने फक्त १ सामना जिंकला होता. मात्र गेल्या ३ लढतींमध्ये विजय मिळवून मुंबईने भरारी घेतली आहे. त्यातच गेल्या आठवड्यात हैदराबादला वानखेडेवर सहज धूळ चारल्यामुळे मुंबईचा आत्मविश्वासही उंचावला असेल. ८ सामन्यांतील ४ विजयांसह मुंबईचा संघ तूर्तास गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. मुंबईला बाद फेरी गाठण्यासाठी उर्वरित ६ पैकी किमान ४ लढती जिंकणे गरजेचे आहे.

दरम्यान, हैदराबादच्या खेळपट्टीवर फलंदाजांनी नेहमीच चौकार-षटकारांची आतषबाजी केली आहे. यंदाच्या हंगामात येथे झालेल्या ४ पैकी ३ सामन्यांत धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. तसेच दोन वेळेस प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २४०हून अधिक धावा केल्या आहेत. तर एकदा या धावांचा पाठलागही झाला आहे. बुधवारीही अशीच खेळपट्टी अपेक्षित असल्याने चाहत्यांचे मनोरंजन होईल, हे निश्चित.

हैदराबादच्या संघातील ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिच क्लासेन या धडाकेबाज त्रिकुटाविरुद्ध मुंबईचे ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमरा व दीपक चहर या वेगवान गोलंदाजांची जुगलबंदी लढतीचे मुख्य आकर्षण असेल. त्यामुळे एकूणच या लढतीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

हेड, अभिषेकवर हैदराबादची भिस्त

हैदराबादच्या फलंदाजांची भिस्त ही त्यांच्या सलामीवीरांवर आहे. ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा यांची डावखुरी जोडी कोणत्याही गोलंदाजांची धुलाई करू शकते. गतवर्षी हैदराबादने मुंबईविरुद्ध याच मैदानात २७७ धावा फटकावल्या होत्या. मात्र यंदा त्यांच्यासमोर बोल्ट, बुमरा यांसारख्या दर्जेदार वेगवान गोलंदाजांचे आव्हान असेल. इशान किशनची बॅट काही सामन्यांपासून थंडावलेली आहे. त्यामुळे तोसुद्धा लय मिळवण्यास उत्सुक असेल. हेनरिच क्लासेन उत्तम लयीत आहे. अनिकेत वर्मा व नितीश रेड्डी यांच्याकडून कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे. गोलंदाजीत पॅट कमिन्स, मोहम्मद शमी व हर्षल पटेल या वेगवान त्रिकुटावर हैदराबादची मदार असेल. मात्र गोलंदाजीच हैदराबादसाठी चिंतेचा विषय आहे. फिरकीपटू झीशान अन्सारी व राहुल चहर यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. इशान मलिगांचा पर्यायही त्यांच्याकडे आहे.

सांघिक कामगिरी मुंबईची ताकद

विजयी हॅटट्रिकमुळे लय गवसलेल्या मुंबईकडून पुन्हा एकदा चमकदार खेळ अपेक्षित आहे. सांघिक कामगिरी हे मुंबईच्या यशाचे फलित आहे. रोहित शर्माला गवसलेला सूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा यांची दमदार फलंदाजी यामुळे मुंबईतही मोठी धावसंख्या रचण्याची किंवा धावांचा पाठलाग करण्याची क्षमता आहे. रायन रिकेल्टन, विल जॅक्स व हार्दिकही फटकेबाजी करू शकतात. मुंबईच्या फलंदाजीचा क्रम कसा असेल, हे सांगता येणे मात्र कठीण आहे. गोलंदाजी मुंबईची खरी ताकद असून बोल्ट, बुमरा व चहर यांच्या वेगवान त्रिकुटाविरुद्ध हैदराबादचे फलंदाज कशी कामगिरी करणार, हे पाहणे रंजक ठरेल. तसेच कर्ण शर्मा या लढतीसही दुखापतीमुळे मुकण्याची शक्यता असल्याने युवा विघ्नेश पुथूरला संधी मिळू शकते. मिचेल सँटनर पुन्हा एकदा अष्टपैलू भूमिका बजावण्यास सज्ज आहे.

उभय संघांत आतापर्यंत झालेल्या २४ सामन्यांपैकी मुंबईने १४, तर हैदराबादने १० सामने जिंकले आहेत. त्यामुळे आकडेवारीनुसार मुंबईचे पारडे जड असले तरी हैदराबादचा संघ पलटवार करू शकतो, याची त्यांना कल्पना आहे. २०२४मध्ये उभय संघांतील दोन लढतींपैकी एकदा मुंबईने, तर एकदा हैदराबादने विजय मिळवला.

तिलकची घरवापसी

मुंबई इंडियन्सकडून खेळणारा तिलक हा मूळचा हैदराबादचा आहे. त्यामुळे तिलकची या लढतीच्या निमित्ताने घरवापसी झाली. मंगळवारी सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत त्याने आपल्या कुटुंबीयांसमोर या लढतीत मुंबईला विजय मिळवून देण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.

प्रतिस्पर्धी संघ

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, दीपक चहर, मिचेल सँटनर, रायन रिकल्टन, रीस टॉप्ली, रॉबिन मिन्झ, कर्ण शर्मा, विघ्नेश पुथूर, बेव्हन जेकब्स, सत्यनारायण राजू, राज बावा, अश्वनी कुमार, क्रिशन श्रीजिथ, अर्जुन तेंडुलकर, मुजीब उर रहमान, कॉर्बिन बोश.

सनरायजर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, हेनरिच क्लासेन, अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, अभिनव मनोहर, अनिकेत वर्मा, अथर्व तायडे, इशान मलिंगा, हर्षल पटेल, इशान किशन, जयदेव उनाडकट, कामिंदू मेंडिस, मोहम्मद शमी, राहुल चहर, सचिन बेबी, सिमरजीत सिंग, झीशान अन्सारी, वियान मल्डर, रविचंद्रन स्मरण.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक