मेलबर्न : मुंबईचा २६ वर्षीय फिरकी अष्टपैलू तनुष कोटियनचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. रविचंद्रन अश्विनने निवृत्ती दिल्यामुळे पर्यायी फिरकीपटू म्हणून ऑफस्पिनर तनुषला संधी देण्यात आली आहे. मंगळवारी तनुष ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी खेळवण्यात येणारी पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पर्थ येथील पहिल्या कसोटीत बुमराच्या नेतृत्वाखाली भारताने कांगारूंना २९५ धावांनी धूळ चारली. मात्र दुसऱ्या लढतीत गुलाबी चेंडूपुढे भारताची तारांबळ उडाली व ऑस्ट्रेलियाने पाहुण्यांना १० गडी राखून नेस्तनाबूत केले. त्यानंतर ब्रिस्बेनच्या तिसऱ्या कसोटीत पावसाने खोळंबा केल्यामुळे लढत अनिर्णित राहिली. आता २६ डिसेंबरपासून उभय संघांत मेलबर्न येथे चौथ्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीला प्रारंभ होईल. त्यानंतर ३ जानेवारीपासून सिडनीत अखेरची कसोटी सुरू होईल.
३८ वर्षीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने तिसऱ्या कसोटीनंतर तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याच्या अनुपस्थितीत वॉशिंग्टन सुंदर व रवींद्र जडेजा या उजव्या-डाव्या फिरकीपटूंची जोडी भारताच्या ताफ्यात आहेच. मात्र तनुषला संघात दाखल करून निवड समिती भविष्यातील मालिकांचा विचार करत असल्याचे समजते. तसेच ऑस्ट्रेलिया मालिकेला सुरू होण्यापूर्वी भारत-अ संघ ऑस्ट्रेलिया-अ संघाविरुद्ध खेळण्यासाठी आला होता. त्या संघाचा तनुष भाग होता. त्याने मेलबर्न येथे आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ४४ धावाही केल्या होत्या.
“सुंदर व जडेजा असे दोन फिरकीपटू तसेच अष्टपैलूंचे पर्याय भारताच्या ताफ्यात आहेच. मात्र या दोघांपैकी एकाला दुखापत झाल्यास तिसरा पर्याय असावा म्हणून तनुषला संधी देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सातत्याने छाप पाडत आहे,” असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. तनुष सध्या विजय हजारे स्पर्धेत मुंबईचे प्रतिनिधित्व करत आहे. सोमवारीच त्याने हैदराबाद संघाविरुद्ध निर्णायक योगदान देत मुंबईला विजय मिळवून दिला.
दरम्यान, अश्विनच्या निवृत्तीनंतर डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलला आधी प्राधान्य देण्यात येणार होते. मात्र वैयक्तिक कारणास्तव अक्षरने विजय हजारे स्पर्धेतूनच काही सामन्यांसाठी विश्रांती घेतली आहे. तर चायनामन कुलदीप यादव जायबंदी आहे. त्यामुळे तनुषला भारतीय ड्रेसिंग रूममध्ये वावरण्याची लॉटरी लागली आहे. त्याला दोन कसोटींपैकी एका लढतीत पदार्पणाची संधीही मिळणार का, हे पाहणे रंजक ठरेल.
तनुषची कामगिरी कशी?
उजव्या हाताने ऑफस्पिन गोलंदाजी व सहाव्या-सातव्या क्रमांकावर उपयुक्त फलंदाजी करण्यात तनुष पटाईत आहे.
मार्च २०२४मध्ये मुंबईने ४२व्यांदा रणजी स्पर्धा जिंकली. या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून तनुषला गौरविण्यात आले. त्याने हंगामात १० सामन्यांत २९ बळी मिळवतानाच फलंदाजीत ५ अर्धशतके व १ शतक झळकावले होते. तसेच एका लढतीत ११व्या फलंदाजासह विक्रमी भागीदारी रचून शतकही साकारले.
२०२४च्या आयपीएलमध्ये राजस्थानकडून तनुषला एकमेव सामना खेळण्याची संधी लाभली. २०२५ आयपीएलसाठी मात्र त्याला कोणीही खरेदी केलेले नाही.
३३ प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव असलेल्या तनुषने १०१ बळी मिळवले असून त्याची सरासरी २५.७० इतकी आहे. तसेच फलंदाजीत २ शतके व १३ अर्धशतकांसह १,५२५ धावाही त्याने केल्या आहेत. फलंदाजीत त्याची सरासरी ४१.२१ इतकी आहे.
सराव खेळपट्ट्यांबाबत भारताची नाराजी
मेलबर्न कसोटीसाठी देण्यात आलेल्या सराव खेळपट्ट्यांबाबत भारतीय संघाने नाराजी वर्तवली आहे. त्यासंबंधी त्यांनी मैदानाचे क्युरेटर तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे तक्रारही नोंदवली असल्याचे समजते. प्रत्यक्षात कसोटीसाठी वापरण्यात येणारी खेळपट्टी झाकून ठेवण्यात आली आहे. मात्र सराव खेळपट्ट्यांवर चेंडू फारस खाली राहत आहे. तसेच रोहितच्या गुडघ्याला व आकाशच्या हाताला दुखापत झाली आहे. रविवारी सायंकाळी सरावादरम्यान देवदत्त पडिक्कल, सुंदर यांचे चेंडूही गुडघ्यापेक्षा कमी उंचीवर उडत होते. त्यामुळे भारताने सोमवारी सराव करण्याचे टाळले, असे समजते.