क्रीडा

KKR vs GT : फलंदाजीत सुधारणा करण्याचे कोलकातासमोर आव्हान; तगड्या गुजरातशी आज दोन हात करणार

गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या गुजरात टायटन्सविरुद्ध सोमवारी होणाऱ्या लढतीत आपल्या फलंदाजीत सुधारणा करण्याचा प्रयत्न कोलकाता नाईट रायडर्स संघाचा असेल.

Swapnil S

कोलकाता : गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या गुजरात टायटन्सविरुद्ध सोमवारी होणाऱ्या लढतीत आपल्या फलंदाजीत सुधारणा करण्याचा प्रयत्न कोलकाता नाईट रायडर्स संघाचा असेल.

पंजाब किंग्ज विरुद्ध झालेल्या गत सामन्यात केवळ ११२ धावांचा पाठलाग करताना कोलकाताचा संघ अवघ्या ९५ धावांवर आटोपला. या सामन्यात त्यांची फलंदाजी अक्षरश: कोसळली. परंतु तरीही यापुढे आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची आशा संघाला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदावरून हटवल्यानंतर अभिषेक नायर हे कोलकाता संघाला मार्गदर्शन करण्यासाठी संघाच्या प्रशिक्षक स्टाफशी जोडले गेले आहेत.

व्यंकटेश अय्यर हा हंगामातील केकेआयचा सर्वात महागडा खेळाडू आहे. २३.७५ करोड खर्च करून त्याला संघात सहभागी करून घेतले आहे. मात्र आतापर्यंत झालेल्या सामन्यांत त्याने २४.२० च्या सरासरीने केवळ १२१ धावा जमवल्या आहेत. रमणदीपनेही निराश केले आहे. सहा सामन्यांत त्याला केवळ २९ धावा करता आल्या आहेत.

धडाकेबाज फलंदाज आंद्रे रसेलने पाच सामन्यांत केवळ ३४ धावा जमवल्या आहेत. रिंकू सिंहने ३८.६६ च्या सरासरीने ११६ धावा आपल्या नावे केल्या आहेत.

अनुभवी रहाणे आणि युवा फलंदाज अंगक्रिश रघुवंशी यांच्या बॅटमधून त्यातल्या त्यात बऱ्या धावा आल्या आहेत. रहाणेने २ अर्धशतकांसह २२१ धावा केल्या आहेत. रघुवंशीने १७० धावांची भर घातली आहे.

क्विंटन डी कॉक आणि सुनिल नारायण यांनी काही सामन्यांत संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. पण त्यात सातत्य नाही. यावर नायरकडून काहीतरी उपाय करण्याची आशा केकेआरला आहे. गुजरातचा संघ चांगलाच लयीत आहे. ७ सामन्यांपैकी ५ सामन्यांमध्ये विजय मिळवत १० गुणांसह हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोलकाताला सर्वच आघाड्यांवर चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

नायर यांच्या मार्गदर्शनावर नजरा

अभिषेक नायर यांचे परतणे हे कोलकाता संघासाठी बळ असल्याचे बोलले जात आहे. कोलकाताचा संघ सध्या ७ सामने खेळला असून त्यांच्या खात्यात ६ गुण आहेत. प्ले ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी त्यांना उर्वरित ७ सामन्यांपैकी किमान ५ सामन्यांत विजय मिळवणे गरजेचे आहे. हंगामाता आतापर्यंत निराशाजनक कामगिरी करणारा उपकर्णधार व्यंकटेश अय्यर आणि रमणदीप सिंग यांच्यावर काम करण्यास नायर यांनी सुरुवात केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघ कशी कामगिरी करतो यावर क्रीडा विश्वाच्या नजरा आहेत.

प्रतिस्पर्धी संघ

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), रशिद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरूख खान, अनुज रावत, जेराल्ड कोएट्झे, गुर्नुर सिंग ब्रार, इशांत शर्मा, जयंत यादव, जोस बटलर, कगिसो रबाडा, करिम जनत, कुलवंत खेजरोलिया, कुमार कुशाग्र, महिपाल लोमरोर, मानव सुतार, मोहम्मद खान, मोहम्मद सिराज, निशांत सिंधू, प्रसिध कृष्णा, आर. साईकिशोर, शर्फेन रुदरफोर्ड, वॉशिंग्टन सुंदर, दसुन शनका.

कोलकाता नाइट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, सुनील नरिन, रिंकू सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, रमणदीप सिंग, अंक्रिश रघुवंशी, अनुकूल रॉय, लुवनित सिसोडिया, मनीष पांडे, मयांक मार्कंडे, आनरिख नॉर्किए, मोईन अली, क्विंटन डीकॉक, रहमनुल्ला गुरबाझ, रोवमन पॉवेल, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, चेतन साकरिया.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत