क्रीडा

महाराष्ट्राचा पदकांचा षटकार: कुस्ती, वेटलिफ्टिंग, नेमबाजीत पदकांची लयलूट; पदकतालिकेतील अग्रस्थान कायम

नेमबाजी पुण्याच्या स्वराज भोंडवेने २५ मीटर पिस्तूल प्रकारात कांस्यपदकाचा वेध घेतला.

Swapnil S

चेन्नई : पदकतालिकेत अग्रस्थानी विराजमान असलेल्या महाराष्ट्राने शनिवारी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पदकांचा षटकार लगावला. महाराष्ट्राने वेटलिफ्टिंग, कुस्ती, नेमबाजीमध्ये पदके पटकावली. तसेच खो-खो, टेनिसमध्ये दमदार विजय नोंदवले.

कोल्हापूरच्या समर्थ म्हाकवेने ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात ७२ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकताना छत्तीसगडच्या अभिषेक निषादला ८-० अशी धूळ चारली. पूर्वी देखील त्याने खेलो इंडिया स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. मात्र, यावर्षी जास्त सराव, मेहनत आणि प्रशिक्षण घेवून त्याने पदकाचा रंग बदलला. समर्थचे वडील टेम्पोचालक, तर आई शासनाच्या शाळेतील पोषण आहार तयार करणारी स्वयंपाकी आहे. त्याशिवाय आदित्य ताटेने झारखंडच्या बख कांचपवर ६-५ अशी मात करताना कांस्यपदक प्राप्त केले.

वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राच्या महादेव वडारने मुलांच्या ६७ किलो वजनी गटात २५३ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. त्याने स्नॅचमध्ये ११३, तर क्लीन अँड जर्कमध्ये १४० किलो वजन उचलले. सुवर्णपदक वडिलांना समर्पित करतो. आईच्या निधनानंतर त्यांनी माझ्यासाठी फार मेहनत घेतली, असे महादेव म्हणाला. त्याशिवाय अनुष लोखंडेने ६१ किलो वजनी गटात २३७ किलो भार उचलून रौप्यपदकाला गवसणी घातली. निखिल कोळीने ५५ किलो गटात २१२ किलो वजन उचलून रौप्यपदक मिळवले.

नेमबाजी पुण्याच्या स्वराज भोंडवेने २५ मीटर पिस्तूल प्रकारात कांस्यपदकाचा वेध घेतला. त्याशिवाय खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी दोन विजय नोंदवले. मुलांमध्ये महाराष्ट्राने तमिळनाडूचा २५-२० असा एक डाव व ५ गुणांनी धुव्वा उडवला. भगतसिंग वसावे, रमेश वसावे व विकास देशमाने यांनी कमाल केली. मुलींच्या गटात महाराष्ट्राने तमिळनाडूला ३२-२१ अशी एक डाव व ११ गुणांनी धूळ चारली. सानिका चाफे, दीपाली राठोड व कल्याणी कंक यांना या विजयाचे श्रेय जाते.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले