क्रीडा

वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धा : पुरुषांनी रेल्वेचा विजयरथ रोखला; महिलांची सलग दुसऱ्यांदा बाजी

पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्र आणि भारतीय रेल्वे एकमेकांविरुद्ध उभे ठाकले. गेल्या काही वर्षांपासून रेल्वेचा संघ महाराष्ट्राच्या पुरुषांवर अंतिम फेरीत सातत्याने वर्चस्व गाजवत होता. मात्र यंदा महाराष्ट्राच्या पुरुषांनी रेल्वेला ५२-५० असे अवघ्या दोन गुणांच्या फरकाने नमवून २०१९नंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला.

Swapnil S

नवी दिल्ली : करमाळी सिंग क्रीडांगण, बसंत लेन, रेल्वे कॉलनी, पहारगंज येथे संपन्न झालेल्या ५६व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने दुहेरी यश संपादन केले. पुरुषांच्या विभागात महाराष्ट्राने भारतीय रेल्वेची मक्तेदारी संपुष्टात आणली. तर महिलांमध्ये महाराष्ट्राने सलग दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली. २०१९ नंतर प्रथमच महाराष्ट्राला राष्ट्रीय स्पर्धेत दुहेरी जेतेपद मिळाले आहे. त्याशिवाय महाराष्ट्राने एकंदर १२व्यांदा दुहेरी मुकुट पटकावला, हे विशेष. पुण्याचा सुयश गरगटे आणि धाराशिवची अश्विनी शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराचे मानकरी ठरले.

पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्र आणि भारतीय रेल्वे एकमेकांविरुद्ध उभे ठाकले. गेल्या काही वर्षांपासून रेल्वेचा संघ महाराष्ट्राच्या पुरुषांवर अंतिम फेरीत सातत्याने वर्चस्व गाजवत होता. मात्र यंदा महाराष्ट्राच्या पुरुषांनी रेल्वेला ५२-५० असे अवघ्या दोन गुणांच्या फरकाने नमवून २०१९नंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या लढतीत महाराष्ट्रला जादा डावात विजयासाठी १० गुणांची गरज होती. डाव संपण्यासाठी एक मिनिट शिल्लक असताना महाराष्ट्रला जिंकण्यासाठी एक गुण आवश्यक होता. शेवटचे दोन सेकंद असताना गडी बाद करत महाराष्ट्राने रेल्वेवर सरशी साधली.

महिलांच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राने भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) संघावर ३.२० मिनिटे राखून १८-१६ असा विजय मिळवला. मध्यंतराला महाराष्ट्राकडे १०-८ अशी आघाडी होती. प्रियांका इंगळे (२.२० मिनिटे संरक्षण आणि ४ गुण), अश्विनी (२.१० मि., ४ गुण), काजल भोर (६ गुण) यांच्या कामगिरीला महाराष्ट्राच्या विजयाचे श्रेय जाते. प्राधिकरणाकडून प्रियांका भोपीने चांगला खेळ केला. पुरुष गटात स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या सुयशला एकलव्य पुरस्कार, तर महिला गटातील विजेत्या अश्विनीला राणी लक्ष्मीबाई पुरस्काराने गौरविण्यात आले.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत