संग्रहित छायाचित्र
क्रीडा

रोहित-धोनीचं आज पुनरागमन? वानखेडेवर मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स भिडणार; आयुष म्हात्रेच्या जागी 'या' तरुण खेळाडूची वर्णी?

आयपीएलमधील दोन सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर समोरासमोर उभे ठाकणार आहेत. या हायव्होल्टेज लढतीत दोन्ही संघ सातत्य राखण्याच्या प्रयत्नात असतील.

Krantee V. Kale

मुंबई : आयपीएलमधील दोन सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर समोरासमोर उभे ठाकणार आहेत. या हायव्होल्टेज लढतीत दोन्ही संघ सातत्य राखण्याच्या प्रयत्नात असतील. विशेषतः मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि चेन्नईचा माजी कर्णधार एम. एस. धोनी मैदानात परतणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगची दुखापत असून धोनीला पायाच्या स्नायूंचा ताण आहे.

रोहितने मंगळवारी झालेल्या पर्यायी सराव सत्रात भाग घेतला नाही, तर धोनी सरावात सक्रिय दिसला. धोनी या हंगामात अद्याप एकही सामना खेळलेला नाही, मात्र गुरुवारी तो इम्पॅक्ट सबस्टिट्यूट म्हणून मैदानात उतरण्याचे संकेत मिळत आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच वेळा विजेतेपद पटकावले असले, तरी यंदा मात्र ते अनेक समस्यांशी झुंजत आहेत. गुणतालिकेत मुंबई इंडियन्स सातव्या, तर चेन्नई सुपर किंग्स आठव्या क्रमांकावर असून दोन्ही संघांचे प्रत्येकी चार गुण आहेत. केवळ नेट रन रेटमुळे मुंबई चेन्नईच्या वर आहे.

आयुष आणि खलिलच्या जागी उर्वील पटेल, स्पेन्सर जॉन्सन?

चेन्नईला स्थानिक खेळाडू आयुष म्हात्रेच्या दुखापतीमुळे मोठा धक्का बसला आहे. म्हात्रेने २०१ धावा केल्या होत्या, मात्र हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो बाहेर पडला आहे. त्याच्या जागी गुजरातचा युवा यष्टीरक्षक फलंदाज उर्वील पटेलचा पर्याय चेन्नईसमोर आहे. तर, गोलंदाजांमध्ये जखमी खलिल अहमदच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या स्पेन्सर जॉन्सनलाही संधी दिली जाऊ शकते.

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नईची फलंदाजी चिंतेचा विषय ठरली आहे. सरफराज खानने १४७ धावा केल्या असल्या तरी त्याला मोठ्या खेळीत रूपांतर करता आलेले नाही. तसेच कर्णधार ऋतुराज गायकवाड केवळ ८२ धावा करू शकल्याने त्याच्या कामगिरीवरही दबाव आहे. दुसरीकडे, संजू सॅमसनच्या १९२ धावा चेन्नईसाठी दिलासादायक आहेत.

मुंबई विल जॅक्सला संधी देणार?

मुंबई इंडियन्सने मागील सामन्यात विजय मिळवून आपला चार सामन्यांचा पराभव सत्र संपवला आहे. टिळक वर्माने अहमदाबादमध्ये केलेल्या शतकामुळे मुंबईच्या मोहिमेला नवी उमेद मिळाली आहे. मात्र, टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या यांचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. सूर्यकुमारने आतापर्यंत केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह फॉर्मात परतणे आणि अश्वनी कुमारने घेतलेले चार बळी ही मुंबईसाठी जमेची बाजू आहे. तसेच इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू विल जॅक्स मुंबईच्या ताफ्यात सामील झाला असून त्याच्या समावेशामुळे संघाची फलंदाजी अधिक भक्कम होण्याची शक्यता आहे. चेन्नईने मुंबईविरुद्धच्या मागील पाच सामन्यांपैकी चार सामने जिंकले आहेत.

