मुंबई : आयपीएलचा १८वा हंगाम आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. मात्र आता १७ मेपासून पुन्हा स्पर्धा सुरू होणार असून मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स या संघांतील खेळाडूंनी आपापल्या शहरात सरावाला प्रारंभ केला आहे. तसेच विदेशी खेळाडूही भारतात परतू लागले आहेत.
२२ मार्चपासून आयपीएलचा १८वा हंगाम धडाक्यात सुरू झाला. गुरुवार, ८ मे रोजी पंजाब-दिल्ली यांच्यात धरमशाला येथे आयपीएलचा ५८वा सामना खेळवण्यात येत होता. मात्र पंजाब तसेच जम्मू-कश्मीर येथे पाकिस्तानने ड्रोनद्वारे केलेल्या हल्ल्यांमुळे ही लढत मध्यातच स्थगित करण्यात आली. धरमशाला येथे संपूर्ण ब्लॅक आऊट करण्यात आल्याने स्टेडियमचे प्रकाश पुरवणारे टॉवर अचानक बंद झाले. हळूहळू चारही टॉवर बंद झाल्यावर प्रेक्षकांना स्टेडियम सोडून जाण्यास सांगण्यात आले. बीसीसीआय तसेच मैदानातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ही स्थिती योग्यपणे हाताळली. खेळाडू तसेच सामनाधिकारी, समालोचकांना सुरक्षित स्थळी नेण्यास बीसीसीआयने विशेष सुविधाही पुरवली.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताच्या २६ निष्पाप जणांचा बळी गेला. या हल्ल्याला भारताने ६ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे चोख प्रत्युत्तर दिले. या मोहिमेअंतर्गत भारताने ९ दहशतवादी तळांवर हल्ले केले. त्यामुळेच पाकिस्तानने ८ मे रोजी पुन्हा प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सैन्याने त्यांचे सर्व हल्ले उधळवून लावले. तसेच पाकिस्तानमधील काही शहरातही हल्ले केले. या सर्व युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात आयपील सुरू ठेवणे नैतिकदृष्या तसेच सुरक्षेच्या कारणास्तव चुकीचेच ठरत होते. परिणामी पंजाब-दिल्ली सामना अर्ध्यात स्थगित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण स्पर्धा किमान आठवडाभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता.
आता स्थिती नियंत्रणात आल्यावर सोमवारी बीसीसीआयने आयपीएल पुन्हा सुरू करण्याबाबत घोषणा केली. मात्र ऑस्ट्रेलिया, इंग्लंडचे विदेशी खेळाडू माघारी परतले होते. दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यात ११ जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची अंतिम फेरीही रंगणार आहे. त्यामुळे त्या देशातील खेळाडू आयपीएलसाठी परत येतील का, याविषयी साशंका आहे. ३ जून रोजी आयपीएलची अंतिम फेरी रंगणार आहे.
दरम्यान, मंगळवारी मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा वानखेडेवर सराव करताना दिसले. गुजरातच्या खेळाडूंनी अहमदाबादला सराव केला.
वानखेडे स्टँडचे नामकरण १६ मे रोजी
मुंबईच्या वानखेडे स्टेडियममधील विविध स्टँडचे नामकरण आता शुक्रवार, १६ मे रोजी करण्यात येईल, अशी माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी दिली. वानखेडेच्या दिवेचा स्टँडला रोहित शर्माचे नाव देण्यात येणार आहे. तसेच एका स्टँडला बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार, तर एका स्टँडला भारताचे माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे नाव देण्यात येईल.