PC : IPL/X
क्रीडा

लाळ बंदी मागे, वाइड बॉलसाठी रिव्ह्यू आणि सायंकाळच्या सामन्यात...; बीसीसीआयकडून IPL च्या नियमांत मोठे बदल; बघा डिटेल्स

IPL 2025 : अखेर गोलंदाजांनी केलेल्या विनंतीचा मान राखून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामासाठी काही आमूलाग्र बदल केले आहेत.

Swapnil S

मुंबई : अखेर गोलंदाजांनी केलेल्या विनंतीचा मान राखून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामासाठी काही आमूलाग्र बदल केले आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये क्षेत्ररक्षण करणारा संघ चेंडूला लकाकी देण्यासाठी लाळेचा वापर करू शकतात. बीसीसीआयने गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या बैठकीत सर्व कर्णधारांच्या संमतीने हा निर्णय घेतला.

२२ मार्चपासून कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर आयपीएलचे १८वे पर्व धडाक्यात सुरू होईल. पांढऱ्या चेंडूने खेळवण्यात येणाऱ्या या टी-२० स्पर्धेत गोलंदाजांना आधीच धावा रोखताना फार संघर्ष करावा लागू शकतो. त्यामुळे माजी क्रिकेटपटूंसह भारताच्या मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमरा यांसारख्या प्रमुख वेगवान गोलदाजांनी चेंडू रिव्हर्स स्विंग करण्यासाठी लाळेचा वापर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयसीसीने अद्याप यावरील बंदी उठवलेली नसली, तरी बीसीसीआयने मात्र आयपीएलसाठी गोलंदाजांना स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे आता गोलंदाज चेंडू चमकवण्यासाठी घाम न वापरता लाळेचा उपयोग करू शकतात.

मे २०२०मध्ये कोरोनामुळे बीसीसीआयने ला‌ळेचा वापर करण्यावर बंदी आणली होती. त्यानंतर सप्टेंबर २०२२मध्ये आयसीसीने सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये हा नियम लागू केला. तेव्हापासून गोलंदाज लाल चेंडू असो वा पांढरा, त्यावर फक्त घाम लावून तो स्विंग करण्याचा प्रयत्न करायचे. मात्र आता कोरोनाचा धोका टळल्याने आयपीएलसारख्या वेगवान स्पर्धेत गोलंदाजांना दिलासा मिळणार आहे. आयसीसीसुद्धा लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही यासाठी परवानगी देईल, असे क्रीडाप्रेमींना अपेक्षित आहे.

“आयपीएलमध्ये आता गोलंदाजांना चेंडूला लाळ लावण्यास परवानगी असेल. सुरुवातीला काही संघांच्या कर्णधारांनी यास विरोध दर्शवला होता. तसेच काहींनी चिंता व्यक्त केली. मात्र शेवटी सर्वही कर्णधार या नियमासाठी तयार झाले. त्याशिवाय गोलंदाजांच्या दृष्टीने व सामने अधिक पारदर्शक व्हावेत, यासाठी आणखी २ नियम लागू करण्यात आले आहेत,” असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने म्हटले.

दरम्यान, वानखेडे स्टेडियममधील बीसीसीआयच्या मुख्यालयात गुरुवारी झालेल्या बैठकीसाठी आयपीएलमधील १० संघांचे कर्णधार उपस्थित होते. यानंतर सर्व कर्णधारांचे ‘गेट वे ऑफ इंडिया’ समोर छायाचित्रीकरण झाले. बीसीसीआय आणि सर्व कर्णधारांच्या बैठकीत आणखीही काही मुद्द्यांवर चर्चा झाली. यामध्ये इम्पॅक्ट प्लेयर नियम मात्र कायम ठेवण्यात आला आहे.

वेगवान गोलंदाजांकडून नियमाचे स्वागत

मे २०२०मध्ये कोरोनामुळे बीसीसीआयने ला‌ळेचा वापर करण्यावर बंदी आणली होती. त्यानंतर सप्टेंबर २०२२मध्ये आयसीसीने सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये हा नियम लागू केला. तेव्हापासून गोलंदाज लाल चेंडू असो वा पांढरा, त्यावर फक्त घाम लावून तो स्विंग करण्याचा प्रयत्न करायचे. मात्र आता कोरोनाचा धोका टळल्याने आयपीएलसारख्या वेगवान स्पर्धेत गोलंदाजांना दिलासा मिळणार आहे. सिराजने याविषयी मत व्यक्त करताना आयपीएलमध्येही आता आम्हाला रिव्हर्स स्विंगसाठी पुरेसे सहाय्य मिळेल, असे म्हटले. तसेच दवावर नियंत्रण मिळवण्यासाठी अंमलात आणलेल्या दुसऱ्या नव्या चेंडूच्या नियमाचेही सिराजने स्वागत केले.

