धडाकेबाज विजयासह न्यूझीलंड अंतिम फेरीत; पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचे आव्हान संपुष्टात; ईडन गार्डन्सवर फिन ॲलनचे शतकी वादळ Photo : ICC
क्रीडा

धडाकेबाज विजयासह न्यूझीलंड अंतिम फेरीत; पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचे आव्हान संपुष्टात; ईडन गार्डन्सवर फिन ॲलनचे शतकी वादळ

SA vs NZ, ICC T20 WC26 : कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर बुधवारी फिन ॲलनचे शतकी वादळ घोंघावले. ॲलनने अवघ्या ३३ चेंडूंत नाबाद १०० धावांची शतकी खेळी साकारल्यामुळे न्यूझीलंडने टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ९ गडी व ४३ चेंडू राखून धुव्वा उडवला.

Swapnil S

कोलकाता : कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर बुधवारी फिन ॲलनचे शतकी वादळ घोंघावले. ॲलनने अवघ्या ३३ चेंडूंत नाबाद १०० धावांची शतकी खेळी साकारल्यामुळे न्यूझीलंडने टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ९ गडी व ४३ चेंडू राखून धुव्वा उडवला. याबरोबरच न्यूझीलंडने दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली, तर अपराजित आफ्रिकेचे स्वप्न पुन्हा उद्ध्वस्त झाले.

न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी प्रथमच आफ्रिकेला २० षटकांत ८ बाद १६९ धावांत रोखले. मग फिन आणि टिम सेईफर्ट यांनी केलेल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडने १२.५ षटकांतच विजयी लक्ष्य गाठले. फिनने १० चौकार व ८ षटकारांसह टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक साकारले. सेईफर्टने ७ चौकार व २ षटकारांसह ३३ चेंडूंत ५८ धावा फटकावल्या. या दोघांनी पॉवरप्लेमध्येच ८० धावा कुटल्या. ५५ चेंडूंत ११७ धावांची सलामी नोंदवल्यावर सेईफर्ट माघारी परतला.

मात्र फिनने रचिन रवींद्रच्या (नाबाद १३) साथीने दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भर घालून न्यूझीलंडचा १३व्या षटकांतच विजय साकारला. २०२१मध्ये न्यूझीलंडने अंतिम फेरी गाठली होती. त्यावेळी त्यांना अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. आता २०२६मध्ये त्यांना पुन्हा एकदा जेतेपदाची संधी आहे. रविवार, ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या महाअंतिम मुकाबल्यात न्यूझीलंडसमोर भारत किंवा इंग्लंडचे आव्हान असेल.

भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या १०व्या पर्वाचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले होते. भारत २०१६ नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला होता. या स्पर्धेत साखळी फेरीसाठी प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले होते. मग सुपर-आठ फेरीत दोन गट तयार करण्यात आले. पहिल्या गटातून दक्षिण आफ्रिका व भारत यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर दुसऱ्या गटातून इंग्लंड व न्यूझीलंड यांनी आगेकूच केली होती.

एडीन मार्करमच्या नेतृत्वात खेळणारा आफ्रिका संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित होता. त्यांनी साखळी फेरीत ४, तर सुपर-आठ फेरीत ३ असे एकंदर सलग सात सामने जिंकले होते. दुसरीकडे न्यूझीलंडने काहीशा संमिश्र स्वरुपाच्या कामगिरीद्वारे इथवर मजल मारली होती. मात्र बुधवारी उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली व सर्व काही त्यांच्या बाजूनेच घडत गेले.

कोल मॅकोन्चीने पॉवरप्लेमध्येच क्विंटन डीकॉक व रायन रिकल्टन यांना बाद केले. मग मार्करम व डेव्हिड मिलर यांनीही निराशा केली. ५ बाद ७७ अशा स्थितीतून मार्को यान्सेनने ३० चेंडूंत नाबाद ५५ धावांची झुंजार खेळी साकारल्यामुळे आफ्रिकेने किमान १५० धावांचा पल्ला गाठला होता. तसेच ट्रिस्टन स्टब्सने २९, तर डेवाल्ड ब्रेविसने ३४ धावा फटकावल्या. मात्र फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर ही धावसंख्या अपुरी पडली. परिणामी न्यूझीलंडने आफ्रिकेच्या गोलंदाजांचा पालापाचोळा करताना थाटात अंतिम फेरीत धडक मारून अन्य संघांना इशारा दिला, असे म्हणू शकतो.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका : २० षटकांत ८ बाद १६९ (मार्को यान्सेन ५५, डेवाल्ड ब्रेविस ३४; कोल मॅकोन्ची २/९) पराभूत वि.

न्यूझीलंड : १२.५ षटकांत १ बाद १७३ (फिन ॲलन नाबाद १००, टिम सेईफर्ट ५८, रचिन रवींद्र नाबाद १३)

इराणी युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीचा हल्ला, ८७ ठार; श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ झालेल्या हल्ल्यात जहाजाला जलसमाधी

तेंडुलकर कुटुंबात सनई-चौघडे! अर्जुन तेंडुलकर-सानिया चंडोक विवाहबद्ध; राजकारणी ते बॉलिवूड दिग्गजांची उपस्थिती

IND vd ENG ICC T20 WC26 : वानखेडेवर आज अहमदाबादचे तिकीट? इंग्लंडला नमवून अंतिम फेरी गाठण्याचे भारताचे ध्येय

पुण्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग चाचणी

मिठी नदी गाळ घोटाळा : EOW कडून दुसरे पुरवणी आरोपपत्र दाखल