क्रीडा

बुमरा तिन्ही प्रकारांतील सर्वोत्तम गोलंदाज : क्लार्क

भारताचा तारांकित जसप्रीत बुमरा हा आजवरचा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांतील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने नोंदवले आहे. ३१ वर्षीय बुमराने पाच सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक ३२ बळी मिळवले.

Swapnil S

मेलबर्न : भारताचा तारांकित जसप्रीत बुमरा हा आजवरचा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांतील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने नोंदवले आहे. ३१ वर्षीय बुमराने पाच सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक ३२ बळी मिळवले. त्यालाच मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

“ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका पाहिल्यानंतर मी आजवरच्या सर्व वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीची उजाळणी केली. मात्र बुमराच्या तोडीचा मला कुणीच सापडला नाही. क्रीडा विश्वाला कर्टली ॲम्ब्रोस, ग्लेन मॅकग्रा, ॲलन डोनाल्ड, वासिम अक्रम असे एकापेक्षा एक वेगवान गोलंदाज लाभले. मात्र टी-२०, एकदिवसीय व कसोटीमध्ये बुमरासारखा गोलंदाज मिळणे ज‌वळपास अशक्य आहे,” असे क्लार्क म्हणाला.

बुमराचे क्रमवारीतील अग्रस्थान भक्कम

बुमराने जागतिक कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीतील अग्रस्थान आणखी भक्कम केले. बुधवारी जाहीर झालेल्या नव्या यादीत बुमराने ९०८ गुणांसह अग्रस्थान टिकवून ठेवले आहे. कमिन्स ८४१ गुणांसह दुसऱ्या, तर कगिसो रबाडा ८३७ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. स्कॉट बोलंडने २९ स्थानांची झेप घेत थेट आठवा क्रमांक मिळवला आहे. फलंदाजांमध्ये भारताच्या यशस्वी जैस्वालने चौथे स्थान टिकवले आहे. ऋषभ पंतने सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावातील अर्धशतकामुळे तीन स्थानांनी आगेकूच करताना नववा क्रमांक मिळवला आहे. इंग्लंडचा जो रूट फलंदाजांमध्ये अग्रस्थानी आहे.

दरम्यान, बुमराच्या तंदुरुस्तीविषयी संभ्रम कायम आहे. सिडनी येथील पाचव्या कसोटीच्या पहिल्या डावात पाठदुखी झाल्याने बुमराने मैदान सोडले होते. मग दुसऱ्या डावात तो गोलंदाजीस आला नाही. बुमरा इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसही मुकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा स्थितीत तो थेट फेब्रुवारीत चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळताना दिसू शकतो.

सिडनीतील खेळपट्टीस समाधानकारक शेरा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी वापरण्यात आलेल्या सिडनी स्टेडियमच्या खेळपट्टीला आयसीसीने समाधानकारक शेरा दिला आहे. तसेच पहिल्या चारही कसोटीच्या खेळपट्ट्यांना अतिउत्तम म्हणजेच ‘वेरी गुड’ असा शेरा देण्यात आला आहे. सिडनी कसोटी तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रातच संपली होती. वेगवान गोलंदाजांना येथे फारच मदत होती. मात्र तरीही आयसीसीने सिडनीतील खेळपट्टीला समाधानकारक ठरवले आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत