विशाखापट्टणम : डावखुऱ्या मिचेल स्टार्कने (३५ धावांत ५ बळी) वेगवान गोलंदाजीचा अप्रतिम नमुना सादर करताना सनरायजर्स हैदराबादला जबर हादरा दिला. त्यामुळे इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) रविवारी दुपारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. स्टार्कसह चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव (२२ धावांत ३ बळी) आणि फॅफ डुप्लेसिस (२७ चेंडूंत ५० धावा) यांनीही मोलाचे योगदान दिल्यामुळे दिल्लीने ७ गडी व २४ चेंडू राखून हैदराबादवर वर्चस्व गाजवले. हैदराबादचा हा सलग दुसरा पराभव ठरला.
विशाखापट्टणम येथील राजशेखर रेड्डी स्टेडियमवर झालेल्या उभय संघांतील या लढतीत दिल्लीने हैदराबादला १८.४ षटकांत १६३ धावांत गुंडाळले. मग बेधडक फलंदाजीच्या बळावर त्यांनी १६ षटकांतच विजयीरेषा ओलांडली. या विजयासह दिल्लीने २ सामन्यांतील ४ गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले. तर हैदराबादला ३ सामन्यांत दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागल्याने त्यांची तूर्तास सातव्या स्थानी घसरण झाली. पाच बळी घेणारा स्टार्क सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. हैदराबादच्या २३ वर्षीय युवा अनिकेत वर्माची ४१ चेंडूंतील ७४ धावांची खेळी व्यर्थ ठरली.
नाणेफेक जिंकून हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र अभिषेक शर्मा अवघ्या १ धावेवर धावचीत झाला. त्यानंतर स्टार्कने तिसऱ्या षटकात इशान किशन (२) व नितीश रेड्डी (०) यांचा अडसर दूर करून हैदराबादला हादरवले. पाचव्या षटकात स्टार्कने धोकादायक ट्रेव्हिस हेडलाही (२२) जाळ्यात अडकवून हैदराबादची ४ बाद ३७ अशी अवस्था केली.
त्यानंतर अनिकेत व हेनरिच क्लासेन यांची जोडी जमली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी झटपट ७७ धावांची भागीदारी रचली. मोहित शर्माने क्लासेनचा (३२) काटा काढला. विपराज निगमने त्याला उलट दिशेने धावून सुरेख झेल टिपला. अनिकेतने मात्र ५ चौकार व ६ षटकारांसह घणाघाती पहिले अर्धशतक साकारले. अखेर कुलदीपने अनिकेतला १६व्या षटकात बाद केले. सीमारेषेजवळ जेक फ्रेसरने हवेत झेपावून त्याचा अफलातून झेल टिपला. त्याच्या फटकेबाजीमुळे हैदराबादने जेमतेम १५० धावांचा पल्ला गाठला. अखेरीस स्टार्कने १९व्या षटकात हर्षल पटेल व वियान मल्डरला बाद करून पंचक पूर्ण केले.
लक्ष्याचा पाठलाग करताना डुप्लेसिस व फ्रेसर यांनी हैदराबादच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. या दोघांनी ५५ चेंडूंत ८१ धावांची सलामी नोंदवली. विशेषत: डुप्लेसिसने ३ चौकार व ३ षटकारांसह आक्रमण करताना आयपीएल कारकीर्दीतील ३८वे अर्धशतक झळकावले. फ्रेसरने ४ चौकार व २ षटकारांसह ३८ धावा केल्या. २५ वर्षीय लेगस्पिनर झीशानने डुप्लेसिस व फ्रेसरला एकाच षटकात बाद केले.
मात्र त्यानंतर आलेल्या के. एल. राहुल (५ चेंडूंत १५), अभिषेक पोरेल (नाबाद ३४), ट्रिस्टन स्टब्स (नाबाद २१) यांनीही फटकेबाजी सुरूच ठेवली. झीशानने राहुलला बाद केल्यावर स्टब्स व पोरेल यांनी चौथ्या विकेटसाठी ५१ धावांची अभेद्य भागीदारी रचली. अखेर १५व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर पोरेलने मल्डरला षटकार लगावून दिल्लीच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. लखनऊ, हैदराबाद यांसारख्या संघांना नमवल्यामुळे दिल्लीचा आत्मविश्वास बळावला असून आता त्यांची शनिवारी चेन्नईशी गाठ पडणार आहे.
संक्षिप्त धावफलक
सनरायजर्स हैदराबाद : १८.४ षटकांत १६३ (अनिकेत वर्मा ७४, हेनरिच क्लासेन ३२; मिचेल स्टार्क ५/३५, कुलदीप यादव ३/२२) पराभूत वि. दिल्ली कॅपिटल्स : १६ षटकांत ३ बाद १६६ (फॅफ डुप्लेसिस ५०, जेक फ्रेसर ३८, अभिषेक पोरेल नाबाद ३४; झीशान अन्सारी ३/४२)
स्टार्क हा आयपीएलच्या इतिहासात दिल्ली संघासाठी पाच बळी घेणारा पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला.