लखनऊ : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गुरुवारी रंगणाऱ्या लढतीत गोलंदाजांची कसोटी लागणार आहे. ईडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्सची सनरायजर्स हैदराबादशी गाठ पडणार असून दोन्ही संघांनी आपापली पहिली लढत गमावली आहे. त्यामुळे विजयाचे खाते उघडण्यासाठी दोघांमध्ये द्वंद्व पाहायला मिळेल.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. आता २० दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.
२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला धडाक्यात प्रारंभ झाला. पहिल्या दोन लढतींमध्ये धावांचा वर्षाव पाहायला मिळाला. तर अन्य सामन्यांत गोलंदाजांनी कमबॅक केले. तसेच चार लढतींमध्ये नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. त्यामुळे नाणेफेक व दवाचा घटक यावेळी निर्णायक ठरत आहे. यंदादेखील प्रत्येक संघाला १४ सामने खेळायचे आहेत. त्यांपैकी ७ लढती या घरच्या मैदानात, तर उर्वरित ७ लढती प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात होतील.
दरम्यान, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकाताला पहिल्या लढतीत मुंबईकडून पराभव पत्करावा लागला. २२० धावांचा डोंगर उभारूनही गोलंदाजांनी सपाटून मार खाल्यामुळे कोलकाताच्या पदरी निराशा पडली. विशेषत: वरुण चक्रवर्ती व सुनील नरिन यांची यथेच्छ धुलाई झाली. हर्षित राणा, आकाश दीप हे खेळाडू आधीच दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेले असून मथीशा पाथिरानाच्या तंदुरुस्तीविषयी अद्याप संभ्रम कायम आहे. त्यामुळे कोलकाताला उपलब्ध असलेल्या गोलंदाजांकडूनच कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे.
दुसरीकडे इशान किशनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हैदराबादला सलामीच्या लढतीत बंगळुरूने नमवले. हैदराबादने उभारलेले २०१ धावांचे लक्ष्य बंगळुरूने १६ षटकांच्या आतच गाठून दाखवले. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत हैदराबादची गोलंदाजीसुद्धा संघर्ष करत आहे. हर्षल पटेल, जयदेव उनादकट व इशान मलिंगा यांच्यावर त्यांची भिस्त आहे. ब्रेडन कार्सची दुखापत त्यांच्यासाठी आणखी एक चिंतेचा विषय आहे. त्यामुळे फलंदाजी बेधडक असली, तरी गोलंदाजीबाबत त्यांना विचार करावा लागणार आहे.
आघाडीचे त्रिकुट हैदराबादची ताकद
ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा व इशान किशन असे धडाकेबाज डावखुरे फलंदाजांचे त्रिकुट हैदराबादकडे आहे. किशनने सलामीच्या लढतीत अर्धशतकदेखील झळकावले. अभिषेक व हेड यांच्याकडून मात्र सुधारणा अपेक्षित आहे. तसेच नितीश रेड्डी, अनिकेत वर्मा, सलिल अरोरा असे भारतीय खेळाडू त्यांच्याकडे आहेत. हेनरिच क्लासेन याच्यासारखा तुफानी फटकेबाजी करणारा खेळाडू हैदराबादकडे आहे. मात्र त्यांना गोलंदाजीत नक्कीच मेहनत घ्यावी लागणार आहे. हेड व अभिषेक गोलंदाजीदेखील करू शकतात. मात्र त्यांचा हैदराबाद संघ कसा वापर करणार, हे पाहणे रंजक ठरेल. दोन्ही संघांना गुणांचे खाते उघडण्यासाठी एकंदर दमदार खेळ करावा लागणार असल्याने लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे.
ग्रीनकडून योगदान अपेक्षित
यंदाच्या लिलावात सर्वाधिक महागडा खेळाडू ठरलेल्या कॅमेरून ग्रीनला सलामीच्या लढतीत छाप पाडता आली नाही. तसेच तो गोलंदाजी करू शकत नसल्याने कोलकाताची आणखी पंचायत होत आहे. फलंदाजीत ग्रीनसह फिन, रिंकू सिंग, अंक्रिश रघुवंशी यांच्याकडून कोलकाताला योगदान अपेक्षित आहे.
खेळपट्टीचा अंदाज
ईडन गार्डन्स स्टेडियमवर ज्या खेळपट्टीवर टी-२० विश्वचषकातील न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका यांच्यात उपांत्य लढत झाली होती, तीच खेळपट्टी गुरुवारी वापरण्यात येईल. खेळपट्टीकडून फिरकीला सहाय्य लाभू शकते. पावसाची शक्यता नसल्याने फलंदाजही चमकू शकतात.
उभय संघांत आतापर्यंत आयपीएलमध्ये ३० सामने झाले आहेत. त्यांपैकी कोलकाताने २०, तर हैदराबादने १० लढतींमध्ये विजय मिळवला आहे. मुख्य म्हणजे गेल्या सहापैकी पाच सामन्यांत कोलकाताने बाजी मारली आहे. त्यामुळे यावेळी हैदराबाद पलटवार करण्यास आतुर असेल.
प्रतिस्पर्धी संघ
कोलकाता नाइट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग (उपकर्णधार), फिन ॲलन, तेजस्वी दहिया, मनीष पांडे, अंक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, रोवमन पॉवेल, सार्थक रंजन, टिम सेईफर्ट, राहुल त्रिपाठी, दक्ष कामरा, सुनील नरिन, अनुकुल रॉय, कॅमेरून ग्रीन, रचिन रवींद्र, वैभव अरोरा, ब्लेसिंग मुझरबानी, प्रशांत सोलंकी, वरुण चक्रवर्ती, सौरभ दुबे, कार्तिक त्यागी, मथीशा पाथिराना, उमरान मलिक, नवदीप सैनी.
सनरायजर्स हैदराबाद : इशान किशन (कर्णधार), पॅट कमिन्स, ट्रेव्हिस हेड, रविचंद्रन स्मरण, सलिल अरोरा, हेनरिच क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिषेक शर्मा, हर्ष दुबे, लियाम लिव्हिंगस्टोन, नितीश रेड्डी, शिवम मावी, ब्रेडन कार्स, क्रेन्स फुलेत्रा, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, शिवांग कुमार, डेव्हिड पायने, अमित कुमार, प्रफुल हिंगे, इशान मलिंगा, साकिब हुसैन, ओमकार तरमाळे, जयदेव उनादकट, झीशान अन्सारी.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप