क्रीडा

Pakistan-Bangladesh Test Series: बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक पहिला विजय

पाकिस्तानला पहिल्या कसोटी सामन्यात १० गडी राखून धूळ चारली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने प्रथमच पाकिस्तानवर विजय मिळवला, हे विशेष.

Swapnil S

रावळपिंडी : बांगलादेशच्या क्रिकेट संघाने रविवारी हिंसाचाराच्या चक्रव्यूहात सापडलेल्या देशातील तमाम चाहत्यांना आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी दिली. त्यांनी पाकिस्तानला पहिल्या कसोटी सामन्यात १० गडी राखून धूळ चारली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने प्रथमच पाकिस्तानवर विजय मिळवला, हे विशेष.

रावळपिंडी येथे झालेल्या या सामन्यात अखेरच्या दिवशी पाकिस्तानचा डाव ५५.५ षटकांत १४६ धावांत गुंडाळल्यावर बांगलादेशने ३० धावांचे लक्ष्य ६.३ षटकांत सहज गाठले. झाकीर हसनने नाबाद १५, तर शदमन इस्लामने नाबाद ९ धावा केल्या. याबरोबरच बांगलादेशने दोन लढतींच्या मालिकेत १-० अशी विजयी आघाडी घेतली.

या कसोटीत पाकिस्तानने पहिला डाव ४४८ धावांवर घोषित केला. मग बांगलादेशने मुशफिकूर रहीमच्या १९१ धावांमुळे ५६५ धावा करून ११७ धावांची आघाडी मिळवली. त्याच्या प्रत्युत्तरात चौथ्या दिवसअखेर पाकिस्तानने १ बाद २३ धावा केल्या होत्या. मात्र रविवारी शाकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज यांच्या फिरकीपुढे पाकिस्तानची फलंदाजी ढेपाळली. मोहम्मद रिझवानने ५१ धावांची एकाकी झुंज दिली. मेहदीने चार, तर शाकिबने तीन बळी मिळवले. पाकिस्तानने जेमतेम १४६ धावा करून बांगलादेशपुढे ३० धावांचे लक्ष्य ठेवले. बांगलादेशच्या सलामीवीरांनी हे आव्हान सहज पार केले. पहिल्या डावातील शतकवीर रहीमला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

  • पाकिस्तान (पहिला डाव) : ६ बाद ४४८ घोषित

  • बांगलादेश (पहिला डाव) : सर्व बाद ५६५

  • पाकिस्तान (दुसरा डाव) : ५५.५ षटकांत सर्व बाद १४६ (मोहम्मद रिझवान ५१; मेहदी हसन ४/२१, शाकिब अल हसन ३/४४)

  • बांगलादेश (दुसरा डाव) : ६.३ षटकांत बिनबाद ३० (झाकीर हसन नाबाद १५, शदमन इस्लाम ९)

  • सामनावीर : मुशफिकूर रहीम

पाकिस्तानविरुद्ध बांगलादेशचा हा १४वा कसोटी सामना होता. अखेर त्यामध्ये त्यांनी यश संपादन केले. विदेशी जमिनीवर त्यांचा हा सातवा विजय ठरला.

Mumbai : पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमापूर्वी खळबळ; बनावट PMO अधिकाऱ्यासह बंदुकधारी बॉडीगार्डला अटक, सुरक्षा यंत्रणा सतर्क

हिंदू धार्मिक गटाच्या भेटीदरम्यान वाद; महिला कर्मचाऱ्यांना हटवलं, 'आयफेल टॉवर' बंद, नेमकं काय घडलं?

तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग; दिल्लीत बेदम मारहाण करत मणिपुरी संगीतकाराची हत्या, CCTV व्हिडीओ समोर

उच्च न्यायालयाचा स्टेट बँकेला दणका; मूळ कागदपत्रे परत करणे बँकेचीच कायदेशीर जबाबदारी

मेट्रो-५ च्या चाचणीची तयारी अंतिम टप्प्यात; ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर २५ हजार व्होल्टचा वीजप्रवाह सुरू