क्रीडा

IPLसाठी अद्याप आठवडा; मात्र दुखापतींची मालिका सुरू

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १९व्या हंगामासाठी अद्याप एक आठवडा शिल्लक आहे. मात्र खेळाडूंनी दुखापत किंवा अन्य कारणास्तव स्पर्धेतून माघार घेण्याची मालिका सुरू झालेली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १९व्या हंगामासाठी अद्याप एक आठवडा शिल्लक आहे. मात्र खेळाडूंनी दुखापत किंवा अन्य कारणास्तव स्पर्धेतून माघार घेण्याची मालिका सुरू झालेली आहे. गुरुवारी यामध्ये चेन्नई सुपर किंग्जचा नॅथन एलिस, राजस्थान रॉयल्सचा सॅम करन यांची भर पडली.

काही दिवसांपूर्वीच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. क्रांती घडवण्यासह इतिहासाची पुनरावृत्ती करून यंदा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला.

आता सर्वांना आयपीएलच्या १९व्या हंगामाचे वेध लागले आहेत. २८ मार्चपासून आयपीएलचा नवा हंगाम सुरू होईल. रजत पाटिदारच्या नेतृत्वात खेळणारा गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ अपेक्षेप्रमाणे स्पर्धेचा सलामीचा सामना खेळणार आहे. बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत बंगळुरूसमोर सनरायजर्स हैदराबादचे आव्हान असेल. तूर्तास फक्त १२ एप्रिलपर्यंतच्या २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून पश्चिम बंगाल, तमिळनाडू व आसाम येथे निवडणुका होणार असल्याने बीसीसीआय पुढील वेळापत्रक नंतर जाहीर करणार आहे.

मात्र उद्घाटनीय लढतीपूर्वी अनेक खेळाडू आधीच स्पर्धेबाहेर गेले आहेत. कोलकाताचा हर्षित राणा दुखापतीमुळे स्पर्धेला मुकणार असल्याचे दोन दिवसांपूर्वी स्पष्ट झाले. बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कारासाठी हर्षित दोन्ही हातात वॉकिंग स्टिक घेऊन आला होता. आता ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नॅथन एलिसदेखील स्नायूंच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकणार असल्याचे समजते. त्यामुळे चेन्नई संघाची चिंता वाढली आहे. त्यांना मॅट हेन्री, नूर अहमद व ओव्हर्टन यांच्यावर अवलंबून रहावे लागेल.

त्याशिवाय चेन्नईकडून यंदा लिलावापूर्वी राजस्थान संघाकडे दाखल झालेला इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करनही स्पर्धेबाहेर जाणार असल्याचे समजते. एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार कंबरेखालील भागाच्या दुखापतीमुळे करन आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही, असे समजते. भारताविरुद्ध टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत करन खेळला होता. राजस्थानने करनला २.४ कोटी रुपयांत लिलावापूर्वी ट्रेड केले होते.

पंजाबचा फर्ग्युसन उशिराने दाखल होणार

पंजाबकडून खेळणारा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन वैयक्तिक कारणास्तव उशिराने भारतात दाखल होईल. त्यामुळे तो सुरुवातीच्या ३-४ लढतींना मुकू शकतो. फर्ग्युसनच्या पत्नीने नुकताच त्यांच्या अपत्यास जन्म दिला आहे. त्यामुळे फर्ग्युसनने किमान २-३ आठवडे न्यूझीलंडमध्येच राहण्याचे ठरवले आहे. अशा स्थितीत तो १० ते १५ एप्रिलनंतरच भारतात दाखल होईल, असे समजते.

पंतकडून अर्जुन तेंडुलकरचे कौतुक

सचिन तेंडुलकरचा मुलगा व डावखुरा अष्टपैलू अर्जुन तेंडुलकर यंदा आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. गुरुवारी लखनऊने त्यांच्या ट्विटवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये कर्णधार ऋषभ पंत अर्जुनशी संवाद साधताना दिसला. तसेच त्याच्या बॅटचे वजन किती आहे, हे तपासून पंतने अर्जुनचे कौतुक केले. लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अर्जुन माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या मार्गदर्शनात सराव करताना आढळला होता. त्याचेही पंतने कौतुक करत त्याचे संघात स्वागत केले. लखनऊचा संघ १ एप्रिल रोजी दिल्लीविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.

आजचे राशिभविष्य, ४ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

विकेंडला घरच्यांना द्या खास ट्रीट! अशी बनवा खमंग हैदराबादी चिकन बिर्याणी

ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक चार रात्री बंद; ऐरोली-काटई नाका पुलावर गर्डर टाकण्याचे काम, वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर

Mumbai : जोगेश्वरी उड्डाणपुलाची होणार दुरुस्ती; महापालिका २७ कोटी २४ लाख खर्च करणार, सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन

Tirupati Blast : फार्मा कंपनीत मोठी दुर्घटना! बॉयलरच्या स्फोटात ५ जणांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी; बचावकार्य सुरू, VIDEO