नवी दिल्ली : खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन न लाभल्याने माझ्याकडूनच काहीतरी चूक झाली असावी. मात्र पुरस्कार नाही मिळाला, तरी देशासाठी मी यापुढेही पदके जिंकत राहीन, अशी प्रतिक्रिया भारताची तारांकित नेमबाज मनू भाकरने व्यक्त केली.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवणाऱ्या मनूला खेलरत्न पुरस्काराच्या नामांकनाच्या यादीतून डावलण्यात आल्याचे समजते. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मनूने खेलरत्न पुरस्कारासाठी अर्ज न केल्याचे समजते. तूर्तास कोणत्या खेळाडूंना या पुरस्कारासाठी नामांकन लाभले आहे, याची पूर्ण यादी अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे मनूने अर्ज भरला नसला, तरी तिचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात येणार का, हे पाहणे रंजक ठरेल. मनूच्या वडिलांनी सोमवारी क्रीडा मंत्रालय व शासनावर कडाडून टीका केली होती. मनूने मात्र तिच्याकडून काही तरी चूक झाली असावी, हे मान्य केले. त्यामुळे हे प्रकरण रंगतदार झाले आहे.