क्रीडा प्रतिनिधी / मुंबई
खो-खोचा भारतात वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला असून यंदाचा खो-खोचा हंगाम कधी सुरू होणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे. सध्या राज्यासह देशभरात पावसाने थैमान घातले असले तरी पुढील काही महिन्यांत लवकरच खो-खोचा सूर सर्व मैदानांवर घुमेल. जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवर सुरळीतपणे आयोजित केल्या जाणाऱ्या खो-खो स्पर्धेची गाडी आंतरराष्ट्रीय पातळीवर, मात्र रुळावरून घसरलेलीच आहे.
एकीकडे २०२५च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या खेळाडूंना अद्याप राज्य शासनाकडून २.२५ कोटी रुपयांचे रोख पारितोषिक न मिळाल्याचा मुद्दा ऐरणीवर आहेच. मात्र यामुळे खो-खोच्या जागतिक पातळीवरील प्रगतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नवी दिल्ली येथे जानेवारी २०२५मध्ये झालेल्या पहिल्या खो-खो विश्वचषकात भारताने पुरुष-महिला अशा दोन्ही गटांत विजेतेपद पटकावले. विश्वचषकात एकंदर सहा खंडांतील २३ देश सहभागी झाले होते. पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत मिळून ३९ संघांत ही स्पर्धा खेळवण्यात आली. त्यावेळी वाटले की आता खो-खो मागे वळून पाहणार नाही. मात्र आता त्या घटनेला दीड वर्षे उलटली, तरी खो-खोच्या पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेबाबत संभ्रम कायम आहे.
पहिल्या विश्वचषकाच्या वेळीच भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी २०२६मध्ये खो-खो खेळाची राष्ट्रकुल स्पर्धा लवकरच आयोजित करू, असे जाहीर केले होते. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी देखील २०३०च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील समावेशासाठी खो-खोसह चार खेळ शर्यतीत असल्याचे म्हटले होते. सध्या मात्र भारतीय खो-खो महासंघातील गदारोळामुळे खो-खोची आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढ खुंटली आहे, असे म्हणता येईल.
२०३०मध्ये भारतात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत खो-खोचा समावेश व्हावा, या हेतूने खो-खो खेळाची वेगळी राष्ट्रकुल स्पर्धा निर्णायक ठरेल, असे जाणकारांचे मत आहे. मात्र या स्पर्धेच्या आयोजनावरून सध्या महासंघ पेचात पडला आहे. जम्मू आणि काश्मीर खो-खोची राष्ट्रकुल स्पर्धा भरवण्यास उत्सुक होते. मात्र काही कारणास्तव त्यांनी यजमानपदास नकार दर्शवल्याचे समजते. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी याविषयी अधिक माहिती देण्यास टाळले.
तसेच खो-खो चा दुसरा विश्वचषक पुढील वर्षी होणे अपेक्षित आहे. भारताबाहेर हा विश्वचषक होऊ शकतो. मात्र राष्ट्रकुलच्याच आयोजनाविषयी प्रश्नचिन्ह असल्याने आता खो-खो विश्वचषक कधी होईल, याविषयी साशंकाच आहे, अशी माहिती महासंघाच्या पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. त्यामुळे एकूणच आंतरराष्ट्रीय पातळीवर खो-खोचा संघर्ष सुरू असल्याचे स्पष्ट होते.
अल्टिमेट लीगचा विसर
अल्टिमेट खो-खो लीगचा सध्या महासंघाला जणू विसरच पडला आहे. २०२४च्या जानेवारीत कटक येथे अल्टिमेट खो-खो लीगचे दुसरे पर्व पार पडले. त्यानंतर आता अडीच वर्षांहून अधिक काळ उलटला, तरी या लीगचे तिसरे पर्व कधी होणार, याविषयी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडे उत्तर नाही. महिलांसाठीही अल्टिमेट लीग खेळवण्याचा विचारही एकेकाळी होता. मात्र तूर्तास राष्ट्रकुल, विश्वचषक या स्पर्धांनाच प्राधान्य दिले जाईल, असे समजते. त्यामुळे २०२७मध्येच अल्टिमेट लीगच्या तिसऱ्या पर्वाला मुहूर्त मिळू शकतो.