वानखेडे स्टेडियमवर गोलंदाजांसमोर समुद्राच्या वाऱ्याचे आव्हान

मुंबईचे वानखेडे स्टेडियम हे फलंदाजांसाठी नंदनवन मानले जाते. येथील खेळपट्टी, मैदानाची लहान रचना आणि वेगवान आऊटफिल्डमुळे फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारणे सोपे जाते. चालू हंगामात या मैदानावर झालेल्या तीन सामन्यांनंतर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या २१८ इतकी आहे. मात्र, धावांचा डोंगर उभा करूनही पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला येथे केवळ एकदाच विजय मिळवता आला आहे. फलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या या मैदानावर सुरुवातीच्या षटकांमध्ये गोलंदाजांनाही काही प्रमाणात मदत मिळते. अरबी समुद्र जवळच असल्याने येणाऱ्या समुद्री वाऱ्यांमुळे पॉवरप्लेमध्ये चेंडू स्विंग होण्यास मदत होते. फलंदाजांची फटकेबाजी आणि गोलंदाजांना मिळणारा सुरुवातीचा स्विंग यामुळे वानखेडेवरील सामने चुरशीचे ठरत आहेत.

धोनीचा कसून सराव

पोटरीचे स्नायू दुखावल्यामुळे गेल्या सहा सामन्यांना मुकलेला चेन्नईचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंह धोनी आता पुनरागमन करण्याची शक्यता आहे. दुखापतीतून पूर्णपणे बरा झाल्यानंतर धोनीने बुधवारी वानखेडे स्टेडियमवर कसून सराव केला. जवळपास तासभर फलंदाजीचा सराव करत त्याने वेगवान गोलंदाजांचा सामना केला. हैदराबादविरुद्धच्या गेल्या सामन्यात त्याने संघासोबत प्रवास केला, मात्र सराव करणे टाळले होते. मात्र आता वानखेडेवर दमदार सराव करत त्याने २०२६च्या आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत.

टप्प्यातले रेकॉर्ड

-मुंबई इंडियन्सचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव याला टी-२० क्रिकेटमध्ये ९५० चौकारांचा टप्पा गाठण्यासाठी तीन चौकारांची गरज आहे. तसेच आयपीएलमध्ये ४,५०० धावा करण्यासाठी त्याला अद्याप ६८ धावांची आवश्यकता आहे.

-वानखेडे स्टेडियमवर आतापर्यंत झालेल्या आयपीएलमधील १२८ सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ५७ तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने ७० सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला आहे.

प्रतिस्पर्धी संघ

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, अल्लाह गझनफर, अश्वनी कुमार, कॉर्बिन बोश, दानिश मलेवार, दीपक चहर, मयांक मार्कंडे, मयांक रावत, मिचेल सँटनर, मोहम्मद इझार, नमन धीर, क्विंटन डीकॉक (यष्टिरक्षक), रघू शर्मा, राज बावा, रॉबिन मिन्झ (यष्टिरक्षक), रायन रिकल्टन (यष्टिरक्षक), शार्दूल ठाकूर, शर्फेन रुदरफोर्ड, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, क्रिश भगत.

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), अकील होसेन, अमन खान, अंशुल कंबोज, डेवाल्ड ब्रेविस, गुर्जापनित सिंग, जेमी ओव्हर्टन, कार्तिक शर्मा (यष्टिरक्षक), मॅट हेन्री, मॅथ्यू शॉर्ट, मुकेश चौधरी, नूर अहमद, प्रशांत वीर, राहुल चहर, रामकृष्ण घोष, सर्फराझ खान, शिवम दुबे, श्रेयस गोपाळ, उर्विल पटेल (यष्टिरक्षक), झॅक फोल्क्स, स्पेन्सर जॉन्सन

सरकारचे तंत्रकठोर नियम! एआयसाठी ‘कायमस्वरूपी’ लेबल; ऑनलाइन गेमिंगसाठीही नवीन नियमावली जाहीर

मुंबई-गोवा महामार्गावर जूनपासून टोल वसुली? ओसरगाव टोल नाक्याची निविदा प्रसिद्ध, किती पैसे मोजावे लागणार?

US-Iran Ceasefire: इराणसोबतचा शस्त्रसंधीचा करार अनिश्चित काळासाठी वाढवण्याची ट्रम्प यांची घोषणा; आर्थिक नाकेबंदी मात्र कायम

Mumbai : राणीबागेत लवकरच सिंह गर्जना घुमणार; महापौर गुजरातच्या सक्करबाग प्राणीसंग्रहालयाची पाहणी करणार

बँकांच्या 'दादागिरी'ला सिद्धार्थ जाजूंचे आव्हान; ५५ कोटींच्या नुकसानभरपाईचा दावा ठोकणार