लखनऊ : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सोमवारी होणाऱ्या लढतीत सातत्याने संघर्ष करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्ससमोर सनरायजर्स हैदराबादचे आव्हान असेल. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि पंजाब किंग्स हे संघ आधीच प्ले ऑफमध्ये पोहोचले आहेत. त्यामुळे उर्वरीत एका जागेसाठी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी लखनऊला या लढतीसह उर्वरित सामन्यांतही मोठ्या फरकाने विजय मिळवणे आवश्यक आहे. स्पर्धेत आतापर्यंत अपयशी ठरलेला लखनऊचा कर्णधार ऋषभ पंतसाठीसुद्धा ही धोक्याची घंटा असेल. तर हैदराबादचे आव्हान आधीच संपुष्टात आले असून ते प्रतिष्ठेसह अन्य संघांचे समीकरण बिघडवण्यासाठी खेळतील.
पंतच्या नेतृत्वात खेळणारा लखनऊ संघ तूर्तास ११ सामन्यांतील ५ विजयांच्या १० गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. पहिल्या सहापैकी चार सामने जिंकणाऱ्या लखनऊला त्यानंतरच्या पाच लढतींमध्ये फक्त एकच विजय मिळवता आला आहे. त्यामुळे लखनऊवर सलग दुसऱ्या हंगामात साखळीतच गारद होण्याची टांगती तलवार आहे. उर्वरित तीन सामन्यांत लखनऊने विजय मिळवला, तर ते बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहू शकतात. यासाठी त्यांना अन्य संघांच्या निकालावरही लक्ष ठेवावे लागेल. मुख्य म्हणजे आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरलेल्या पंतने आतापर्यंत २७ कोटींना साजेशी कामगिरी केलेली नाही. ११ सामन्यांत फक्त एका अर्धशतकासह त्याने १२८ धावा केल्या आहेत. त्यामुळे पंतने आता नेतृत्वासह फलंदाजीतही छाप पाडण्याची गरज आहे.
दुसरीकडे पॅट कमिन्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हैदराबादसाठी यंदाचा हंगाम निराशाजनक ठरला. ११ सामन्यांतील फक्त ३ विजयांसह ते गुणतालिकेत आठव्या स्थानी आहेत. त्यामुळे गतवर्षी उपविजेतेपद मिळवणाऱ्या हैदराबादला यंदा साखळीतच गाशा गुंडाळावा लागला. त्यातच आता ट्रेव्हिस हेड कोरोनामुळे या लढतीस मुकण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत अभिषेक शर्मा, हेनरिच क्लासेन या फलंदाजांवर व शमी, कमिन्स, हर्षल पटेल या वेगवान गोलंदाजांवर हैदराबादची भिस्त असेल.
दरम्यान, लखनऊच्या इकाना स्टेडियमवर यंदाच्या हंगामात झालेल्या पाच पैकी चार सामन्यांत धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. तसेच प्रथम फलंदाजी करताना येथे १८० धावा करणेही कठीण होत आहे. खेळपट्टी काहीशी संथ असून येथे फिरकीपटूंना सहाय्य लाभते, त्यामुळे नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरेल.