क्रीडा

मराठा रॉयल्सची टी-२० मुंबई लीगच्या जेतेपदाला गवसणी; सोबो मुंबई फाल्कन्स संघावर ५ गडी राखून वर्चस्व

सिद्धेश लाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्स संघाने मुंबईतील प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील सोबो मुंबई फाल्कन्सला ५ गडी आणि ४ चेंडू राखून धूळ चारली. याबरोबरच त्यांनी टी-२० मुंबई लीगच्या तिसऱ्‍या पर्वाचा विजेता ठरण्याचा मान मिळवला. रॉयल्सचा चिन्मय सुतार सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

Swapnil S

ऋषिकेश बामणे/मुंबई

सिद्धेश लाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्स संघाने मुंबईतील प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील सोबो मुंबई फाल्कन्सला ५ गडी आणि ४ चेंडू राखून धूळ चारली. याबरोबरच त्यांनी टी-२० मुंबई लीगच्या तिसऱ्‍या पर्वाचा विजेता ठरण्याचा मान मिळवला. रॉयल्सचा चिन्मय सुतार सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

सोबो फाल्कन्सने सुरुवातीच्या अडचणींवर मात करत मयुरेश तांडेलची नाबाद ५० धावांची संयमी खेळी आणि हर्ष आघावच्या आक्रमक नाबाद ४५ धावांच्या जोरावर २० षटकांत ४ बाद १५७ धावांपर्यंत मजल मारली. मराठा रॉयल्ससाठी लक्ष्याचा पाठलाग करताना चिन्मय (५३), साहिल जाधव (२२), सचिन यादव (१९) आणि स्फोटक अवैस खान (३८) यांनी मौल्यवान योगदान देत १९.२ षटकांत संघाचा विजय साकारला. कर्णधार सिद्धेश लाड (१५) आणि साहिल यांनी ३२ धावांची आक्रमक सलामी भागीदारी करत रॉयल्सला स्थिर सुरुवात करून दिली. त्यानंतर ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या चिन्मयने सूत्रे हाती घेतली आणि सचिन यादवसोबत ४१, तर अवैस खानसोबत ६३ धावांची भागीदारी करून रॉयल्सला धावांचा पाठलाग करताना चांगली पकड मिळवून दिली.

तथापि, १० चेंडूंत फक्त ८ धावा हव्या असताना डावखुरा फिरकी गोलंदाज कार्तिक मिश्राने एका षटकात शानदार गोलंदाजी करत फाल्कन्सला पुन्हा स्पर्धेत आणले. त्याने अवैस आणि चिन्मय दोघांनाही बाद करून सामन्याला कलाटणी दिली. परंतु शेवटच्या षटकात सात धावांची गरज असताना, रोहन राजेने आपला संयम राखला. पहिल्या चेंडूवर त्याने चौकार मारला आणि मग चार चेंडू शिल्लक असताना विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी, मराठा रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. फाल्कन्सला सुरुवातीला लय सापडली नाही. त्यांनी अंक्रिश रघुवंशी (७) आणि इशान मुलचंदानी (२०) यांना फक्त ३३ धावांतच गमावले. कर्णधार श्रेयस अय्यर (१२) आणि अमोघ भटकल (१६) देखील लवकर बाद झाले. डावखुरा फिरकी गोलंदाज वैभव माळीने फाल्कन्सला धक्के दिले. त्याने रघुवंशी व अय्यर अशा महत्त्वाच्या विकेट मिळवल्या. १२ षटकांनंतर ७२/४ अशा धावसंख्येवर संघर्ष करत असताना, मयुरेश आणि हर्ष यांनी पाचव्या विकेटसाठी ८५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यांच्या अखंड भागीदारीने केवळ डाव स्थिरावला नाही, तर अंतिम सामन्याच्या दुसऱ्या सत्रात संघाला महत्त्वपूर्ण गती दिली. मात्र तरीही फाल्कन्सची धावसंख्या विजयासाठी पुरेशी ठरली नाही.

खेळाडूंकडून आदरांजली

सोबो मुंबई फाल्कन्स आणि मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्सच्या खेळाडूंनी संध्याकाळी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांसह अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. वानखेडे स्टेडियमवर टी-२० मुंबई लीग २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी, मोठ्या स्क्रीनवर शोक संदेश प्रदर्शित करण्यात आला आणि सर्व खेळाडू दंडावर काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरले. “आजच्या अपघातातील बळींसोबत आमच्या प्रार्थना आहेत. शांततेत आणि एकजुटीने त्यांचे स्मरण करत आहोत," असा संदेश यावेळी स्क्रीनवर झळकत होता.

वानखेडे हाऊसफुल्ल

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यासाठी जवळपास २५ हजार मुंबईकर उपस्थित होते. तसेच भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यासाठी उपस्थित होता. पहिली इनिंग संपल्यानंतर एमसीएतर्फे खास म्युझिक आणि लाईट शो करण्यात आला. हा लाईट शो डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. एकंदर गेल्या दहा दिवसांत आयोजित केलेल्या या स्पर्धेला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’

‘निसार’ उपग्रहाचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण; घनदाट जंगल व अंधारातही छायाचित्र टिपण्याची क्षमता

मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल

२०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना लॉटरी! मिळणार ५०० चौरस फुटांचे घर; शासकीय भूखंडावरील अतिक्रमणधारकांना राज्य सरकारचा दिलासा

शिर्डी-तिरुपती प्रवास होणार सोपा; दोन्ही मार्गांवर १८ विशेष फेऱ्या, एकूण २८ ठिकाणी थांबे