हे नवे नियम यंदा अंमलात

-वाइड चेंडूंसाठी रिव्ह्यू उपलब्ध

उंचीवर असलेल्या तसेच ऑफस्टम्प बाहेरील वाईड चेंडूसाठी आता संघांना रिव्ह्यू घेण्याची मुभा आहे. यासाठी हॉक आय आणि बॉल ट्रॅकिंग प्रणालीचा अवलंब केला जाईल. म्हणजेच एखाद्या फलंदाजाला वाटले की चेंडू त्याच्या डोक्यावरून अथवा ऑफ साइडला वाइड रेषेच्या बाहेरून जात असतानाही पंचांनी वाइड दिला नसेल, तर तो आता रिव्ह्यू घेऊ शकतो.

-सायंकाळच्या सामन्यात दोन चेंडू

सायंकाळी रंगणाऱ्या सामन्यात दुसऱ्या डावात आता ११व्या षटकानंतर चेंडू बदलण्याची मुभा असेल. म्हणजेच ७.३० वाजता सुरू होणाऱ्या लढतींमध्ये नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरणार नाही. बहुतांश मैदानात सायंकाळी प्रचंड दव येते. त्यामुळे दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करणे सोपे जाते. मात्र आता दुसऱ्या डावात गोलंदाजी करणारा संघ ११व्या षटकानंतर नवा चेंडू घेऊ शकतो. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय हे दवाची स्थिती पाहून मैदानातील पंच घेतील.

-षटकांच्या संथ गतीसाठी कारवाई रद्द

एका हंगामात तीन वेळा षटकांची गती संथ राखल्यास त्या संघाच्या कर्णधाराला पुढील सामन्याला मुकावे लागते. मात्र बीसीसीआयने या हंगामापासून हा नियम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणत्याही कर्णधारावर संघाबाहेर बसण्याची वेळ येणार नाही. मात्र त्यांना आर्थिक भुर्दंड पडणार आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या मात्र पहिल्या सामन्याला मुकणार आहे. कारण २०२४च्या अखेरच्या लढतीत मुंबईने हंगामात तिसऱ्यांदा षटकांची गती संथ राखली होती. त्यामुळे तो चेन्नईविरुद्ध खेळू शकणार नाही.

यंदा ५० शहरांत फॅन पार्क

आयपीएलमध्ये यंदाही फॅन पार्कची सुविधा उपलब्ध असेल. स्टेडियममध्ये जाऊन सामना न पाहू शकणाऱ्या चाहत्यांना या फॅन पार्कमध्ये मोफत मोठ्या स्क्रीनवर आयपीएलच्या सामन्यांचा आनंद लुटता येईल. यंदा २३ राज्यांतील ५० शहरांत फॅन पार्कचे आयोजन करण्यात येईल. टिनसुकिया, रोहतक, बिकानेर, कोची येथे प्रथमच फॅन पार्क असेल. देशाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्यापर्यंत क्रिकेट पोहोचावे, हा यामागील हेतू असतो.

सुरक्षेमुळे कोलकाता-लखनऊ सामन्याच्या ठिकाणात बदल

कोलकाता-लखनऊ यांच्यात ६ एप्रिल रोजी ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणारा सामना आता गुवाहाटी येथे खेळवण्यात येईल. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष स्नेहशिष गांगुली यांनी याविषयी माहिती दिली. ६ एप्रिल रोजी रामनवमी असल्याने कोलकाता पोलिसांनी या लढतीसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवण्यास असमर्थन दर्शवले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव ही लढत कोलकाताऐवजी गुवाहाटी येथे होईल. कोलकातामध्ये रामनवमीच्या दिवशी २० हजार मिरवणुका निघणार असल्याचे समजते. यापूर्वी २०२३मध्ये एकदिवसीय विश्वचषकात छटपूजेच्या निमित्ताने कोलकातामधील एक सामना काही दिवसांनी आयोजित करण्यात आला होता.

ग्रँड मुफ्तींच्या प्रयत्नांना यश; निमिषा प्रियाला मोठा दिलासा, येमेन सरकारकडून फाशी तुर्तास स्थगित

पती-पत्नीचा 'सिक्रेट' कॉल पुरावा म्हणून ग्राह्य: घटस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

वडापाव, समोसा, कचोरी म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण; आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी