एक्स - आयपीएल
क्रीडा

१७ मेपासून पुन्हा आयपीएलच्या उर्वरित हंगामाची रणधुमाळी; आता ३ जून रोजी होणार महाअंतिम मुकाबला, बघा डिटेल्स

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा १८वा हंगाम किमान पुढील आठवडाभर स्थगित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला होता. आता शनिवार, १७ मेपासून पुन्हा एकदा आयपीएलचा उर्वरित हंगाम सुरू होणार आहे.

Swapnil S

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा १८वा हंगाम किमान पुढील आठवडाभर स्थगित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला होता. आता शनिवार, १७ मेपासून पुन्हा एकदा आयपीएलचा उर्वरित हंगाम सुरू होणार आहे. मंगळवार, ३ जून रोजी स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयपीएल तूर्तास स्थगित करण्यात आली होती. पुढील आठवडाभर देशभरातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयपीएलच्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनाचा विचार करू, असे बीसीसीआयचे सचिव देवजीत साइकिया यांनी त्यावेळी सांगितले.

२२ मार्चपासून आयपीएलचा १८वा हंगाम धडाक्यात सुरू झाला. गुरुवार, ८ मे रोजी पंजाब-दिल्ली यांच्यात धरमशाला येथे आयपीएलचा ५८वा सामना खेळवण्यात येत होता. मात्र पंजाब तसेच जम्मू-कश्मीर येथे पाकिस्तानने ड्रोनद्वारे केलेल्या हल्ल्यांमुळे ही लढत मध्यातच स्थगित करण्यात आली. धरमशाला येथे संपूर्ण ब्लॅक आऊट करण्यात आल्याने स्टेडियमचे प्रकाश पुरवणारे टॉवर अचानक बंद झाले. हळूहळू चारही टॉवर बंद झाल्यावर प्रेक्षकांना स्टेडियम सोडून जाण्यास सांगण्यात आले. बीसीसीआय तसेच मैदानातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ही स्थिती योग्यपणे हाताळली. खेळाडू तसेच सामनाधिकारी, समालोचकांना सुरक्षित स्थळी नेण्यास बीसीसीआयने विशेष सुविधाही पुरवली.

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताच्या २६ निष्पाप जणांचा बळी गेला. या हल्ल्याला भारताने ६ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे चोख प्रत्युत्तर दिले. या मोहिमेअंतर्गत भारताने ९ दहशतवादी तळांवर हल्ले केले. त्यामुळेच पाकिस्तानने ८ मे रोजी पुन्हा प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सैन्याने त्यांचे सर्व हल्ले उधळवून लावले. तसेच पाकिस्तानमधील काही शहरातही हल्ले केले. या सर्व युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात आयपील सुरू ठेवणे नैतिकदृष्या तसेच सुरक्षेच्या कारणास्तव चुकीचेच ठरत होते. परिणामी गुरुवारी फक्त सामना अर्ध्यात स्थगित केल्यानंतर शुक्रवारी संपूर्ण स्पर्धात किमान आठवडाभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला.

“देशातील सद्यस्थिती पाहता आयपीएलचा उर्वरित हंगाम एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत. आयपीएलच्या प्रशासकीय समितीसोबत झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली. स्पर्धेच्या उर्वरित हंगामाच्या आयोजनाबाबत तसेच ठिकाणाविषयी पुढील काही दिवसांत स्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. सर्व संघमालकांनी एकमताने यास होकार दर्शवला असून तूर्तास देशाच्या सुरक्षिततेला आमचे प्राधान्य आहे,” असे बीसीसीआयचे सचिव साइकिया त्यावेळी म्हणाले होते.

त्याशिवाय आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनीही या मताला दुजोरा दिला. “गुरुवारी सामना स्थगित झाल्यावरच आम्ही शुक्रवारी बैठक घेण्याचे ठरवले. सर्व भागधारक, प्रसारक व संघमालक यांच्याशी आम्ही आयपीएल स्थगित करण्याबाबत संवाद साधला. त्यांनीही देशात चिंतेचे वातावरण असताना स्पर्धा खेळवण्यास असमर्थन दर्शवले. त्यामुळे एकमताने पुढील काही दिवस आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” असे धुमाळ म्हणाले.

आयपीएलचा अंतिम सामना २५ मे रोजी होणार होता. फक्त शेवटचे १६ सामने शिल्लक होते. यामध्ये १२ साखळी सामने, तर चार लढती बाद फेरीच्या आहेत. मात्र सध्या ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये आयपीएलचे उर्वरित सामने खेळवण्यात येतील, असे समजते. गुरुवारीच पंजाब-मुंबई यांच्यात धरमशाला येथे होणारा सामना अहमदाबाद येथे होईल, असे जाहीर करण्यात आले होते.

दक्षिण मुंबईला मिळणार पहिले आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्र; मुंबई पोर्टकडून DPR साठी तांत्रिक सल्लागारांची मागणी

राज्य सरकारची भूमिका मोदींच्या मतांहून वेगळी का? POP गणेशमूर्तींबाबत हायकोर्टाचा सवाल

कोकणात ऑरेंज अलर्ट, वादळी वाऱ्यांचा इशारा; घाटमाथा, विदर्भातही मुसळधार पावसाचा अंदाज

पोलिसी लाठीमाराचे समर्थन होऊ शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

Mumbai : वाहतूककोंडीवर भूमिगत बोगद्यांचा उतारा; सहा महिन्यांत आराखडा; ४ ते ५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित