आपल्या २९व्या वाढदिवशी लव्हलिना बोर्गोहैनने चीनच्या झियी बाओचा ५-० असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. मागील स्पर्धेत तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
लव्हलिनाने आपल्या अधिक उंचीचा पुरेपूर फायदा घेतला, तर २० वर्षीय बाओने सतत अंतर कमी करण्याचा आणि भारतीय खेळाडूला हालचालीसाठी मोकळी जागा न देण्याचा प्रयत्न केला. या रणनीतीमुळे सामना काहीसा विस्कळीत झाला, कारण बाओने वारंवार क्लिंच (प्रतिस्पर्ध्याला पकडून ठेवणे) करण्याचा पवित्रा घेतला.
आपल्या नेहमीच्या शैलीपेक्षा वेगळी सुरुवात करत लव्हलिनाने आक्रमक पवित्रा घेतला आणि सुरुवातीलाच काही ठोसे लगावले. मात्र बाओनेही तितक्याच आक्रमकपणे प्रतिआक्रमण केले. डावखुरी असलेल्या चिनी खेळाडूने काही कॉम्बिनेशन पंच मारले, पण त्यानंतर लोव्हलिनाने काही अचूक आणि जोरदार ठोसे लगावत फेरीचा दमदार शेवट केला आणि ३-२ अशा फरकाने ती फेरी जिंकली.
मागे पडलेली बाओ दुसऱ्या फेरीत अधिक आक्रमक झाली आणि तिने अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला, तर लोव्हलिनाने तिला दूर ठेवण्याचा आणि आपल्या ठोशांसाठी जागा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. फेरीच्या अखेरीस भारतीय खेळाडूला आपला अचूक पल्ला सापडला; तिने सलग काही अचूक ठोसे लगावले आणि गुणांनुसार ४-१ अशा फरकाने ती फेरी जिंकली.
अंतिम फेरीतही हेच चित्र पाहायला मिळाले. बाओने भरपूर ठोसे मारले, पण तिला ते अचूकपणे लगावण्यात अडचण आली. लव्हलिनाने बचावात्मक पवित्रा कायम राखला आणि प्रति-आक्रमणासाठी योग्य क्षणाची निवड केली. “आज माझा वाढदिवस आहे आणि हे माझ्यासाठी खूप खास आहे. मला स्वतःला सुवर्णपदकाची भेट द्यायची होती. मी माझे सर्वस्व पणाला लावले,” असे लव्हलिना म्हणाली.
भारताने प्रथमच आशियाई स्पर्धेत महिला बॉक्सिंगमध्ये २ सुवर्णपदक पटकावले.
क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला बॉक्सरच्या निवडक गटात दिग्गज एम. सी. मेरी कोम यांच्यासोबत स्थान मिळवत लव्हलिना आणि परवीन यांनी १२ वर्षांची प्रतीक्षा संपवली. मेरी कोमने बॉक्सरने २०१४च्या स्पर्धेत फ्लायवेट (५१ किलो) गटात विजेतेपद पटकावले होते.