नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत चर्चा रंगत आहेत. त्या अनावश्यक आहेत. रोहितलाच त्याच्या निवृत्तीचा निर्णय घेऊदे, असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी केले.
रविवारी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धचे जेतेपद उंचावल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, तो एकदिवसीय फॉरमॅटमॅध्ये खेळत राहणार आहे. या विधानाने त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
३७ वर्षीय रोहित शर्माने २०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र त्याचे संघात असणे हे संघासाठी फायदेशीर असल्याचे वेंगसरकर यांना वाटते.
मी ज्योतीषी नाही. २०२७ च्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत अनेक सामने होणार आहेत. रोहितचा फॉर्म आणि फिटनेस यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. सध्या तरी आगामी विश्वचषकात तो खेळेल किंवा नाही याबद्दल बोलणे योग्य ठरणार नाही. मात्र रोहित हा उत्कृष्ट खेळाडू आणि कर्णधार आहे, असे मत वेंगसरकर यांनी व्यक्त केले.
लोक रोहितच्या निवृत्तीबाबत का चर्चा करतात ते मला माहित नाही. ते अनावश्यक आहे. खेळाडू त्याच्या भवितव्याबाबत विचार करेल, असे वेंगसरकर यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
दुबईमध्ये, विशेषतः न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यातील दबावाच्या परिस्थितीत त्याने पॉवरप्लेमध्ये भारताला मजबूत सुरुवात करून दिली. रोहित पहिल्या चेंडूपासूनच फटकेबाजी करत असल्यामुळे त्याचा फायदा संघातील अन्य फलंदाजांना झाला. इतर फलंदाजांना संथ खेळपट्टीशी जुळवून घेण्यासाठी वेळ मिळाला, असे वेंगसरकर म्हणाले.
अलिकडच्या काही मालिकांमध्ये खराब फॉर्ममुळे रोहितच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत चर्चा रंगत आहेत. रोहितने निवृत्ती घ्यावी अशी मागणी सोशल मीडियावर अनेकांनी केली आहे. स्वत: रोहितने याबाबत खुलासा करत टिकाकारांचे कान टोचले आहेत. मी एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळत राहणार आहे, असे रोहित म्हणाला. त्यामुळे आता रोहित निवृत्त होणार या चर्चा थांबल्या आहेत. दरम्यान भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनीही रोहितला पाठिंबा देत त्याच्या निवृत्तीचा निर्णय त्यालाच घेऊद्या असे म्हटले. तसेच रोहितच्या निवृत्तीबाबत होत असलेल्या चर्चा निरर्थक असल्याचे वेंगसरकर म्हणाले.
रोहितसारखे खेळाडू मोठ्या सामन्यांसाठीच
विराट आणि रोहितसारखे खेळाडू मोठ्या सामन्यांसाठीच असतात. व्यासपीठ जितके मोठे, तितकी त्यांची कामगिरी उत्कृष्ट असते. या खेळाडूंमुळे प्रतिस्पर्धी संघावर दबाव येतो, असे वेंगसरकर म्हणाले.