क्रीडा

रिंकू, श्रेयस, सुंदरच्या कामगिरीकडे लक्ष; Duleep Trophy Cricket Tournamentची दुसरी फेरी आजपासून

Duleep Trophy Cricket Tournament: रिंकू सिंग याच्यासह श्रेयस अय्यर तसेच वॉशिंग्टन सुंदर यांच्यासह अनेक खेळाडूंच्या कामगिरीकडे सध्या राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष लागले आहे. दुलीप करंडक स्पर्धेची दुसरी फेरी गुरुवारपासून येथे सुरू होत आहे

Swapnil S

अनंतपूर : रिंकू सिंग याच्यासह श्रेयस अय्यर तसेच वॉशिंग्टन सुंदर यांच्यासह अनेक खेळाडूंच्या कामगिरीकडे सध्या राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष लागले आहे. दुलीप करंडक स्पर्धेची दुसरी फेरी गुरुवारपासून येथे सुरू होत आहे. भारत अ विरुद्ध भारत ड तसेच भारत ब विरुद्ध भारत क संघ अशा चारदिवसीय लढती होणार आहेत.

बांगलादेशविरुद्ध चेन्नई येथे १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय खेळाडूंना राष्ट्रीय सराव शिबिरासाठी मुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील अव्वल खेळाडू सराव शिबिरासाठी गेले असताना, दुय्यम फळीकडे निवड समितीच्या नजरा असतील. भारतीय संघातील एकमेव सर्फराझ खान हा देशांतर्गत स्पर्धेत खेळत आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनसुद्धा रिंकू सिंगला पहिल्या फेरीसाठी डावलण्यात आले होते.

शुभमन गिल राष्ट्रीय संघात सामील झाल्याने आता भारत अ संघाचे नेतृत्व मयांक अगरवाल याच्याकडे सोपवण्यात आले आहे. मार्च २०२२मध्ये शेवटची कसोटी खेळलेल्या अगरवालला आता चमक दाखवण्याची संधी मिळणार आहे. वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा हा दुखापतीमुळे पहिल्या फेरीत खेळू शकला नव्हता. पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही त्याचा भारत अ संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रसिध कृष्णाला चाचपडून पाहिले जात आहे.

भारत ब संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन याच्यावर संघाच्या कामगिरीत विजयी सातत्य राखण्याचे आव्हान असणार आहे. इंग्लंडविरुद्ध यावर्षी दमदार कसोटी पदार्पण करणाऱ्या सर्फराझ खानला पहिल्या फेरीत चमकदार कामगिरी करता आली नसली तरी त्याचा धाकटा भाऊ मुशीर खान याने १८१ धावांची खेळी साकारत भारत ब संघाला भारत अ संघावर विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली. त्यामुळे आता भारतीय संघाच्या सराव शिबिरात सामील होण्याआधी सर्फराझकडून मो ठ्या खेळीची अपेक्षा बाळगली जात आहे. वॉशिंग्टन सुंदर याचाही भारत ब संघात समावेश करण्यात आला आहे.

भारत क संघाचे सलामीवीर साई सुदर्शन आणि ऋतुराज गायकवाड यांच्यावर पुन्हा एकदा संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी असेल. डावखुरा फिरकीपटू मानव सुतार याने भारत ड संघाविरुद्ध मॅचविनिंग कामगिरी केली होती. रजत पाटिदार यालाही धावांची भूक सतावत आहे.

भारत ड संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर यालाही बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी डावलण्यात आले असले तरी राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी तो नक्कीच आटापिटा करणार आहे. देवदत्त पडिक्कल आणि संजू सॅमसन हेसुद्धा भारत ड संघातून खेळत असून त्यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

भारत अ संघ : मयांक अगरवाल (कर्णधार), रियान पराग, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, प्रसिध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, कुमार कुशाग्रा, शाश्वत रावत, प्रथम सिंग, अक्षय वाडकर, एसके रशीद, शम्स मुलानी, आकिब खान.

भारत ब संघ : अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), सर्फराझ खान, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, मुकेश कुमार, राहुल चहर, आर. साईकिशोर, मोहित अवस्थी, एन, जगदीशन, सुयश प्रभूदेसाईल, रिंकू सिंग, हिमांशू मंत्री.

भारत क संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटिदार, अभिषेक पोरेल, बी. इंद्रजित, हृतीक श्लोकीन, मानव सुतार, गौरव यादव, वैश्यक विजयकुमार, अंशूल कंबोज, हिमांशू चौहान, मयांक मार्कंडे, आर्यन जुयल, संदीप वॉरियर.

भारत ड संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, सारांश जैन, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, आकाश सेनगुप्ता, सौरभ कुमार, संजू सॅमसन, निशांत सिंधू, विद्‌वथ कावेराप्पा.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी