IPL 2026 : गिल आणि गुजरातची कसोटी; पहिल्या विजयाची अद्याप प्रतीक्षा; लयीत असलेल्या दिल्लीशी आज गाठ 
क्रीडा

IPL 2026 : गिल आणि गुजरातची कसोटी; पहिल्या विजयाची अद्याप प्रतीक्षा; लयीत असलेल्या दिल्लीशी आज गाठ

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) बुधवारी अरुण जेटली स्टेडियमवर (पूर्वीचे कोटला) कर्णधार शुभमन गिल आणि त्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरात टायटन्सचा कस लागणार आहे. सलग दोन पराभवांमुळे गुजरातला अद्यापही यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची प्रतीक्षा असून त्यांच्यासमोर यजमान तसेच सलग दोन सामने जिंकणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचे कडवे आव्हान असेल.

Swapnil S

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) बुधवारी अरुण जेटली स्टेडियमवर (पूर्वीचे कोटला) कर्णधार शुभमन गिल आणि त्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरात टायटन्सचा कस लागणार आहे. सलग दोन पराभवांमुळे गुजरातला अद्यापही यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची प्रतीक्षा असून त्यांच्यासमोर यजमान तसेच सलग दोन सामने जिंकणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचे कडवे आव्हान असेल. मात्र या लढतीवरही पावसाचे सावट कायम असेल.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.

२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. काही लढतींमध्ये धावांचा वर्षाव पाहायला मिळाला, तर काही सामन्यांत गोलंदाजांनी फलंदाजांना रोखले. तसेच बहुतांश लढतींमध्ये नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. यंदादेखील प्रत्येक संघाला १४ सामने खेळायचे आहेत. त्यांपैकी ७ लढती या घरच्या मैदानात, तर उर्वरित ७ लढती प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात होतील.

दरम्यान, २०२२च्या विजेत्या गुजरातला यंदा अनुक्रमे पंजाब व राजस्थानकडून पराभव पत्करावा लागला आहे. विशेषत: राजस्थानविरुद्ध घरच्या मैदानात खेळूनही गुजरातला १२ चेंडूंत १५ धावा करता आल्या नाही. राजस्थानविरुद्ध गिल आजारी असल्याने खेळू शकला नव्हता. मात्र बुधवारी दिल्लीविरुद्ध खेळण्यासाठी तो सज्ज आहे. या संघाची फलंदाजी प्रामुख्याने आघाडीच्या तिघांवर अवलंबून आहे. गिल, साई सुदर्शन व जोस बटलर यांच्या व्यतिरिक्त मधल्या फळीने जबाबदारी घेणे गरजेचे आहे. गोलंदाजीत मोहम्मद सिराज व कगिसो रबाडा यांना अद्याप छाप पाडता आलेली नाही. रशिद खानने गेल्या लढतीत सूर गवसल्याचे संकेत दिले. वॉशिंग्टन सुंदर, शाहरूख खान व राहुल तेवतिया यांना कामगिरी उंचवावी लागणार आहे.

दुसरीकडे अक्षर पटेलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीने आतापर्यंत दोन्ही सामने सहज जिंकताना अनुक्रमे लखनऊ व मुंबई यांना पराभूत केले. मधल्या फळीतील युवा फलंदाज समीर रिझवी दोन्ही विजयांचा शिल्पकार ठरला आहे. मात्र सलामीवीर के. एल. राहुलच्या कामगिरीची दिल्लीला चिंता आहे. राहुल दोन्ही लढतींमध्ये पहिल्याच षटकात माघारी परतला. तसेच नितीश राणा, अक्षर व पथुम निसांका यांच्याकडून दिल्लीला योगदान अपेक्षित आहे. गोलंदाजीत नटराजन, लुंगी एन्गिडी यांची वेगवान जोडी लयीत असून कुलदीप यादव आणि विपराज निगम यांची फिरकी जोडी प्रभावी कामगिरी करत आहे. त्यामुळे घरच्या मैदानात खेळताना पुन्हा दिल्लीचेच पारडे जड मानले जात आहे.

अरुण जेटली स्टेडियमच्या खेळपट्टी क्रमांक पाचवर ही लढत होईल. येथे षटकामागे १०च्या सरासरीने धावा केल्या जातात. तसेच दिल्लीच्या रिझवीला या लढतीत अनोखा विक्रम खुणावत आहे. त्याने सलग तीन लढतींमध्ये सामनावीर पुरस्कार (२०२५मध्ये शेवटची लढत व २०२६मध्ये पहिले दोन सामने) मिळवला आहे. आता सलग चौथ्यांदा हा पुरस्कार मिळवणारा आयपीएलमधील पहिला खेळाडू ठरण्याचा मान रिझवी मिळवणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

उभय संघांत आतापर्यंत ७ सामने झाले आहेत. त्यांपैकी गुजरातने ४, तर दिल्लीने ३ लढती जिंकल्या आहेत. मुख्य म्हणजे गतवर्षी गुजरातने दिल्लीला दोन्ही साखळी लढतींत धूळ चारली होती. त्यामुळे दिल्लीचा संघ यावेळी वचपा घेण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.

पावसाचे सावट

दिल्ली येथे मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. त्याचप्रमाणे बुधवारीही दुपारी ४ ते ५च्या दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा स्थितीत सामना पूर्ण होईल की नाही, याविषयी साशंका आहे. मैदान आकाराने लहान असल्याने धावांचा पाठलाग करणे सोपे ठरेल.

प्रतिस्पर्धी संघ

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, टॉम बँटन, ग्लेन फिलिप्स, साई सुदर्शन, निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद खान, साई किशोर, जयंत यादव, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, शाहरूख खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मानव सुतार, गुर्नूर सिंग ब्रार, इशांत शर्मा, अशोक शर्मा, ल्यूक वूड, रशिद खान, कुलवंत खेजरोलिया.

दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), अभिषेक पोरेल, अजय मंडल, आशुतोष शर्मा, आकिब नबी, डेव्हिड मिलर, दुश्मंता चमीरा, करुण नायर, के. एल. राहुल, कुलदीप यादव, कायले जेमिसन, लुंगी एन्गिडी, माधव तिवारी, मिचेल स्टार्क, मुकेश कुमार, नितीश राणा, पथुम निसांका, पृथ्वी शॉ, साहिल पारेख, समीर रिझवी, टी. नटराजन, त्रिपुराना विजय, ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम.

यंदा पाऊसही रुसणार; 'स्कायमेट'चा अंदाज

Mumbai : खड्डे भरण्यासाठी यंदा पुन्हा १०० कोटींच्या निविदा; रस्त्यांच्या काँक्रीटीकरणावर भर देणार

महावितरण कंपनीच्या विभाजनावर शिक्कामोर्तब; शेतीच्या वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र कंपनी महावितरणचा IPO येणार

ऐन उन्हाळ्यात एसटीची भाडेवाढ; प्रति टप्पा १२ रुपये वाढ, प्रवाशांच्या खिशाला कात्री

US-Iran-Israel War : इराणचे नामोनिशाण मिटवू; ट्रम्प यांची नवी धमकी, इराणचेही प्रत्युत्तर