कोलकाता : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शनिवारी होणाऱ्या लढतीत गुजरात टायटन्सला सर्वप्रथम बाद फेरी गाठण्याची संधी आहे. ईडन गार्डन्सवर त्यांची यजमान कोलकाता नाइट रायडर्सशी गाठ पडणार आहे. कोलकातासाठी मात्र ही लढत जिंकणे गरजेचे आहे. अन्यथा बाद फेरीच्या शर्यतीतून त्यांचे आव्हान संपुष्टात येईल.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.
२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. बहुतांश लढतींमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. मात्र गेल्या काही दिवसांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनीही बाजी मारली आहे. त्यामुळे बॅट-बॉलमधील द्वंद्व रंगतदार होत आहे. नाणेफेकीच्या कौलावर विसंबून न राहता कोणत्याही क्षणी सामन्यांची दिशा बदलत आहे. प्रत्येक लढतीनंतर गुणतालिकेचे समीकरण आणखी रंजक होत आहे.
दरम्यान, शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरातने १२ पैकी ८ लढती जिंकल्या असून तूर्तास ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहेत. उर्वरित दोनपैकी एक सामना जिंकला, तरी गुजरातचे बाद फेरीतील स्थान पक्के होईल. मुख्य म्हणजे गुजरातने स्पर्धेच्या मध्यावर सातपैकी तीनच लढती जिंकल्या होत्या. मात्र त्यानंतर सलग पाच सामने जिंकून या संघाने मुसंडी मारली. कोलकाताला त्यांनी पहिल्या टप्प्यातील लढतीत अहमदाबाद येथे नमवले होते. आता कोलकाता ईडन गार्डन्सवर बदला घेणार का, हे पाहणे रंजक ठरेल.
गिल, साई सुदर्शन व जोस बटलर या आघाडीच्या त्रिकुटावर गुजरातची फलंदाजी अवलंबून आहे. मात्र गेल्या काही सामन्यांत वॉशिंग्टन सुंदरने सातत्याने छाप पाडली आहे. तसेच जेसन होल्डरच्या रूपात प्रतिभावान अष्टपैलू गुजरातला गवसला आहे. होल्डरचा समावेश झाल्यापासून गुजरात अपराजित आहे. कगिसो रबाडा व मोहम्मद सिराज यांची वेगवान जोडी गुजरातची ताकद आहे. फिरकीपटू रशिद खानही भन्नाट फॉर्मात आहे. त्यामुळे कोलकाताच्या फलंदाजांचा गुजरातच्या गोलंदाजांविरुद्ध कस लागेल.
दुसरीकडे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकाताला गेल्या लढतीत बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला. ११ सामन्यांतील ४ विजय व १ रद्द लढत अशा ९ गुणांसह हा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. उर्वरित तिन्ही लढती जिंकूनही कोलकाताला अन्य निकालांवर विसंबून रहावे लागेल. फलंदाजीत फिन अॅलन व अंक्रिश रघुवंशी यांच्यावर कोलकाताची मदार आहे. कॅमेरून ग्रीन व रिंकू सिंग यांनाही सूर गवसला आहे. गोलंदाजीत अनुभवी फिरकीपटू सुनील नरिन प्रभावी ठरत आहे. वैभव अरोराने मात्र निराशा केली आहे. थीशा पाथिरानाचा पर्यायही कोलकातापुढे उपलब्ध आहे. वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे गेल्या लढतीस मुकला होता. तो शनिवारी उपलब्ध असेल, कारण कोलकातासाठी ही लढत निर्णायक आहे.
उभय संघांत आतापर्यंत ६ सामने झाले आहेत. त्यांपैकी गुजरातने ४, तर कोलकाताने १ लढत जिंकली आहे. आकडेवारी गुजरातच्या बाजूने असून त्यांनी यंदाच्या हंगामात पहिल्या टप्प्यातही कोलकाताला नमवले होते. त्यामुळे कोलकातावर दडपण असेल.
खेळपट्टीचा अंदाज
तब्बल २० दिवसांनी ईडन गार्डन्स येथे आयपीएलचा सामना होणार आहे. शनिवारी होणाऱ्या सामन्यात फलंदाजांचेच वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. मधल्या षटकांत फिरकीपटू कमाल करू शकतात. लढतीवर पावसाचे सावट नसल्याने रंगतदार द्वंद्व अपेक्षित आहे.
प्रतिस्पर्धी संघ
कोलकाता नाइट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, फिन ॲलन, तेजस्वी दहिया, मनीष पांडे, अंक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, रोवमन पॉवेल, सार्थक रंजन, टिम सेईफर्ट, राहुल त्रिपाठी, दक्ष कामरा, सुनील नरिन, अनुकुल रॉय, कॅमेरून ग्रीन, रचिन रवींद्र, वैभव अरोरा, ब्लेसिंग मुझरबानी, प्रशांत सोलंकी, वरुण चक्रवर्ती, सौरभ दुबे, कार्तिक त्यागी, मथीशा पाथिराना, उमरान मलिक, नवदीप सैनी.
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, ग्लेन फिलिप्स, साई सुदर्शन, निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद खान, साई किशोर, जयंत यादव, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, शाहरूख खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मानव सुतार, गुर्नूर सिंग ब्रार, इशांत शर्मा, अशोक शर्मा, ल्यूक वूड, रशिद खान, कुलवंत खेजरोलिया, कॉनर इस्टरहुझैन.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप