नवी दिल्ली : दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती नेमबाज मनू भाकर तसेच बुद्धिबळातील विश्वविजेता दोम्माराजू गुकेश, हॉकीपटू हरमनप्रीत सिंग आणि पॅराॲॅथलिट प्रवीण कुमार यांना यंदाचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. ऑलिम्पिक पदकविजेता महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसळे याला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला असून येत्या १७ जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या चार खेळाडूंनी यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये बाजी मारली आहे. स्वप्नीलसह १९७२च्या हेडलबर्ग पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारे मुरलीकांत पेटकर यांना अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव) जाहीर झाला आहे. त्याचबरोबर पॅरालिम्पिकपटू सचिन सर्जेराव खिलारी याला अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय नेमबाजांच्या यशात मोलाची भूमिका बजावणारी प्रशिक्षिका दीपाली देशपांडे हिला द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. एकूण ३२ जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.
भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती नेमबाज मनू भाकर, बुद्धिबळातील जगज्जेता डी. गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि अपंग उंच उडीपटू प्रवीण कुमार या चौघांना प्रतिष्ठेच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने गुरुवारी २०२४ वर्षातील राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील ऑलिम्पिक पदकविजेता नेमबाज स्वप्निल कुसळे, पॅरालिम्पिकपटू सचिन खिलारी, नेमबाजी प्रशिक्षिका दीपाली देशपांडे व माजी अपंग जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांचाही समावेश आहे.
क्रीडा क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा व अग्रगण्य पुरस्कार म्हणून खेलरत्नची ओळख आहे. त्यानंतर अर्जुन पुरस्काराचा क्रमांक लागतो. १७ जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे सर्व विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतील. वर्षभरात क्रीडा क्षेत्रात छाप पाडून भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्यांची तसेच प्रदीर्घ काळ क्रीडा क्षेत्रासाठी कार्यरत असलेल्यांचा या सोहळ्यात गौरव केला जातो. .
काही दिवसांपूर्वीच मनूचे पुरस्कारांच्या यादीत नाव नसल्याने विविध चर्चा सुरू होत्या. मात्र क्रीडा मंत्रालयाने गुरुवारी अंतिम यादी जाहीर केली. त्यामध्ये मनूचा समावेश आहे. मनूने २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदके जिंकली. दुसरीकडे १८ वर्षीय गुकेशने नुकताच जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीत बाजी मारली. तो विश्वातील सर्वात युवा जगज्जेता ठरला. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. तर पॅरालिम्पिकमध्ये प्रवीणने उंच उडीत सुवर्णपदक काबिज केले. त्याने २०२०मध्येही सुवर्ण जिंकले होते.
पुरस्कार विजेत्यांची यादी
खेलरत्न पुरस्कार
मनू भाकर (नेमबाजी), डी. गुकेश (बुद्धिबळ), हरमनप्रीत सिंग (हॉकी), प्रवीण कुमार (अपंग उंच उडीपटू)
अर्जुन पुरस्कार
ज्योती याराजी, अन्नू राणी (ॲथलेटिक्स), नितू, स्वीटी (बॉक्सिंग), वंतिका अगरवाल (बुद्धिबळ), सलिमा टेटे, अभिषेक, संजय, जर्मनप्रीत सिंग, सुखजीत सिंग (सर्व हॉकी), राकेश कुमार (पॅरा-तिरंदाजी), प्रीती पाल, जीवनजी दीप्ती, अजित सिंग, सचिन खिल्लारी, धरमबीर, प्रवीण सूरमा, होकाटो सेमा, सिमरन, नवदीप, नितेश कुमार, तुलसिमती मुरुगेसन, नित्या सिवन, मनीषा रामदास, कपिल परमार, मोना अगरवाल, रुबिना फ्रान्सिस (सर्व पॅरा ॲथलिट्स), सरबजोत सिंग, स्वप्निल कुसळे (नेमबाजी), अभय सिंग (स्क्वॉश), साजन प्रकाश (जलतरण), अमन सेहरावत (कुस्ती).
जीवनगौरव पुरस्कार
सुचा सिंग (ॲथलेटिक्स), मुरलीकांत पेटकर (पॅरा जलतरणपटू)
द्रोणाचार्य पुरस्कार (प्रशिक्षकांसाठी)
दीपाली देशपांडे (नेमबाजी), सुभाष राणा (पॅरा-नेमबाजी), संदीप सांगवान (हॉकी)
द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव) : एस. मुरलीधरन (बॅडमिंटन), अर्मांडो कोलाको (फुटबॉल)