क्रीडा

भारत-पाकिस्तान ठरल्याप्रमाणेच! अहमदाबाद येथे घटस्थापनेच्या मुहूर्तावर येणार उभय संघ आमनेसामने

प्रतिनिधी

भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील विश्वचषकातील लढत १५ ऑक्टोबर म्हणजेच घटस्थापनेच्या मुहूर्तावर अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. आयसीसीने मंगळवारी मुंबईतील कार्यक्रमात एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा २०२३चे अधिकृत वेळापत्रक जाहीर करताना या सामन्याबाबत झालेल्या असंख्य चर्चांना पूर्णविराम लगावला.

आशिया चषकाच्या आयोजनावरून सुरू असलेला वाद तसेच बिघडलेल्या राजकीय संबंधांमुळे पाकिस्तान संघ विश्वचषकासाठी भारतात येणार की नाही, याविषयी अद्याप साशंकता आहे. मात्र विश्वचषकाचे यजमानपद भारत भूषवणार असून बीसीसीआयने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार कोणत्याही लढतींमध्ये आता बदल होणे कठीण आहे. त्यामुळे पाकिस्तानला भारताविरुद्ध खेळण्यासाठी अहमदाबाद येथे यावेच लागेल. तसेच अफगाणिस्तानविरुद्ध चेन्नईतील सामना अन्य ठिकाणी खेळवण्याचा त्यांचा प्रस्तावही धुडकावण्यात आला आहे.

पाकिस्तान मुंबईत खेळणार नाहीच

पाकिस्तानने उपांत्य फेरीत प्रवेश केला, तरी ते मुंबईत खेळणार नाही, असेही आयसीसीने स्पष्ट केले आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार भारताने उपांत्य फेरी गाठली, तर त्यांची लढत मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येईल. तसेच पाकिस्तानने उपांत्य फेरीत मजल मारली, तर त्यांचा उपांत्य सामना कोलकातामधील ईडन गार्डन्स येथे रंगेल. मात्र उपांत्य फेरीत भारत-पाकिस्तान संघ आमेनसामने आले, तर ही लढत कोलकाता येथेच होईल.

वेळापत्रकातील महत्त्वाचे मुद्दे

- ५ ऑक्टोबर रोजी गतविजेते इंग्लंड आणि गतउपविजेते न्यूझीलंड यांच्यातील लढतीद्वारे विश्वचषकाचा शुभारंभ होईल.

- भारतीय संघ ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईत होणाऱ्या लढतीद्वारे अभियानाची सुरुवात करणार आहे.

- संपूर्ण विश्वचषकात भारतीय संघ एकूण ९ विविध ठिकाणी खेळणार आहे. उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आले आहेत.

- १५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडेवर पहिला, तर १६ नोव्हेंबर रोजी कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर दुसरा उपांत्य सामना रंगेल. १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादला महाअंतिम मुकाबला खेळवण्यात येईल.

- २९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान सराव सामने खेळवण्यात येतील.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था