पंत-जुरेल दोघांचाही समावेश! पहिल्या कसोटीसाठी नितीशला वगळण्याचे सहाय्यक प्रशिक्षकांकडून संकेत 
क्रीडा

पंत-जुरेल दोघांचाही समावेश! पहिल्या कसोटीसाठी नितीशला वगळण्याचे सहाय्यक प्रशिक्षकांकडून संकेत

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्यासाठी आता अवघा एक दिवस शिल्लक आहे. त्यापूर्वी भारतीय संघातील अंतिम ११ खेळाडूंबाबत सगळीकडे चर्चा सुरू असून भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डस्काटे यांनी बुधवारी ऋषभ पंत व ध्रुव जुरेल या दोघांचेही स्थान पक्के असल्याचे संकेत दिले. त्यामुळे नितीश रेड्डी संघाबाहेर जाऊ शकतो.

Swapnil S

कोलकाता : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्यासाठी आता अवघा एक दिवस शिल्लक आहे. त्यापूर्वी भारतीय संघातील अंतिम ११ खेळाडूंबाबत सगळीकडे चर्चा सुरू असून भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डस्काटे यांनी बुधवारी ऋषभ पंत व ध्रुव जुरेल या दोघांचेही स्थान पक्के असल्याचे संकेत दिले. त्यामुळे नितीश रेड्डी संघाबाहेर जाऊ शकतो.

१४ नोव्हेंबरपासून आफ्रिकेच्या भारत दौऱ्याला प्रारंभ होणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथे पहिली कसोटी खेळल्यानंतर २२ तारखेपासून उभय संघांत गुवाहाटी येथे दुसरी कसोटी होईल. त्यानंतर भारत-आफ्रिका यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय व ५ लढतींची टी-२० मालिकासुद्धा रंगणार आहे. तूर्तास भारतीय संघ कोलकाता येथे कसून सराव करत आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात तसेच प्रशिक्षक गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात भारतीय संघ जागतिक अजिंक्यपद विजेत्या आफ्रिकेला कडवी झुंज देईल, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज पंतचे तीन महिन्यांनी भारताच्या कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. २६ वर्षीय पंतला जुलै महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पायाला चेंडू लागल्याने दुखापत झाली होती. त्यामुळे पंत आशिया चषकासह वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका व ऑस्ट्रेलिया दौऱ्यालाही मुकला. मात्र दक्षिण आफ्रिका-अ संघाविरुद्ध पंतने भारत-अ संघाचे नेतृत्व करताना तंदुरुस्ती सिद्ध केली. तसेच दुसऱ्या डावात ९० धावांची खेळी साकारून संघाला विजय मिळवून दिला. पंत संघात परतल्याने तोच यष्टिरक्षक असणार, हेसुद्धा स्पष्ट झाले.

अशा स्थितीत २४ वर्षीय जुरेलला संघातील स्थान गमवावे लागणार की त्याला फलंदाज म्हणून संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. कारण पंतच्या अनुपस्थितीत विंडीजविरुद्ध जुरेलने यष्टिरक्षण करतानाच फलंदाज म्हणूनही छाप पाडली होती. त्याने पहिले कसोटी शतक साकारताना दोन सामन्यांत १७५ धावा केल्या. त्यानंतर भारत-अ संघाकडून नुकताच दक्षिण आफ्रिका-अ संघाविरुद्ध झालेल्या लढतीत जुरेलने दोन्ही डावांत शतक साकारताना अनुक्रमे नाबाद १३२ व नाबाद १२७ धावा केल्या. म्हणजेच गेल्या ८ पैकी ४ डावांत जुरेलने शतक साकारलेले आहे.

बुधवारी भारतीय संघाच्या सरावानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जुरेलविषयी डस्काटे यांना विचारण्यात आले. “संघ व्यवस्थापन फलंदाजांच्या क्रमाविषयी निश्चिंत आहे. पंत किंवा जुरेलपैकी एकालाही सद्यस्थितीत संघाबाहेर ठेवणे कठीण दिसत आहे. कोलकाताची खेळपट्टी व संघरचनेनुसार नितीशला कदाचित या कसोटीसाठी संघाबाहेर रहावे लागू शकते,” असे डस्काटे म्हणाले.

गतवर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचे फलंदाज फिरकीविरुद्ध सपशेल अपयशी ठरले होते. त्यामुळे भारताला ०-३ असा व्हाइटवॉश पत्करावा लागला होता. आफ्रिकेच्या संघातही केशव महाराज, सेनुरान मुथुस्वामी व सिमॉन हार्मर असे फिरकीपटू आहेत. त्यांच्याविरुद्ध प्रमुख फलंदाजांना संधी देण्यावर भारताचा भर आहे. त्यामुळेच नितीशऐवजी जुरेलला प्राधान्य देण्यात येईल.

