मुल्लानपूर : सूर्यकुमार यादवने ५३ चेंडूंत साकारलेल्या ७८ धावांच्या खेळीला अन्य फलंदाजांची उत्तम साथ लाभली. त्यामुळे मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये पंजाब किंग्जविरुद्ध २० षटकांत ७ बाद १९२ धावांपर्यंत मजल मारली.
मुल्लानपूर स्टेडियमवर झालेल्या या लढतीत पंजाबचा कर्णधार सॅम करनने मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. इशान किशन ८ धावांवर तिसऱ्याच षटकात माघारी परतला. मात्र त्यानंतर जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला सूर्यकुमार आणि रोहित शर्मा या मुंबईकरांची जोडी जमली. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी रचली. करनने रोहितला २५ चेंडूंत ३६ धावा केल्यावर बाद केले. सूर्यकुमारने मात्र हंगामातील दुसरे अर्धशतक साकारताना ७ चौकार व ३ षटकार लगावले.
सूर्यकुमार व तिलक वर्मा यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४९ धावांची भर घातली. करननेच सूर्यकुमारचाही अडथळा दूर केला. त्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने ६ चेंडूंत १०, तर टिम डेव्हिडने ७ चेंडूंत १४ धावा केल्या. हर्षल पटेलने या दोघांना माघारी पाठवले. तिलक १८ चेंडूंत ३४ धावांवर नाबाद राहिल्याने मुंबईने १९० धावांचा पल्ला गाठला. पंजाबसाठी पटेलने तीन, तर करनने दोन बळी मिळवले.
आयपीएल गुणतालिका
संघ - सामने - जय - पराजय - गुण - धावगती
राजस्थान - ७ - ६ - १ - १२ - ०.६७७
कोलकाता - ६ - ४ - २ - ८ - १.३९९
चेन्नई - ६ - ४ - २ - ८ - ०.७२६
हैदराबाद - ६ - ४ - २ - ८ - ०.५०२
लखनऊ - ६ - ३ - ३ - ६ - ०.०३८
दिल्ली - ७ - ३ - ४ - ६ --०.०७४
गुजरात - ७ - ३ - ४ - ६ --१.३०३
पंजाब - ६ - २ - ४ - ४ --०.२१८
मुंबई - ६ - २ - ४ - ४ --०.२३४
बंगळुरू - ७ - १ - ६ - २ - -१.१८५
(दिल्ली वि. गुजरात सामन्यापर्यंत)