मुंबई : ऑफस्पिनर तनुष कोटियनने (८१ धावांत ८ बळी) कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना दुसऱ्या डावात तब्बल आठ बळी मिळवले. त्यामुळे मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी ड-गटातील साखळी सामन्यात हरयाणाचा १० गडी राखून धुव्वा उडवला. मुंबईने दिवाळीपूर्वी बोनस गुणासह सलग तिसरा विजय मिळवला, हे विशेष.
बीकेसी येथील शरद पवार क्रिकेट अकादमीच्या मैदानात झालेल्या या लढतीत मुंबईने हरयाणाचा दुसरा डाव ८५.३ षटकांत २५६ धावांत गुंडाळला. त्यामुळे मुंबईपुढे उर्वरित २३ षटकांत ९७ धावांचे लक्ष्य उभे ठाकले. मात्र अंक्रिश रघुवंशी (३९ चेंडूंत नाबाद ६७ धावा) आणि दिव्यांश सक्सेना (२५ चेंडूंत नाबाद ३० धावा) यांनी अवघ्या १०.४ षटकांतच एकही गडी न गमावता मुंबईचा विजया साकारला. रणजी स्पर्धेत एक डाव राखून अथवा १० गडी राखून विजय मिळवल्यास सहा गुणांसह अतिरिक्त १ बोनस गुण (एकूण ७ गुण) दिला जातो. पहिल्या डावात शतक साकारण्यासह लढतीत एकूण ८ बळी मिळवणारा मुशीर खान सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. सिद्धेश लाडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईने यापूर्वी अनुक्रमे चंदीगड व हिमाचल प्रदेशला डावाने धूळ चारली होती. त्यामुळे मुंबई ३ सामन्यांतील सर्वाधिक २१ गुणांसह ड-गटात अग्रस्थानी विराजमान आहे. आता २ नोव्हेंबरपासून ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबईची चौथ्या साखळी लढतीत रेल्वेशी गाठ पडेल.
दरम्यान, देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेचे स्थान असलेल्या रणजी स्पर्धेच्या ९२व्या हंगामाला ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. एलिट गटातील ३२ संघांत होणाऱ्या या स्पर्धेत कोण बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरेल. गतवर्षीप्रमाणे यावेळीसुद्धा रणजी स्पर्धा दोन टप्प्यांत खेळवण्यात येईल. या स्पर्धेचा पहिला टप्पा ११ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत होईल. या काळात प्रत्येक संघ चार सामने खेळेल. दरम्यानच्या काळात विजय हजारे एकदिवसीय स्पर्धा व सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा रंगेल. १७ जानेवारीपासून रणजीच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ होईल.
तत्पूर्वी, पहिल्या डावात मुंबईने मुशीर व अंक्रिश यांच्या शतकांच्या बळावर ४३० धावा केल्या. मग मुशीरनेच सहा बळी मिळवत हरयाणाचा पहिला डाव २७० धावांत गुंडाळला. १६० धावांची आघाडी मिळाल्याने मुंबईने हरयाणावर फॉलोऑन लादला. बुधवारी तिसऱ्या दिवसअखेर हरयाणाने दुसऱ्या डावात २ बाद ७३ धावा केल्या होत्या. तेथून पुढे गुरुवारी चौथ्या दिवशी त्यांच्याकडून निशांत सिंधू (४४), हिमांशू राणा (४६), समंत जखार (४०) यांनी चांगली झुंज दिली. मात्र तनुषच्या फिरकीपुढे अन्य फलंदाजी ढेपाळली व हरयाणाचा संघ ८५.३ षटकांत २५६ धावांत गारद झाला.
परिणामी मुंबईपुढे विजयासाठी ९७ धावांचे लक्ष्य होते. मुंबईने एकही बळी गमावला असता, तरी त्यांना बोनस गुण मिळाला नसता. मात्र अंक्रिश व दिव्यांशने आक्रमक फलंदाजी करत हरयाणाला हताश केले. २२ वर्षीय अंक्रिशने ७ चौकार व ३ षटकारांसह अर्धशतक साकारताना ३९ चेंडूंतच एकूण नाबाद ६७ धावा फटकावल्या. तर २५ वर्षीय दिव्यांशने २५ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३० धावा करून त्याला सुरेख साथ दिली. या दोघांनी ९७ धावांची सलामी नोंदवून अखेरच्या सत्रात मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ४३०
हरयाणा (पहिला डाव) : २७०
हरयाणा (दुसरा डाव) : ८५.३ षटकांत सर्व बाद २५६ (हिमांशू राणा ४६, निशांत सिंधू ४४; तनुष कोटियन ८/८१)
मुंबई (दुसरा डाव) : १०.४ षटकांत ९७ (अंक्रिश रघुवंशी नाबाद ६७, दिव्यांश सक्सेना नाबाद ३०)
सामनावीर : मुशीर खान
गुण : मुंबई ७, हरयाणा ०
भारतीय संघातील स्थानासाठी दावेदारी
२८ वर्षीय तनुषने आणखी एका लक्षवेधी कामगिरीसह भारतीय कसोटी संघातील स्थानासाठी दावेदारी सादर केली आहे. तनुषला २०२५मध्ये अश्विनच्या निवृत्तीनंतर बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान अचानक भारतीय संघात बोलावण्यात आले होते. मात्र त्याला पदार्पणाची संधी लाभली नाही. प्रत्येक रणजी लढतीत दोन्ही डावांत मिळून किमान ५० धावा व गोलंदाजीतही ५ ते ६ बळी, असे योगदान तनुष सातत्याने देत आहे.
“मी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होतो. मला ज्या प्रकारची क्षेत्ररचना हवी होती, त्यासाठी मी खास आग्रह धरत होतो आणि त्यानुसार गोलंदाजी करत होतो. त्यामुळे फलंदाजांविरुद्ध संधी निर्माण करता आल्या. माझी लयही चांगली होती,” असे तनुष सामन्यानंतर म्हणाला. “गेल्या चार वर्षांत आम्हा सर्वांनाच बळी मिळत होते. यावेळी मला संधी मिळाली. माझ्या हातातून चेंडू चांगल्या प्रकारे सुटत होता आणि एका बाजूने मला सातत्याने बळी मिळत गेले,” असेही तनुषने सांगितले.