एकूणच आता भारत-आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यानंतर भारताची पुढील कसोटी मालिका थेट जून २०२६मध्ये असेल. त्यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या (डब्ल्यूटीसी) दृष्टीने भारतासाठी ही मालिका महत्त्वाची असेल. तूर्तास भारत ६१.९० टक्क्यांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे.

कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमरा, अक्षर पटेल, नितीश रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप.

नव्या ट्रेनिंग कीटसह खेळाडूंचा कसून सराव

भारतीय संघ बुधवारी नव्या ट्रेनिंग कीटमध्ये सराव करताना दिसला. भारताच्या जर्सीचे टायटल स्पॉन्सर आता ड्रीम११ ऐवजी अपोलो टायर्स झाले आहे. त्यामुळे आता नव्या प्रायोजकासह भारतीय संघ सराव करताना आढळला. राखाडी रंगाच्या या टी-शर्टमध्ये भगव्या रंगाचे मिश्रण दिसायला आकर्षक वाटत आहे. त्यामुळे सगळीकडे या टी-शर्टविषयी चर्चा सुरू असून अनेकांनी ऑनलाइन खरेदीसाठीही शोध सुरू केला आहे.

दरम्यान, बुधवारी सरावात साई सुदर्शन व पंत यांनी दीर्घकाळ फलंदाजी केली. तसेच पंत प्रशिक्षक गंभीरशी संवाद साधतानाही आढळला. बुमरा व सिराज या वेगवान गोलंदाजांनीही जोडीने मारा केला. अक्षर पटेल व आकाश दीप यांना पहिल्या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता कमी असली, तरी तेसुद्धा तासभर गोलंदाजीचा सराव करताना आढळले.

असी असू शकते भारताची प्लेइंग ईलेव्हन

  • भारतीय संघाचा विचार करता यशस्वी जैस्वाल व के. एल. राहुल सलामीला येतील, हे स्पष्ट आहे. तसेच साई सुदर्शनने विंडीजविरुद्ध दुसऱ्या कसोटीत अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे तो तिसऱ्या स्थानी फलंदाजी करेल, असे अपेक्षित आहे. चौथ्या क्रमांकावर गिल, तर पाचव्यावर पंत फलंदाजीस येईल. त्यामुळे जुरेल सहाव्या व अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा सातव्या स्थानी फलंदाजी करू शकतो.

  • भारतातील खेळपट्ट्यांवर फिरकीपटू प्रामुख्याने वर्चस्व गाजवतात. त्यामुळे तीन फिरकीपटूंना प्राधान्य दिले जाईल. अशा स्थितीत आठव्या क्रमांकावर ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर व नवव्या स्थानी चायनामन कुलदीप यादव असेल. जडेजा, सुंदर व कुलदीप फिरकीची धुरा वाहतील. त्यानंतर दोन वेगवान गोलंदाज हे जसप्रीत बुमरा व मोहम्मद सिराज असतील.

  • नितीशला विंडीजविरुद्ध दोन्ही कसोटींमध्ये संधी देण्यात आली. मात्र फलंदाजीत त्याची फारशी गरज भासली नाही, तर दोन्ही कसोटींत मिळून त्याने फक्त ४ षटके गोलंदाजी केली. त्यामुळे नितीशऐवजी भारतीय खेळपट्ट्यांवर जुरेलला प्राधान्य देण्यात येईल, असे समजते. तीन फिरकीपटू व दोन वेगवान असे पाच गोलंदाज भारताच्या ११ खेळांडूत असतील.

हे माहीत आहे का?

आफ्रिकेचा संघ २०१९नंतर प्रथमच भारत दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी येत आहे. त्यावेळी भारताने त्यांना विराट कोहलीच्या नेतृत्वात ३-० अशी धूळ चारली होती. त्यानंतर दोन वेळा भारतीय संघ आफ्रिका दौऱ्यावर गेला. मात्र २०२१-२२मध्ये आफ्रिकेने भारताला नमवले, तर २०२३-२४ची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. आता गिलच्या नेतृत्वात भारताच्या कामगिरीकडे लक्ष असेल.

Mumbai: कर्जत-कसारा मार्गावरील प्रवाशांना लवकरच दिलासा; १५ डब्यांच्या लोकलबाबत खूशखबर

Mumbai : मोदींच्या उपस्थितीत NESCO मधील इव्हेंटदरम्यान टॉयलेटमध्ये बेशुद्ध पडले होते माजी ऑस्ट्रेलियन मंत्री; तातडीच्या मदतीने वाचला जीव

तरुणांच्या विवाह योगात बिबट्यांचे विघ्न; दहशतीमुळे पुणे जिल्ह्यात विवाहेच्छुक तरुणांना मुली मिळेनात

‘४२ कोटींची वसुली नोटीस कशासाठी?’ मुंढवा जमीन प्रकरणात महसूलमंत्र्यांचे आश्चर्य; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश

Mumbai : नॅशनल पार्कमधील अतिक्रमित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी जागा शोधा; उच्च न्यायालयाचे आदेश