Commonwealth Games 2026 : मुरली सलग दुसऱ्यांदा 'रौप्य'चा मानकरी 
क्रीडा

Commonwealth Games 2026 : मुरली सलग दुसऱ्यांदा 'रौप्य'चा मानकरी

भारताचा आघाडीचा लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग दुसरे पदक जिंकून ऐतिहासिक पराक्रम केला आहे. दुखापतीच्या गंभीर संकटावर मात करत २७ वर्षीय श्रीशंकरने ८.०९ मीटरची सर्वोत्तम उडी नोंदवत रौप्यपदकावर आपले नाव कोरले.

Swapnil S

ग्लासगो : भारताचा आघाडीचा लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग दुसरे पदक जिंकून ऐतिहासिक पराक्रम केला आहे. दुखापतीच्या गंभीर संकटावर मात करत २७ वर्षीय श्रीशंकरने ८.०९ मीटरची सर्वोत्तम उडी नोंदवत रौप्यपदकावर आपले नाव कोरले. या कामगिरीसह राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात लांब उडी प्रकारात सलग दोन पदके जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी त्याने २०२२ च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतही रौप्यपदक जिंकले होते.

श्रीशंकरच्या या पदकाला पुनरागमनाची एक भावूक किनार आहे. एप्रिल २०२४ मध्ये पटेलर टेंडन ही पायाची स्नायू दुखापत झाल्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. या दुखापतीमुळे त्याला पॅरिस ऑलिम्पिकला मुकावे लागले होते आणि त्याच्या कारकीर्दीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, ग्लासगोमध्ये त्याने ८.०३ मीटर उडीने आत्मविश्वासाने सुरुवात केली आणि दुसऱ्या प्रयत्नात ८.०९ मीटर अंतर पार करत आघाडी घेतली. जमैकाच्या माजी जागतिक विजेत्या ताजे गेलने ८.१५ मीटर उडी मारून सुवर्णपदक पटकावले, तर स्थानिक खेळाडू स्टीफन मॅकेन्झीने ८.०८ मीटर कामगिरीसह कांस्यपदक जिंकले. स्पर्धेतील दुसऱ्या भारतीय खेळाडू लोकेश सत्यानाथनने पहिल्याच प्रयत्नात ७.९७ मीटर उडी मारून पाचवे स्थान पटकावले.

वडिलांच्या आणि माजी त्रिपद उडीपटू एस. मुरली यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या श्रीशंकरने या यशानंतर आनंद व्यक्त केला. दोन वर्षांपूर्वी मी पुन्हा भारताचे प्रतिनिधित्व करेन असे वाटले नव्हते, अशी भावूक प्रतिक्रिया त्याने दिली.

बर्मिंगहॅमच्या रौप्यपदकाचे रुपांतर सुवर्णामध्ये न करू शकल्याची खंत व्यक्त करतानाच, आगामी जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी या कामगिरीमुळे आत्मविश्वास वाढल्याचे त्याने स्पष्ट केले. राष्ट्रकुलच्या इतिहासात श्रीशंकरपूर्वी सुरेश बाबू (कांस्य, १९७८), अंजू बॉबी जॉर्ज (कांस्य, २००२) आणि एम. प्राजुषा (रौप्य, २०१०) यांनी लांब उडीत पदके जिंकली आहेत. एकूणच श्रीशंकरची कामगिरी कौतुकास्पद ठरत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : उच्च न्यायालयातील कॅन्टिनवर FDA चा बडगा; FSSAI परवाना नसल्याचे उघड

ॲग्रीगेटर कंपन्यांना १ सप्टेंबरपर्यंतची मुदत; नोंदणी न केल्यास कठोर कारवाई

E20 च्या वापराने मायलेज घटण्याचा संभव; केंद्र सरकारची संसदेत कबुली

जागतिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या अध्यक्षतेखाली 'सीसीएस'ची बैठक; पुरवठा साखळीवरील संकटावर मंथन

गंभीर नियमभंग असेल तरच होते कारवाई, "मी स्वतःला सिंघम मानत नाही"; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांची विशेष मुलाखत