नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदकांवर नाव कोरणारी भारताची युवा नेमबाज मनू भाकर हिला तीन महिन्यांची विश्रांती देण्यात आली असून तिची आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली नाही. आता रिदम संगवान ही मोसमाअखेरीस होणाऱ्या या शेवटच्या स्पर्धेत दोन प्रकारात सहभागी होणार आहे.
नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने (एनआरएआय) गुरुवारी भारताच्या २३ जणांच्या संघाची घोषणा केली. नवी दिल्लीतील कर्णी सिंग शूटिंग रेंजवर ही स्पर्धा रंगणार असून रायफल, पिस्तूल आणि शॉटगन प्रकारात खेळवली जाणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या नऊ सदस्यांचा या संघात समावेश करण्यात आला आहे.
२२ वर्षीय मनू भाकर हिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल आणि १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सरबज्योत सिंगच्या साथीने कांस्यपदक पटकावत इतिहास घडवला होता. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके पटकावणारी ती देशाची पहिली खेळाडू ठरली आहे.
या स्पर्धेसाठी आम्ही चांगला संघ निवडला आहे, मोसमातील अखेरच्या स्पर्धेत भारतीय नेमबाजांकडून घरच्या मैदानावर चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत तीन पदके मिळवल्यानंतर आता भारतीय नेमबाजांवरील दडपण वाढले आहे,” असे एनआरएआयचे महासचिव सुलतान सिंग यांनी सांगितले.
दिव्यांश सिंग पनवार (पुरुष १० मीटर एअर रायफल), सोनम उत्तम मसकर (महिला १० मीटर एअर रायफल), रिदम संगवान (महिला १० मीटर एअर पिस्तूल आणि २५ मीटर पिस्तूल) आणि गनेमत सेखोन (महिला स्किट) या चार नेमबाजांची थेट निवड एनआरएआयने केली आहे. त्यानंतर अन्य नेमबाजांना ऑलिम्पिक निवड चाचणीतील क्रमवारीनुसार निवडण्यात आले आहे. ऑलिम्पियन मायराज अहमद खान (पुरुष स्किट) आणि चेन सिंग (पुरुष ५० मीटर रायफल थ्री पोझिशन) हे भारतीय संघात परतले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकच्या संघातील, रिदमसह अर्जुन बबुटा (पुरुष १० मीटर एअर रायफल), अर्जुन सिंग चीमा (पुरुष १० मीटर एअर पिस्तूल), अनिश आणि विजयवीर सिधू (पुरुष २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल), श्रेयसी सिंग आणि राजेश्वरी कुमारी (महिला ट्रॅप), माहेश्वरी चौहान (महिला स्किट) आणि अनंत जीत सिंग नारूका (पुरुष स्किट) या नेमबाजांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघ
एअर रायफल : दिव्यांश सिंग पनवार, अर्जुन बबुटा, सोनम उत्तम मसकर, तिलोत्तमा सेन.
५० मीटर रायफल थ्री पोझिशन : चेन सिंग, अखिल शेरॉन, अंशी चौकसी, निश्चल.
एअर पिस्तूल : अर्जुन सिंग चीमा, वरुण तोमर, रिदम संगवान, सुरक्षी राव.
२५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल : अनिश भानवाला, विजयवीर सिधू, रिदम संगवान, सिमरनप्रीत कौर ब्रार.
ट्रॅप : विवान कपूर, भौनिश मेंडिरत्ता, राजेश्वरी कुमारी, श्रेयसी सिंग.
स्किट : अनंतजीत सिंग नारूका, मायराज अहमद खान, गनेमत सेखोन, माहेश्वरी चौहान.