नवी दिल्ली : इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारताच्या दोन्ही संघांनी धडाकेबाज कामगिरी गुरुवारीही कायम राखली. एकीकडे महिला संघाने सलग तिसऱ्या सामन्यात शतकी गुणसंख्या नोंदवताना अ-गटात अग्रस्थान काबिज केले. तसेच भारतीय पुरुषांनी विजयी चौकार लगावताना थाटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
महिलांच्या अ-गटात महाराष्ट्राच्या प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने शेवटच्या साखळी सामन्यात मलेशियाचा १००-२० असा फडशा पाडला. भारताने पहिल्या टर्नमध्ये ६, तर तिसऱ्या टर्नमध्ये ४ ड्रीम रन मिळवले. बदलापूरची रेश्मा राठोड, मोनिका, भिलार यांनी संघासाठी चमक दाखवली. रेश्माला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. भारताचा हा सलग तिसरा विजय ठरला. अ-गटात चारच संघ असल्याने भारताने अग्रस्थानासह उपांत्यपूर्व फेरी गाठली. आता शुक्रवारी महिलांची बांगलादेशशी गाठ पडेल. भारताने सलामीच्या लढतीत दक्षिण कोरियाचा १७५-१८ असा, तर दुसऱ्या सामन्यात इराणचा १००-१६ असा धुव्वा उडवला होता.
त्यानंतर पुरुषांच्या अ-गटात भारताने सलग चौथा विजय नोंदवताना भुतानला ७१-३४ अशी धूळ चारली. नेपाळ, ब्राझील, पेरू आणि आता भुतानवरील विजयासह भारताने गटात सर्वाधिक १२ गुण कमावून अग्रस्थान मिळवले. कर्णधार प्रतीक वाईकर, सुयश गरगटे यांनी उत्तम योगदान दिले. सुयश सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराचा मानकरी ठरला. आता भारतासमोर शुक्रवारी रंगणाऱ्या उपांत्यपूर्व लढतीत श्रीलंकेचे आव्हान असेल.
सोमवारपासून सुरू झालेल्या या विश्वचषकात पुरुष गटात २०, तर महिला गटात १९ संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ उपांत्यपूर्व फेरी गाठणार आहेत. शनिवारी आणि रविवारी अनुक्रमे उपांत्य आणि अंतिम सामना खेळवण्यात येईल. अश्वनी कुमार शर्मा भारतीय पुरुष संघाचे, तर सुमित भाटिया महिला संघाचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवत आहेत.