IPL 2026 : चेन्नईला आज विजय अनिवार्य; खेळाडूंच्या दुखापतींची चिंता असतानाच एकाना येथे लखनऊविरुद्ध लढत (Photo-@khelnow)
क्रीडा

IPL 2026 : चेन्नईला आज विजय अनिवार्य; खेळाडूंच्या दुखापतींची चिंता असतानाच एकाना येथे लखनऊविरुद्ध लढत

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहायचे असेल, तर चेन्नई सुपर किंग्जला शुक्रवारी विजय मिळवणे अनिवार्य आहे.

Swapnil S

लखनऊ : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहायचे असेल, तर चेन्नई सुपर किंग्जला शुक्रवारी विजय मिळवणे अनिवार्य आहे. एकामागून एक खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर जात असतानाच चेन्नईची शुक्रवारी एकाना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्सशी गाठ पडणार आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.

२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. बहुतांश लढतींमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. मात्र गेल्या काही दिवसांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनीही बाजी मारली आहे. त्यामुळे बॅट-बॉलमधील द्वंद्व रंगतदार होत आहे. नाणेफेकीच्या कौलावर विसंबून न राहता कोणत्याही क्षणी सामन्यांची दिशा बदलत आहे. प्रत्येक लढतीनंतर गुणतालिकेचे समीकरण आणखी रंजक होत आहे.

दरम्यान, ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नईला आधीच महेंद्रसिंह धोनीची अनुपस्थिती जाणवत आहे. त्यात आयुष म्हात्रे, नॅथन एलिस, खलिल अहमद असे खेळाडू स्पर्धेबाहेर गेल्यावर आता जेमी ओव्हर्टनदेखील स्नायूंच्या दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेला मुकणार आहे. त्यामुळेच चेन्नईपुढील आव्हानांत वाढ झाली आहे. लखनऊविरुद्धच काही दिवसांपूर्वी झालेल्या लढतीत ओव्हर्टनने महत्त्वाच्या क्षणी बळी मिळवले होते. ओव्हर्टनच्या जागी आता दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू डायन फोरस्टरला संधी देण्यात आली आहे. चेन्नईने ११ पैकी ६ सामने जिंकले असून त्यांना उर्वरित ३ पैकी किमान २ लढती जिंकणे गरजेचे आहे.

चेन्नईची फलंदाजी प्रामुख्याने संजू सॅमसनवर अवलंबून आहे. मात्र उर्विल पटेलच्या रूपात चेन्नईला नवा तारा गवसला आहे. ऋतुराज, कार्तिक शर्मा, शिवम दुबे यांना सातत्याने संघर्ष करावा लागत आहे. एकानाच्या खेळपट्टीवर गोलंदाजांना नेहमीच सहाय्य लाभते. त्यामुळे नूर अहमद व अकील होसैन यांनी फिरकी जोडी व अंशुल कंबोजवर वेगवान माऱ्याची भिस्त असेल. चेन्नई प्रशांत वीरच्या जागी एखाद्या विदेशी खेळाडूला संधी देऊ शकते.

दुसरीकडे ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या लखनऊचे आव्हान संपुष्टात आले आहे. मात्र गेल्या सामन्यात त्यांनी चेन्नईला अखेरच्या षटकापर्यंत विजयसाठी झुंझवले होते. जोश इंग्लिस, मिचेल मार्श, एडीन मार्करम, निकोलस पूरन असे धडाकेबाज चार विदेशी फलंदाज त्यांच्या ताफ्यात आहेत. पंतला मात्र चमक दाखवता आलेली नाही. आयुष बदोनी, मुकुल चौधरी या खेळाडूंना लखनऊचा संघ संधी देणे टाळत आहे. गोलंदाजीत प्रिन्स यादव त्यांचे मुख्य शस्त्र आहे. मोहम्मद शमी व दिग्वेश राठी यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. आवेश खान व मोहसिन खान यांनाही संघर्ष करावा लागत आहे. मात्र लखनऊ किमान १०व्या क्रमांकावरून वरती येण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे चेन्नईला सावध रहावे लागेल.

उभय संघांत आतापर्यंत ७ सामने झाले आहेत. त्यांपैकी चेन्नईने ३, तर लखनऊनेदेखील ३ लढती जिंकल्या आहेत. एक सामना रद्द करण्यात आला होता. आता उभय संघांतील द्वंद्वात कोण आघाडी घेणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

खेळपट्टीचा अंदाज

संथ खेळपट्टीवर शुक्रवारचा सामना होणार आहे. येथे १६० धावांचा पाठलाग करणेही कठीण गेले आहे. त्यामुळे फिरकीपटूंची कामगिरी निर्णायक ठरेल. लढतीवर पावसाचे सावट नाही. कोलकाता-लखनऊ, राजस्थान-लखनऊ या लढती याच खेळपट्टीवर झाल्या होत्या.

प्रतिस्पर्धी संघ

लखनऊ सुपर जायंट्स : ऋषभ पंत (कर्णधार), अक्षत रघुवंशी, मॅथ्यू ब्रीट्झके, हिम्मत सिंग, एडीन मार्करम, अब्दुल समद, आयुष बदोनी, मुकुल चौधरी, जोश इंग्लिस, निकोलस पूरन, अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, शाहबाज अहमद, आकाश सिंग, आवेश खान, मोहम्मद शमी, मोहसिन खान, आनरिच नॉर्किए, प्रिन्स यादव, मोहसिन खान, दिग्वेश राठी, मणिमरन सिद्धार्थ, अर्जुन तेंडुलकर, मयांक यादव.

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, संजू सॅमसन, अकील होसेन, अमन खान, अंशुल कंबोज, डेवाल्ड ब्रेविस, गुर्जापनित सिंग, जेमी ओव्हर्टन, कार्तिक शर्मा, मॅट हेन्री, मॅथ्यू शॉर्ट, मुकेश चौधरी, नूर अहमद, प्रशांत वीर, राहुल चहर, सर्फराझ खान, शिवम दुबे, श्रेयस गोपाळ, उर्विल पटेल, झॅक फोल्क्स, आकाश मढवाल, स्पेन्सर जॉन्सन.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

Mumbai Water Cut: मुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात

ठाण्यातील ४६ विहिरींचे पुनरुज्जीवन होणार; आर.ओ. प्लांटद्वारे नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध होणार

Navi Mumbai : रॅपिडोच्या नावाखाली दुचाकी चोरणारा जेरबंद; ५ मोटारसायकलींसह २ मोबाईल जप्त करत ७ गुन्हे उघडकीस

Mumbai : पश्चिम रेल्वेवर आज रात्री मोठा ब्लॉक; धीम्या मार्गावर ११.३१ वाजता शेवटची लोकल

वाहनांना HSRP प्लेट बसविणे अनिवार्य; नियमभंग केल्यास १ हजार रुपयांचा दंड