क्रीडा

ऑलिम्पिक पात्रतेचे स्वप्न उद्ध्वस्त! भारतीय महिला हॉकी संघाचा जपानकडून ०-१ असा पराभव

रांची येथील जयपाल सिंह स्टेडियमवर शुक्रवारी किमान तिसऱ्या क्रमांकाची लढत जिंकून भारताला ऑलिम्पिकचे तिकीट मिळवता आले असते

Swapnil S

रांची : भारतीय महिला हॉकी संघाचे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ला पात्र ठरण्याचे स्वप्न शुक्रवारी धुळीस मिळाले. एफआयएच हॉकी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकासाठीच्या सामन्यात जपानने भारताला ०-१ असे नमवले. त्यामुळे भारतीय संघावर स्पर्धेबाहेर जाण्याची नामुष्की ओढवली.

२०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला संघाने चौथे स्थान पटकावले होते. मात्र यावेळी त्यांनी गतवर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यात अपयश आले. त्यामुळे या ८ संघांतील पात्रता फेरीतून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची भारताला अखेरची संधी होती. सविता पुनियाच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने गटात दोन विजयांसह दुसरे स्थान प्राप्त केले. मात्र जर्मनीकडून उपांत्य लढतीत त्यांना पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव पत्करावा लागला.

रांची येथील जयपाल सिंह स्टेडियमवर शुक्रवारी किमान तिसऱ्या क्रमांकाची लढत जिंकून भारताला ऑलिम्पिकचे तिकीट मिळवता आले असते. मात्र भारताने या लढतीत तब्बल ९ वेळा पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी गमावली. चेंडूवर अधिक वेळ ताबा राखूनही त्यांना गोल करता आला नाही. जपानकडून काना उराटाने सहाव्या मिनिटाला केलेला एकमेव गोल निर्णायक ठरला. त्यामुळे अमेरिका, जर्मनी व जपान यांनी ऑलिम्पिकची पात्रता मिळवली. पराभवानंतर सवितासह सर्व भारतीय खेळाडूंना अश्रूंना आवर घालणे कठीण गेले.

या बाबींचा भारताला फटका?

राणी रामपालला वगळणे तसेच अनुभवी ड्रॅगफ्लिकर संघात नसून युवा खेळाडूंवर अतिरिक्त भरवसा दर्शवणे भारताला महागात पडले.

मुख्य प्रशिक्षिका जॅनेक शॉपमन यांचा कार्यकाळ पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत होता. मात्र भारताचे हे स्वप्न उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्याविषयी भारतीय हॉकी महासंघ काय निर्णय घेणार, हे पाहणे रंजक ठरेल.

मुख्य म्हणजे जपानविरुद्धच्या गेल्या पाच लढतींमध्ये भारताने विजय मिळवला होता. मात्र नेमका यावेळी त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले.

जर्मनीविरुद्धच्या पराभवानंतर आम्ही लगेच सावरून या लढतीसाठी तयारी केली. पहिल्या १० मिनिटांतच गोल पत्करूनही आम्ही जपानला कडवी झुंज दिली. मात्र पेनल्टी कॉर्नरवर गोल न करता आल्याने आम्ही अपयशी ठरलो. यापेक्षा अधिक मी सध्या काहीच सांगू शकत नाही.

- जॅनेक शॉपमन, भारताच्या प्रशिक्षिका

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले