Photo : X
क्रीडा

कटुंबाला कर्जातून मुक्त करण्याचा कार्तिक शर्माचा मानस; IPL च्या १४ कोटींच्या बोलीतून फेडणार वडिलांचे कर्ज

चेन्नई सुपर किंग्जने १४.२० कोटी रुपयांची बोली लावली, पण त्या आकड्यांच्या पलीकडे कार्तिक शर्मासाठी हा क्षण केवळ करिअरचा टर्निंग पॉइंट नव्हता. तो कुटुंबाच्या कर्जातून मुक्तीचा श्वास होता.

Swapnil S

जयपूर : चेन्नई सुपर किंग्जने १४.२० कोटी रुपयांची बोली लावली, पण त्या आकड्यांच्या पलीकडे कार्तिक शर्मासाठी हा क्षण केवळ करिअरचा टर्निंग पॉइंट नव्हता. तो कुटुंबाच्या कर्जातून मुक्तीचा श्वास होता. आयपीएल मिनी लिलावात इतिहास रचणारा हा १९ वर्षांचा तरुण, त्या क्षणी फक्त खेळाडू नव्हता. तो एक मुलगा होता, जो आपल्या वडिलांच्या खांद्यावरचं ओझं उतरवण्याचं स्वप्न पाहत होता.

राजस्थानच्या मातीवरून उभा राहिलेला हा बेधडक फलंदाज लिलावादरम्यान भावनांवर ताबा ठेवू शकला नाही. सीएसके, लखनऊ आणि कोलकाता यांच्यात रंगलेली बोली जसजशी वाढत गेली, तसतसे हृदयाचे ठोकेही वाढले. १४.२० कोटींवर शिक्कामोर्तब झालं आणि कार्तिकचे डोळे भरून आले. इतिहासात संयुक्तपणे सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरण्याचा क्षण त्याच्यासाठी आनंदाइतकाच अविश्वसनीय होता.

कार्तिकच्या भावनांना तेव्हा आकड्यांना अर्थ मिळाला. १४ कोटी म्हणजे आलिशान गाड्या किंवा झगमगाट नव्हे. ती होती घरातला ताण कमी करणारी रक्कम. कर्ज कशासाठी घेतलं होतं, हे त्याने सांगितलं नाही; पण त्या कर्जाने घरात किती शांतता हरवली होती, हे त्याच्या डोळ्यांतून स्पष्ट दिसत होतं. मैदानावर मात्र कार्तिक पूर्णपणे निर्भय, आक्रमक आणि मोठे फटके खेचणारा दिसतो. नंबर चारवर फलंदाजी करताना किंवा खालच्या फळीत उतरून सामना फिरवताना त्याला क्षणाचाही संकोच नसतो. १२ टी-२० सामन्यांत १६४ च्या स्ट्राइकरेटने ३३४ धावा, २८ षटकार हे आकडेच त्याची ओळख सांगतात. शेर-ए-पंजाब टी-२० लीगमध्येही त्याने ४५७ धावा करत आपली धडाकेबाज छाप सोडली.

केविन पीटरसन, आर. अश्विन यांच्यासारख्या दिग्गजांनी त्याचं कौतुक केलं आहे. सीएसकेचा मोठा दावाही योगायोग नाही. विकेटकीपर, शांत स्वभाव, सामना संपवण्याची क्षमता, या सगळ्यामुळेच त्याच्याकडे भविष्यातील पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. पण आज या क्षणी, कार्तिकसाठी आयपीएल म्हणजे ट्रॉफी नव्हे. वडिलांच्या कपाळावरील आठ्या कमी होणं आहे आणि कदाचित हाच खरा विजय म्हणावा लागेल.

ही रक्कम माझं आयुष्य बदलणारी आहे. ही माझी पहिली आयपीएल सॅलरी आहे. आता माझं पहिलं काम वडिलांचं २६ लाखांचं कर्ज फेडणं हेच आहे.
कार्तिक शर्मा

वाहतूकदारांचा राज्यव्यापी संप; बस-टॅक्सी सेवा ठप्प, शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांवर काय परिणाम?

Mumbai : India vs England सामन्यामुळे मरीन ड्राइव्ह परिसरात ट्रॅफिक अलर्ट; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर, वाचा सविस्तर

Iran vs US-Israel War : मध्यपूर्वेतील संघर्षात वाढ; भारतीय नागरिकांसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

Mumbai : वानखेडेवर India vs England सेमीफायनल; चाहत्यांसाठी मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या, पाहा वेळापत्रक

Iran Israel War : जहाजांचा युद्ध विमा महाग; संघर्षामुळे अतिरिक्त प्रीमियम भरावा लागणार; विमा कंपन्यांचा निर्णय