क्रीडा

आयपीएलचे 'फटाके' आज फुटणार! लिलावापूर्वी संघात कायम राखलेल्या खेळाडूंची नावे स्पष्ट होणार; चर्चांना उधाण

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १८व्या हंगामासाठी लवकरच खेळाडूंची लिलाव प्रकिया होणार आहे. त्यापूर्वी गुरुवारी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आयपीएलमधील फटाके फुटणार आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली: इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १८व्या हंगामासाठी लवकरच खेळाडूंची लिलाव प्रकिया होणार आहे. त्यापूर्वी गुरुवारी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आयपीएलमधील फटाके फुटणार आहेत. १० संघांनी आपापल्या ताफ्यात कोणत्या खेळाडूंना कायम राखले आहे (रिटेन), हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे याविषयी सध्या क्रीडाप्रेमींमध्ये जबरदस्त चर्चा रंगत असून याविषयी विविध तर्कवितर्वांना उधाण आले आहे. दरवर्षीप्रमाणे २०२५मध्येही एप्रिल-मे महिन्यात आयपीएलच्या मनोरंजनाचा हंगाम पार पडणार आहे. त्यासाठी नोव्हेंबर ते डिसेंबरच्या काळात खेळाडूंची लिलाव प्रकिया होते. त्यातच यावेळी मेगा-ऑक्शन होणार असल्याने प्रत्येक संघाला ५ खेळाडू संघात कायम राखण्याची व अन्य एका खेळाडूसाठी 'राइट टू मॅच' कार्ड वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. अशा स्थितीत रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर यांसारख्या खेळाडूंविषयी त्यांचा संघ काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

नेहमीप्रमाणे यंदाही १० संघ आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत. २००८ पासून सुरू झालेल्या आयपीएलचे २०२४मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने विजेतेपद मिळवले. आयपीएलच्या कार्यकारी समितीची सप्टेंबरच्या अखेरीस बैठक झाली होती. त्यावेळी ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व संघमालकांना संघात कायम राखलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करण्याची मुदत देण्यात आली होती.

त्याशिवाय बीसीसीआयने स्पर्धेशी निगडीतही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलले आहेत. कोणत्याही विदेशी खेळाडूला मेगा ऑक्शनसाठी नोंदणी करावी लागेल. या मेगा ऑक्शनसाठी परदेशी खेळाडूने नोंदणी न केल्यास पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल लिलावात तो नोंदणीसाठी अपात्र ठरेल. तसेच एखादा खेळाडू जो लिलावासाठी नोंदणी करतो आणि लिलावात निवड झाल्यानंतर, हंगाम सुरू होण्यापूर्वी स्वतःला अनुपलब्ध करतो, त्याला आता दोन हंगामांसाठी स्पर्धा आणि लिलावामध्ये भाग घेण्यास बंदी घालण्यात येईल.

एकूणच सध्या कोणता संघ कोणकोणत्या खेळाडूंना कायम राखणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे दुपारी ४ वाजल्यापासून स्टार स्पोट्र्ट्स वाहिनीवर या रिटेन्शनचे थेट प्रक्षेपण पाहणे चुकवू नका.

हे मुद्दे चुकवू नका

- कायम ठेवण्यात येणाऱ्या सहा खेळाडूंमध्ये लिलावात एका राइट टू मॅच कार्डचा (आरटीएम) समावेश असेल. लिलावात संघांना १२० कोटी रुपये खर्च करता येतील, अखेरच्या 'आयपीएल 'मध्ये संघांना केवळ चार खेळाडू कायम ठेवण्याची मुभा होती.

- कायम ठेवण्यात येणाऱ्या पहिल्या तीन खेळाडूंसाठी अनुक्रमे १८ कोटी, १४ कोटी आणि ११ कोटी रुपये संघ मालकांना राखून ठेवावे लागतील. यानंतर संघ मालकांनी आणखी दोन खेळाडूची निवड केल्यास त्यांना पुन्हा अनुक्रमे १८ आणि १४ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. त्यामुळे १२० कोटीतून ७५ कोटी गेल्यास उर्वरित ४५ कोटींमध्ये त्यांना १५ खेळाडू घ्यावे लागतील. ७५ कोटींपैकी एखाद्या खेळाडूला कमी-जास्त मानधन द्यायचे असल्यास, त्याचा निर्णय संघमालक घेऊ शकतील.

- ६ खेळाडूंमध्ये पाच कॅप्ड (आंतरराष्ट्रीय अनुभव असलेले) खेळाडू असू शकतात. तसेच २ अनकॅप्ड खेळाडू (बिगरआंतरराष्ट्रीय) कायम राखल्यास ४ कॅप्ड खेळाडूंनाच संघात कायम राखता येईल. अनकॅप्ड खेळाडूची किंमत ४ कोटी असेल.

- उदाहरणार्थ, मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमरा आणि तिलक वर्मा यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यास सहावा खेळाडू त्यांना भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्यापैकी निवडावा लागेल.

वेळ : दुपारी ४ वाजल्यापासून थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, स्पोर्ट्स १८ वाहिनी आणि जिओ सिनेमा अॅप

जरांगेंचे ३ नोव्हेंबरला ठरणार; उमेदवार, मतदारसंघ जाहीर करणार

शिंदे, अजितदादा गटात भाजपच्या १६ नेत्यांची घुसखोरी!

सिंचन घोटाळा चौकशी फाईल गोपनीयतेचा भंग नाही; देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट

सत्तेसाठी एखाद्याचा पक्ष फोडणे अनुचित; शरद पवारांचे टीकास्त्र

दाऊदशी आपले नाव जोडणाऱ्यांना कोर्टात खेचणार; नवाब मलिक यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा