पंजाब-गुजरातमध्ये आज द्वंद्व!  PTI
क्रीडा

IPL 2026 : पंजाब-गुजरातमध्ये आज द्वंद्व! मुल्लानपूर येथे होणाऱ्या लढतीत दोन्ही संघ विजयी सलामीसाठी उत्सुक

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १९व्या पर्वाला शानदार प्रारंभ झाला आहे. गेले तीन दिवस चाहत्यांचे मनोरंजन केल्यानंतर आता मंगळवारी म्हणजेच चौथ्या दिवशी पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील द्वंद्व पाहायला मिळेल. मुल्लानपूर येथील महाराज यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत दोन्ही संघ विजयी सलामी नोंदवण्यासाठी आतुर असतील.

Swapnil S

मुल्लानपूर : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १९व्या पर्वाला शानदार प्रारंभ झाला आहे. गेले तीन दिवस चाहत्यांचे मनोरंजन केल्यानंतर आता मंगळवारी म्हणजेच चौथ्या दिवशी पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील द्वंद्व पाहायला मिळेल. मुल्लानपूर येथील महाराज यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत दोन्ही संघ विजयी सलामी नोंदवण्यासाठी आतुर असतील.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. आता २० दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.

बंगळुरू-हैदराबाद, मुंबई-कोलकाता या लढतींमध्ये धावांचा वर्षाव पाहायला मिळाला. तर चेन्नईविरुद्ध राजस्थानने गोलंदाजीच्या बळावर बाजी मारली. आता पंजाब-गुजरात लढतीत पुन्हा एकदा चौकार-षटाकारांची आतषबाजी अपेक्षित आहे. मुंबईकर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाबने गतवर्षीदेखील सलामीचा सामना शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरात टायटन्सविरुद्धच खेळला होता. त्यावेळी पंजाबने ११ धावांनी सरशी साधली होती. आतापर्यंत आयपीएलमध्ये हे संघ सहावेळा आमनेसामने आले असून दोघांनीही प्रत्येकी ३ लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे मंगळवारी कोण बाजी मारणार, याकडे लक्ष असेल.

गतउपविजेता पंजाबचा संघ यंदादेखील कागदावर उत्तम असून त्यांना जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. गतवर्षी पंजाबला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. प्रियांश आर्या, शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, सूर्यांश शेडगे, मुशीर खान असे प्रतिभावान अनकॅप्ड खेळाडू (आंतरराष्ट्रीय अनुभव नसलेले) पंजाबच्या ताफ्यात आहेत. त्याशिवाय श्रेयस व मार्कस स्टोइनिस, अझमतुल्ला ओमरझाई, मिचेल ओवन, कूपर कोनोली असे खेळाडूही आहेत. गोलंदाजीत डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग व फिरकीपटू युझवेंद्र चहल पंजाबची ताकद आहे. तसेच डावखुरा मार्को यान्सेन, यश ठाकूर, विजय वैशाख हे वेगवान त्रिकुटही त्यांच्याकडे आहे.

दुसरीकडे गेल्या वर्षी एलिमिनेटरमध्ये पराभूत होणारा गुजरात यंदा नव्या जोमाने छाप पाडण्यास आतुर असेल. गिल, साई सुदर्शन व जोस बटलर या आघाडीच्या त्रिकुटावर संघाची फलंदाजी अवलंबून आहे. बटलर विश्वचषकापासून संघर्ष करत आहे. तसेच राहुल तेवातिया, ग्लेन फिलिप्स, टॉम बँटन, शाहरूख खान असे फलंदाजही त्यांच्याकडे आहेत. गोलंदाजीत मोहम्मद सिराज व कगिसो रबाडाची वेगवान जोडी व फिरकीपटू रशिद खान यांच्याकडून गुजरातला अपेक्षा आहेत. आशिष नेहरा गुजरातचे प्रशिक्षकपद भूषवत असून रिकी पाँटिंग पंजाबचा प्रशिक्षक आहे. त्यामुळे दोन्ही प्रशिक्षकांचाही या लढतीत कस लागेल. पंजाबचे पारडे जड असले, तरी गुजरात त्यांना कडवी झुंज देईल.

पंजाब आणि गुजरात यांच्यात आतापर्यंत ६ आयपीएल सामने झाले आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी ३ लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे चाहत्यांना मंगळवारी दमदार जुगलबंदी पाहायला मिळण्याची शक्यता असून या आकडेवारीत कोण आघाडी घेणार, याकडे लक्ष असेल.

खेळपट्टीचा अंदाज

मुल्लानपूर येथील खेळपट्टी क्रमांक चारवर ही लढत होणार असून येथे चौकार-षटकारांची आतषबाजी अपेक्षित आहे. गतवर्षी याच खेळपट्टीवर पंजाबने चेन्नईविरुद्ध २१९ धावा उभारल्या होत्या. पावसाची येथे मूळीच शक्यता नसल्याने दमदार लढत होईल.

प्रतिस्पर्धी संघ

पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यर (कर्णधार), अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, बेन ड्वारशुइस, कूपर कोनोली, हर्नूर पन्नू, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, मार्को यान्सेन, मार्कस स्टोइनिस, मिचेल ओवन, मुशीर खान, नेहल वधेरा, प्रभसिमरन सिंग, प्रवीण दुबे, प्रियांश आर्य, प्याला अविनाश, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, विजयकुमार वैशाख, विशाल निशाद, विष्णू विनोद, झेव्हियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल.

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, टॉम बँटन, ग्लेन फिलिप्स, साई सुदर्शन, निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद खान, साई किशोर, जयंत यादव, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, शाहरूख खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मानव सुतार, गुर्नूर सिंग ब्रार, इशांत शर्मा, अशोक शर्मा, ल्यूक वूड, रशिद खान, कुलवंत खेजरोलिया.

तरच LPG सिलिंडर सेवा बंद; PNG नियमावर भुजबळांचे स्पष्टीकरण

राज्यात ठिकठिकाणी अवकाळी सरी; पुणे, पिंपरी - चिंचवड, वाशिममध्ये पाऊस; वातावरणात गारवा, पण शेतीचे नुकसान

तेलंगण सरकारचा कठोर कायदा! आई-वडिलांची उपेक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात १५ टक्के कपात

उपसभापती गोऱ्हे यांची SIT चौकशी करा; खरात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांची मागणी

अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार; पूर आणि भूस्खलनामुळे १७ ठार, २६ जखमी