क्रीडा

कोल्हापूर ठरला श्रीकृष्ण करंडकाचा मानकरी; मुंबई उपनगर पश्चिमने पटकावला ‘पार्वतीबाई सांडव चषक’

कोल्हापूरने पुरुषांत, तर मुंबई उपनगर पश्चिमने महिलांत ७२ व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकावले.

Swapnil S

ठाणे : कोल्हापूरने पुरुषांत, तर मुंबई उपनगर पश्चिमने महिलांत ७२ व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकावले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने ठाणे जिल्हा कबड्डी असो.ने विश्वास सामाजिक संस्था व शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन केले होते. ठाणे पश्चिम येथील कॅडबरी कंपनीजवळील भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी क्रीडांगणावर झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरने अहमदनगरचा ४२-३२ असा पराभव करीत दोन तपाच्या कालावधीनंतर "श्रीकृष्ण करंडक" फिरत्या चषकाबरोबर मुख्यमंत्री चषकावर आपले नाव कोरले.

कोल्हापूरने सावध सुरुवात करीत नगरवर पहिला लोण देत विश्रांतीला १८-१३ अशी आघाडी घेतली. कोल्हापूरने विश्रांतीनंतर आपला खेळ अधिक गतिमान केला. त्यांच्या सौरभ फागरे याने एकाच चढाईत ३ गडी टिपत व शिलकी गड्याची पकड करीत दुसरा लोण देत २६-१६ अशी आपली आघाडी वाढविली. पुन्हा त्यांच्या साहिल पाटीलने एकाच चढाईत ४ गडी टिपत तिसरा लोण देत आपली आघाडी ३८-२४ अशी भक्कम केली. शेवटची पाच मिनिटे पुकारली तेव्हा ४०-२७ अशी कोल्हापूरकडे आघाडी होती. शेवटी १० गुणांच्या फरकाने कोल्हापूरने आपल्या दुसऱ्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

महिलांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगर पश्चिमने ५-५ चढायांत मुंबई शहर पश्चिमचा प्रतिकार ३३ - ३२ (६-५) असा मोडून काढत "पार्वतीबाई सांडव" फिरता चषक व मुख्यमंत्री चषक आपल्याकडे खेचून आणला. अंतिम सामना २७-२७ असा बरोबरीत संपला. सामन्याच्या निकालाकरिता दोन्ही संघांना प्रत्येकी ५-५ चढाया देण्यात आल्या. त्यात उपनगरने चढाईत ५ गुण व पूजा यादवची पकड करीत ६ गुण घेत बाजी मारली.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत